नळदुर्ग किल्ला : Naldurg Fort

महाराष्ट्राचे इतिहासकालीन वैभव म्हणजे महाराष्ट्रातील गडकोट, किल्ले, प्राचीन वास्तू होय. हे वैभव आपण जपले पाहिजे.गड‌कोट किल्ल्यांचे रक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. त्याच बरोबर या ऐतिहासिक साधनांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे. म्हणूनच लेखन रुपाने वाचकांसमोर ही माहिती पोचवणे हे माझे कर्तव्य आहे. असे समजून या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेची लेखन रुपाने करत असलेली जपणूक आपण वाचावी हीच अपेक्षा ठेवून लिहिण्याचा वसा घेतला आहे. आता मी तुम्हाला Naldurg Fort ची ओळख करून देणार आहे.

गडाचे नाव : नळदुर्ग किल्ला.

किल्ल्याचा प्रकार : भुईकोट किल्ला.

समुद्र सपाटीपासून उंची: 670 मी

चढाईची श्रेणी : सोपी

सध्याची अवस्था : चांगली

जवळचे शहर : तुळजापूर

तुळजापूर पासून अंतर : 33 किलोमीटर

तालुका : तुळजापूर

जिल्हा : धाराशिव (उस्मानाबाद)

नळदुर्ग किल्ला पाहायला तुम्ही कसे जाल ? How to go to see Naldurg Fort?

* तुम्ही तुळजापूरची तुळजाभवानी पाहायला आला असाल तर तेथून नळदुर्ग किल्ला 33 किलोमीटर अंतरावर आहे.
* जिल्हयाचे ठिकाण द्वाराशिव येथे तुम्ही आला असाल तर तेथून नळदुर्ग किल्ला 62 किलोमीटर अहि.
* सोलापूरचा किल्ला पाहून नळदुर्ग किल्ला पाहायचे झाले तर 47 किलोमीटर अंतर आहे.
* * तुम्ही अक्कलकोट मध्ये असाल तर अक्कोलकोट पासून नळदुर्ग किल्ला 40 किलोमीटर अंतरावर आहे.

* किल्लारी या भूकंपग्रस्त गावापासून नळदुर्ग किल्ला 54 किलोमीटर अंतरावर आहे.

नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास: History of Naldurg.

नवदुर्ग किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी कर्नल मेडोज टेलर या इंग्रज अधिकाऱ्याने या किल्ल्याबद्द‌ल काय उद्‌गार काढले आहेत ते पाहूया —-

The fort of Naladurg is one of the most interesting places I have ever seen.

कर्नल टेलर यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत की जे काही किल्ले पाहिलेत, त्यापेक्षा हा किल्ला अद्‌भुत आहे. आकर्षक आहे.

नळदुर्ग किल्ला इ.स. 1350 पूर्वी कल्याणीच्या चालुक्य घराण्याकडे होता. 11 व्या 12 व्या शतकात चालुक्य घराणे प्रबळ सत्ताधारी होते. त्यानंतर दक्षिण भारतात बहमणी सत्ता फोफावली.गुलबर्गा, बिदर ही त्यांची राजधानीची केंद्रे इ.स 1351 ते इ स.1480 इतक्या दीर्घकाळ पर्यंत हा किल्ला बहमनी सत्तेकडे होता.

यथाकाळ बहमनी राज्यात कलह निर्माण झाला त्यातून आदिलशाही, बरीद‌शाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही अशा पाच प्रबळ सत्ता निर्माण झाल्या .यांतील विजापूरच्या अदिलशाहाने या नळदुर्ग किल्ल्याचा ताबा घेतला. भुईकोट किल्ले हे मजबूत बांधावे लागतात. कारण अशा किल्ल्यांवर हल्ले करणे सोपे जाते. नळदुर्ग हा किल्ला असाच बळकट किल्ला आहे. आणि या मजबूत किल्ल्याकडे विजापूरचा आदि‌लशाहा आकर्षित झाला. त्याने स्वतः इ.स. 1558 रोजी या किल्ल्याला भेट दिली होती. सध्या जो किल्ला उभा आहे, तो विजापूरचा तत्कालीन आदिलशाहा अबुल मुझफ्फर अली पहिला आदिलशाह याने बांधून घेतला होता .त्याने या किल्ल्याचे नाव बांधून पूर्ण झाल्यावर ‘शाहदुर्ग’ असे ठेवले होते; पण ते नाव जास्त काळ टिकले नाही.

