भुदरगड किल्ला/ Bhudargad Fort Information In Marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला/Fort in Kolhapur district

कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला म्हणजे Bhudargad Fort होय. भुदरगड तालुक्यात दोन किल्ले आहेत. एक रांगणा आणि दुसरा भुदरगड होय. छत्रपती शिवराय 1676 मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी रायगडावरून बाहेर पडले. त्या वेळी भुदरगड किल्ला ताब्यात घेऊन पुढे मौनी महाराजांना भेटायला गेले. त्याच किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.

गडाचे नाव : भुदरगड

समुद्रसपाटीपासून उंची : 3212 फूट

किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

तालुका : भुदरगड

जिल्हा : कोल्हापूर

जवळचे गाव : पेठ शिवापूर

डोंगररांग : कोल्हापूर, सह्याद्री

सध्याची अवस्था : पडझड, दुर्लक्षित.

कोल्हापूर पासून अंतर: सुमारे 65 किमी
गारगोटीपासून अंतर:12 किमी

सुमारे आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंद असलेला हा किल्ला दर वर्षी माघ कृष्ण प्रतिपदेला भरणाऱ्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण कात्याळ खडकावर हा किल्ला आहे.

भुदरगडला कसे जायचे?/How to reach Bhudargad?

कोल्हापूरहन सुमारे 65 किमी अंतरावर असणाऱ्या भुदरगडला जाण्यासाठी गारगोटीपर्यंत भरपूर वाहने आहेत. गारगोटीच्या आग्नेयेस 12 किमी अंतरावर भुदरगड किल्ला असून गारगोटीच्या एस.टी.स्टँडवरून भुदरगडच्या पायथ्याशी जाणाऱ्या बसेस सुटतात सध्या गडावर वाहने जातात.

इतिहास:History

शिलाहार राजघराण्यातील पराक्रमी राजा विक्रमादित्य भोज (दुसरा) याने इ. स. 1187 मध्ये आपली राजधानी वाळव्याहून कोल्हापूरला आणली. इ. स. 1190 मध्ये पन्हाळगडावर राजसिंहासन प्रस्थापित करून स्वतःला ‘पश्चिमसम्राट’ म्हणून घोषित केले. राजा भोज याने कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पंधरा किल्ले बांधले. त्यापैकीच ‘भुदरगड’ हा एक होय.

छत्रपती शिवरायांनी 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफझलखानाचा वध केल्यावर आपल्या साम्राज्याची पकड घट्ट करण्यासाठी दक्षिणेकडील किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये भुदरगडही होता. इ. स. 1667 मध्ये शिवरायांनी गडाची दुरुस्ती करून घेतली व दक्षिणेकडील प्रबळ ठाणे बनवण्याचा प्रयत्न केला; परंतु मोगलांनी अल्पावधीतच हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पाच वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी भुदरगडवर हल्ला चढवून गड ताब्यात घेतला. त्यावेळी मोंगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. त्या वेळी मोंगलांची निशाणे भैरवनाथास देऊन टाकली. ती अजूनही देवळात आहेत.

छत्रपती शिवरायांनी रायगडावर प्रतापगडावर ज्याप्रमाणे शौचकूप बांधून घेतले होते.त्याच पद्धतीचे शौचकूप भुदरगडावर आढळतात. विशेष म्हणजे गडकऱ्यांसाठी आणि लोकांसाठीही शौचकूप बांधून घेतले होते.

इ.स. 1659 ते 1673 या काळात शिवरायांना आदिलशाहीबरोबरच मोंगलाईशीही दोन हात करावे लागले. इ.स. 1663 मध्ये शास्ताखानाच्या रूपाने मोंगलाईचे संकट स्वराज्यावर आले होते. त्यानंतर मिर्झाराजे जयसिंग यांचे शिवरायांना एका वेळी दोन शत्रूशी मुकाबला करणे शक्य नव्हते. साहजिकच पन्हाळा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. आणि भुदरगडही.

आग्ऱ्याहून सुटल्यानंतर शिवरायांनी मोगलांच्या व आदिलशाहीच्या ताब्यात असलेले किल्ले घेण्यास सुरुवात केली. याच दरम्यान भुदरगडवरही हल्ला चढवून गड ताब्यात घेतला.

छत्रपती शिवराय साधुसंतांच्या भेटीगाठी घेत असत. दक्षिण दिग्विजयासाठी निघाल्यावर ते पाटगावला मौनी महाराजांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांचे पाय गडावर लागले असण्याची शक्यता वर्तवली जाते. मौनी महाराजांची भेट घेऊन ते पुढे दक्षिण दिग्विजयासाठी गेले.

3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यकारभाराची सूत्रे छत्रपती संभाजी महाराजांकडे गेली. त्यांनी सतत नऊ वर्षे आदिलशाही, मोंगलशाही, पोर्तुगीज ,डच ,स्वकीय यांच्याशी संघर्ष केला. खरे तर त्यांचे कर्तृत्व आणि पराक्रम स्वकीयांना रुचला नाही. इ. स. 1689 मध्ये संगमेश्वर येथे फितुरीमुळे मुकर्रबखानाने संभाजीराजांना पकडले. औरंगजेबने संभाजीराजांना क्रूर आणि अमानुष पद्धतीने ठार मारले. मराठ्यांना जरब बसावा हा त्यांचा हेतू होता; पण उलटे झाले. मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा अधिकच तीव्र झाला.

