पर्यावरण दिन / Environment day

5 जून हा पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो.खरं तर केवळ एक दिवस पर्यावरण दिन साजरा करून काहीच उपयोग होत नाही.त्यामुळे पर्यावरणाचे पर्यायाने संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे.पर्यावरणाबाबत जागृती खूप होऊनही म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली नाही.

ध्वनिप्रदूषण,हवा प्रदूषण, जमीन प्रदूषण, जलप्रदूषण आणि अन्नप्रदूषण सुद्धा अलीकडे खूप वाढत चालले आहे.या सर्व बाबी पर्यावरणाशी निगडित आहेत.पण लक्षात कोण घेतो..? आपण फक्त सल्ले देण्यात पुढाकार घेतो.माळावर बिया फेकायला सांगतो.झाडे लावायला सांगतो,वृक्षभेट द्यायला सांगतो,’प्लॅस्टिक टाळा ‘असा फुकटचा सल्ला देतो;पण अंमलबजावणी मात्र काहीच करत नाही.

पर्यावरणाच्या दिवसेंदिवस होत असलेल्या ऱ्हासामुळे संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहे.जैवविविधतेची शृंखला बिघडली आहे.आपण पुढच्या पिढीच्या उदरनिर्वाहासाठी बरेच काही मिळवून ठेवण्यासाठी धडपडत असतो.उद्योग निर्मिती करतो.यांतूनच पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो.आज प्रत्येक शहराबाहेर आणि खेड्याबाहेर सुद्धा प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात.वैद्यकीय कचरा वाढला आहे.कारखानदारी अतिरिक्त झाली आहे.प्रचंड वृक्षतोड सुरू आहे.नद्या प्रदूषित होत आहेत.शुद्ध पाणी मिळणे दुर्मिळ झाले आहे.अशा परिस्थितीत पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

संपूर्ण मानवजात या सर्व बाबींना जबाबदार आहे.आता हे पर्यावरण सुस्थितीत टिकवण्यासाठी मानवजातीनेच कंबर कसली पाहिजे.तरच उद्याचा सूर्य आपल्या पुढच्या पिढीला पाहायला मिळणार आहे.विचार करूया.चिंतन करूया आणि पर्यावरणाचा दर्जा सुधारण्यासाठी आजपासूनच सुरूवात करूया.

Leave a comment