पारगड/Pargad Fort
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील भाग डोंगररांगांनी व्यापलेला आहे. या डोंगररांगांमध्ये अनेक किल्ले वसलेले आहेत. त्यांतीलच एक महत्त्वाचा आणि अत्यंत दुर्गम भागात चंदगड तालुक्यात असलेला किल्ला म्हणजे ‘Pargad Fort’ होय.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि सिंधुदुर्गचा परिसर नजरेच्या कवेत घेणारा हा ‘किल्ले पारगड’ कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवर उंच मैदानी पठारावर दिमाखात विसावलेला आहे. पारगडची हद्द संपली की दक्षिणेकडे कोकण लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द लागते. या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत.
किल्ल्याचे नाव : पारगड
समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 750 मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी
तालुका : चंदगड
जिल्हा : कोल्हापूर.
जवळचे गाव : इसापूर, ता. चंदगड.
डोंगररांग : कोल्हापूर, सह्याद्री.
सध्याची अवस्था : डागडुजी करणे आवश्यक.
पारगडला कसे जाल? / How to go to Pargad?
कोल्हापूरहून 146 कि.मी. अंतरावर चंदगड आहे. चंदगडहून 33 कि.मी. अंतरावर ‘पारगड’ विसावलेला आहे. कोल्हापूरहून चंदगडला जाण्यासाठी एस.टी.बसची सोय आहे. चंदगडहून पारगडजवळ असलेल्या इसापूरला जाणारी बस दुपारी 12:00 वाजता आहे. ही बस चुकल्यास सायंकाळशिवाय दुसरी बस नाही. इसापूरहून 5 कि.मी. अंतरावर म्हणजे अवघ्या पाऊण तासाच्या वाटेवर ‘पारगड’ लागतो. आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण आणि थंडगार हवा यामुळे इसापूरहून पारगडला चालत जाण्यास काहीही वाटत नाही. अगदी रमतगमत जाता येते. उन्हाळा असेल तर जांभळे, करवंदे, अळू इत्यादी रानमेवा खात-खात जाता येते.
सध्या मुंबई-पारगड बस सेवा सुरू आहे. ही बस मुंबई-कोल्हापूर- चंदगड-इसापूर-पारगड अशी जाते. पारगडच्या पायथ्यापर्यंत बससेवा व खासगी वाहने जात असल्यामुळे पारगड पाहण्याचा आनंद विनाश्रम लुटता येतो.
पारगडाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. 48 एकर क्षेत्रफळ लाभलेला टुमदार असा किल्ला खूप देखणा आणि उंचावर असल्यामुळे उन्हाळ्यात खूप मौज येते. पावसाळ्यात मात्र ढगांच्या रांगा पारगडावर येऊन थडकतात आणि दाट धुक्यांनी पारगड जेव्हा झाकोळला जातो, तेव्हा येणारा अनुभव चित्तथरारक असाच येतो.
इतिहास: History
महाराष्ट्रातील स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘ज्याचे किल्ले, त्याचे राज्य’ हे ओळखले होते. म्हणूनच त्यांनी किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन किल्ल्यांच्या बांधणीसाठी विशेष लक्ष दिले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण टोकावर असलेला ‘पारगड किल्ला’ शिवरायांनी खूप दूरदृष्टीने बांधून घेतला होता. विजापूरची आदिलशाही आणि कोकण, गोव्यात असलेले पोर्तुगीज, डच, इंग्रज यांच्यावर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशानेच त्यांनी हा किल्ला बांधून घेतला.