औरंगजेबाने रायगडावर आक्रमण करून राणी येसूबाई व पुत्र शाहू यांना कैद केले होते. त्यावेळी राजाराम महाराज रायगडावरून निसटले होते. त्यांनी जिंजीस प्रयाण केले. जिंजीस जाताना राजाराम महाराजांनी भुदरगडावर मुक्काम केला होता.

मराठ्यांचे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी आलेल्या औरंगजेबला तब्बल 27 वर्षे महाराष्ट्रात मुक्काम करावा लागला. शेवटी याच मातीने त्याला गाडले. इ. स. 1707 मध्ये त्याचा खुल्दाहाबाद येथे मृत्यू झाला. मरता मरता त्याने स्वराज्यात काडी टाकून दिली. राणी येसूबाई आणि शाहू यांची सुटका केल्यामुळे शाहू आणि ताराबाई यांच्यात गादीसाठी संघर्ष सुरू झाला. आपापसात लढण्यात त्यांनी बराच काळ घालवला.

अखेर इ. स. 1731 मध्ये महाराणी ताराबाई यांचा सावत्र पुत्र संभाजी आणि छत्रपती शंभूराजे यांचा पुत्र शाहू यांच्यात वारणा येथे ऐतिहासिक तह होऊन मराठ्यांच्या गादीचे विभाजन झाले. या तहानुसार करवीरच्या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. महाराणी ताराबाई यांच्याकडे करवीर राज्याची सूत्रे आल्यानंतर त्यांनी आपला लौकिक वाढवला. करवीर राज्यात पन्हाळगड, विशाळगड, सिंधुदुर्ग या बलाढ्य किल्ल्यांबरोबरच भुदरगडचाही समावेश होता.

राजाराम महाराज जिंजीस गेले तेव्हा भुदरगडास मोगलांचा वेढा पडता होता. राजाराम महाराजांनी उमदा आणि चपळ सेनानी संताजी घोरपडे यांना भुदरगड ताब्यात घेण्याची आज्ञा दिली होती. संताजीने मुघलांचा वेढा मोडून गड ताब्यात
घेतला. पुढे राजाराम महाराजांनी संताजी घोरपडेला आपला कुटुंबकबिला ठेवण्यासाठी हा गड ताब्यात दिला. औरंगजेबच्या तंबूचा कळस कापून आणणाऱ्या संताजीचा राजाराम महाराजांनी योग्य सन्मान केला होता.

इ. स. 1761 मध्ये भुदरगडावरील गडकऱ्यांनी करवीरच्या छत्रपतींविरुद्ध बंड केले होते. त्यात सेनापती राणोजी घोरपडेही सामील होते. ते बंड मोडून काढण्यासाठी तत्कालीन करवीरच्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी नाना फडणवीस यांना पाठवले होते; पण नाना तेथे पोहोचण्यापूर्वीच बंड शमले होते.

इ. स. 1762 ते इ. स. 1796 अखेर भुदरगडचा किल्ला परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या ताब्यात होता. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी करवीरच्या छत्रपतींनी हैबतराव गायकवाड यांच्याशी चर्चा केली. त्याप्रमाणे दत्ताजीच्या घाटगे, मामाजी घोरपडे यांनी मोठ्या फौजेनिशी गडावर हल्ला चढवला. पटवर्धन सैनिकांना सळो की पळो करून सोडले. हा किल्ला ताब्यात घेतल्याबदल महाराजांनी हैबतराव गायकवाड यांना ‘विश्वासराव’ हा किताब दिला. दौलतराव गायकवाड यांना ‘सरखवास’ हा किताब दिला. त्यांचे धाकटे बंधू विश्वासराव यांना ‘नाईक’ हा किताब दिला. सयाजीराव जाधव यांना गडाची हवालदारी दिली; तर उदाजीराव घाटगे यांना ‘मुदाळ’ हे गाव इनाम दिले.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे :पाण्याचा तलाव :

गडावरील पाण्याच्या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यातही हे पाणी आटत नाही. येथील मातीच्या विशिष्ट गुणामुळे या पाण्याचा रंग दुधापासून बनवलेल्या चहासारखा आहे.

भैरवनाथ मंदिर: /Bhairavnath Temple

भुदरगड किल्ल्यावरील ‘भैरवनाथ मंदिर’ हे अतिशय प्राचीन मंदिर आहेत. शिवपूर्व काळापासून या मंदिराचे अस्तित्व आहे. दर वर्षी माघ कृष्ण प्रतिपदेला येथे मोठी यात्रा भरते. मंदिरासमोर प्राचीन दीपमाळ आहे.

शिवरायांचा पुतळा :

गडावर छत्रपती शिवरायांचा अर्धा पुतळा आहे. पुतळ्यातील शिवरायांचे रूप अत्यंत देखणे आहे.

नरसिंह तोफ :

भैरवनाथ मंदिराच्या परिसरात युद्धात वापरलेली ‘नरसिंह तोफ’ आजही पाहायला मिळते. आकाराने छोटी असली तरी ती इतिहासाची साक्षीदार आहे.

‘किल्ले भुदरगड’ हा कोल्हापूर जिल्ह्यातील उपेक्षित किल्ला मानला जातो. ठरावीक काळ सोडला तर गडावर पर्यटकही फारसे फिरकत नाहीत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गडावर विविध सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी काही अभ्यासू आणि हौशी पर्यटक मात्र आवर्जून भेट देतात.

Leave a comment