इ. स. 1670 मध्ये सिंहगड (कोंडाणा) ताब्यात घेताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडला होता. तेव्हापासून ‘गड आला, पण सिंह गेला’ ही म्हण रूढ झाली. त्यानंतर इ. स. 1676 च्या दरम्यान शिवरायांनी ‘पारगड’ किल्ला बांधून घेतला आणि तानाजी मालुसरेंचा पुत्र रायबा मालुसरेची पारगडचा किल्लेदार म्हणून नेमणूक केली. शिवरायांनी पारगडसंदर्भात तेथील गडकऱ्यांना आदेश दिला होता की, ‘जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत गड जागता ठेवाग
शिवरायांची ही आज्ञा राजाज्ञा मानून गडकऱ्यांनी आपली कामगिरी चोख बजावली होती. गडावरच्या मावळ्यांनी आजपर्यंत गडावरील पहारा जागता ठेवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे व शेलार मामांचे वंशज कोंडिबा शेलार आजही गडावर वास्तव्य करून आहेत. शिवाय त्या काळातील मावळ्यांचे वंशजही गडावर राहतात. ऊन, बारा, पाऊस सहन करत आपल्या पूर्वजांचे साक्षीदार म्हणून गडावर तग धरून आहेत.
इ. स. 1689 मध्ये औरंगजेबचा मुलगा मुअज्जम याने गडावर हल्ला करून गड घेण्याचा प्रयत्न केला होता; पण तो प्रयत्न गडावरील मावळ्यांनी हाणून पाडला.
इ. स. 1857 च्या उठावात सारा भारत इंग्रजांनी जिंकला; पण पारगड तसाच राहिला. इंग्रजांचे तिकडे लक्षच गेले नाही. त्यामुळे तो अजिंक्यच राहिला.
इ. स. 1784 मध्ये इंग्रजांनी पारगड आपल्या ताब्यात घेतला होता. त्या वेळी इंग्रजांनी आपली सत्ता संपूर्ण भारतभर स्थापन केली होती. इंग्रजांनी पारगडावरील सैन्याचा आदर केला होता. या गडाचे पूर्वज आप्पाजी बीन येसाजी मालुसरे यांना किल्लेदार म्हणून नेमले. त्याला दरमहा 32 रु. ९9आणे मानधन ठरलेले होते. हे मानधन 1850 पर्यंत बेळगावच्या तहसील कार्यालयातून मिळत होते. याशिवाय सैन्यात भरती करून घेण्यासाठी पारगडच्या जवानांना अग्रक्रम दिला जाई. 1940 नंतर ही प्रथा बंद झाली.
1952 पर्यंत पारगडावर 1500 लोकवस्ती व 200 घरे होती. 100 पेन्शनर मंडळी होती. सध्या बोटावर मोजण्याइतकेच लोक पारगडावर राहतात. बाकीचे उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
प्रवेशद्वार :Entrance
आपण गडावर जाण्यासाठी जेथून प्रवेश करतो तेथेच पूर्वी प्रवेशद्वार होते. प्रवेशद्वार सध्या नष्ट झाले आहे. गड चढून जाण्यासाठी आपणास सुमारे 200 पायऱ्या चढून जावे लागते. गड चढण्यापूर्वी गडाच्या कपारीतून पन्हाळीकडे थंडगार पाणी येते. तेथे फ्रेश व्हायचे.गड चढायला सुरुवात करायची .गडाच्या का खड्या असल्यामुळे पायऱ्या चढताना थोडी दमछाक होते. पण गडावरील आल्हाददायी वातावरणामुळे सगळा शीण निघून जातो.
तीन तोफा : Tin tofa
गडावर प्रवेश करताच प्रथम दृष्टिक्षेपात येतात त्या तीन तोफा होय.गडाच्या संरक्षकच. कधी काळी याच तोफा शत्रूवर आग ओकत धडाडल्या असतील. इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आजही त्या गडावर विसावल्या आहेत.
हनुमान मंदिर: Hanuman temple
समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमान मंदिरे उभारली त्यांची प्रेरणा घेऊन अनेक गडांवरही मंदिरे बांधली गेली. मंदिरात सुमारे चार फूट उंचीची हनुमानाची मूर्ती आहे. मूर्ती अतिशय सुंदर असून हनुमानाच्या कानात भीकबाळ्या आहेत. भिकबाळ्या असलेल्या रूपातील हनुमानाची मूर्ती विशेषतः कोठे पाहायला मिळत नाही.
गडकऱ्यांच्या वंशजांची वसाहत:
गडावर आजही गडकऱ्यांच्या वंशजांची वसाहत आहे. ऊन, वारा, पाऊस यांना सामोरे जाण्यासाठी बांधलेली टुमदार पण साधी घरे आवश्य पाहावीत अशी आहेत.सध्या येथे बंगलेही पाहायला मिळतात. येथील वसाहतीत तानाजी मालुसरे यांचा वंशज बाळकृष्ण मालुसरे यांच्या घरी देव्हाऱ्यात तानाजी मालुसरे यांची तलवार आणि कवड्यांची माळ पाहायला मिळते. तेथे गेल्यावर तानाजी मालुसऱ्यांच्या पराक्रमांची निश्चित आठवण येते.
भवानी मंदिर:Bhavani temple
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी मातेवर खूप श्रद्धा होती. त्यामुळे अनेक गडांवर भवानी मातेची मंदिरे पाहायला मिळतात. हे मंदिरही छत्रपती शिवरायांनी बांधून घेतले होते. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार करून ते टापटीप ठेवले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या मंदिरात छत्रपती शिवरायांच्या जीवनपटातील काही प्रसंगचित्रे फोटोच्या रुपात पाहायला मिळतात.संत रामदास हे शिवरायांचे गुरू नाहीत;पण येथे एक फोटो रामदास आणि शिवाजी महाराज गुरू-शिष्य रूपात आहे.हा फोटो पाहून मन विषण्ण होते.येथे येताच वातावरण ‘जय भवानी ! जय शिवाजी !! असेच होते.
गणेश मंदिर:ganesh temple
गडावर असलेले आणखी एक मंदिर म्हणजे गणेश मंदिर होय.या गणेश मंदिराचे बांधकाम आधुनिक काळातील वाटते .ती मूर्ती मात्र शिवकालीन वाटते.गणेशाचे दर्शन घेऊन पुढे तलावाकडे जायचे.
पारगडावरील तलाव पाहिल्यानंतर राजगडावरील पद्मावती तलावाची येते. हा तलाव खडकात खोदून काढलेला असून तलाव खोदताना मिळालेले दगड तटबंदीसाठी वापरले असावेत असे वाटते. उन्हाळ्यातही या तलावाचे पाणी आटत नसले तरी उघड्यावरचे पाणी पिण्याचे मात्र धाडस होत नाही.
पिण्याच्या पाण्याची व्यावस्था: Provision of drinking water
गडावर एकूण अठरा विहिरी असून येथी लोकवस्तीला पुरेल इनके पाणी येथे उपलब्ध आहे.पण उन्हाळ्यात मोटार पंपाच्या साहाय्याने गडाखालून पाणी खेचले जाते.
महाराजांची सदर: Maharaj sadar
गडावरील सर्वात उंच ठिकाण म्हणजे ‘महाराजांची सदर होय. या सदरेवर सध्या शिवरायांचा ब्राँझ धातूचा पुतळा बसवलेला आहे.
चोर दरवाजा: chor darwaja
गडाच्या पश्चिम दिशेला जी तटबंदी आहे, त्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. सध्या हा दरवाजा बुजून गेला आहे.
गडावरील सांडपाणी वाहून नेण्याचीही सोय आहे. हे पाणी जेथून जाते, त्याला ‘नागझरी” म्हणतात.
महादेव मंदिर:Mahadev temple
गडाच्या उत्तरेकडील बाजूला ‘शिवमंदिर आहे. मंदिरात शिवलिंगा आणि शंकराची मूर्ती आहे.
सध्या पारगडावरील लोकवस्तीला ओहोटी लागली आहे. अनेक लोक स्थलांतरित झाले आहेत. येथील हवा आरोग्यदायी आहे. पारगडच्या परिसरात औषधी वनस्पतींचा खजिना आहे.छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून ‘पारगड’ जतन करून ठेवायला हवा.