हा किल्ला फार वर्षापूर्वी नळराजाने बांधला होता. असाही काही ठिकाणी उल्लेख आहे.

इ.स. 1677 साली दिल्लीचा बादशाह औरंगजेब याने हा किल्ला जिंकून घेतला आणि हैदराबादच्या निजामशाहाकडे सोपवला.

छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांना स्वराज्य बांधणीच्या धामधुमीत नळदुर्ग किल्ला आपल्या ताब्यात कधी घेता आला नसला तरी पुढे बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे यांच्या काळात हा गड सदाशिवराव भाऊ, दत्ताजी शिंदे यांनी 2 जानेवारी 1758 रोजी नळदुर्ग ताब्यात घेऊन प्रथमच या किल्ल्यावर भगवा फडकवला;पण हैद‌राबाद‌च्या निजामशाहाने हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.

इ.स. 1799 मध्ये निजाम आणि इंग्रज यांच्यात युद्ध झाले. त्यांत निजामाचा पराभव झाल्याने तहातील बोलणी नुसार इंग्रजांनी आपले सैन्य नळदुर्गावर ठेवले. आणि निजामशाह मांडलिक झाला. पुढे 1850 मध्ये निजामाने इंग्रजांकडून 64 लाख रुपये कर्ज घेतले होते आणि या कर्जापोटी नळदुर्ग किल्ल्यासह वऱ्हाड, रायचूर किल्ले इंग्रजांना दिले 1857 च्या उठावात निजाम इंग्रजांच्या बाजूने राहिला .त्या बदल्यात इंग्रजांनी नळदुर्ग निजामशाहाला परत दिला.

भारत स्वतंत्र झाला तरी नळदुर्ग निजामशाहाकडे होता .1948 साली भारत सरकारने 500 संस्थाने खालसा केली आणि नळदुर्ग भारत सरकारच्या ताब्यात गेला.

नळदुर्गावरील प्रेक्षणीय स्थळे: Spectacular Places of Naldurg

महाद‌रवाजा Mahadarwaja:

गडावर जाण्यासाठी खंदक ओलांडावा लागतो .आता खंद‌कावर जाण्यासाठी पूल आहे पूर्वी हा पूल काढता-घालता येईल असा बांधला होता. एक छोटेखानी कमान ओलांडून गेल्यावर पुढे आणखी एक दरवाजा लागतो. त्यानंतर प्रवेशद्वार म्हणजे महाद‌र‌वाजा लागतो. हा दरवाजा आजही मजबूत स्थितीत आढळतो. कमानीला असलेल्या लाकडी दरवाजाची जाडी जवळ जवळ पाऊण फूट आहे. शिवाय त्यावर अनुकुचिदार मोठे मोठे खिळे ठोकलेले आहेत. असे खिळे शनिवारवाड्याच्या दरवाजावर पाहायला मिळतात. दरवाजातून आत गेल्यावर संरक्षक देवड्या लागतात. त्यापुढील चौथ‌ऱ्यावर 4 तोफा आहेत. त्यांतील एक तोफ पंचधातूची आहे.

किल्ल्याच्या महाद‌र‌वाजावर स्वातंत्रादिनी आणि प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकवला जातो.

किल्लेदाराचा वाडा: Killedar Palace:

हत्तीखाना ओलांडल्यावर पुढे पडक्या इमारती लागतात. त्यानंतर किल्लेदाराचा वाडा लागतो. सध्या हा वाडा महाविद्यालय भरवण्यासाठी वापरला जातो.

जामा मशिद: Jama Masjit

गडावर 12 मीटर x 9 मीटर लांबीची जामा मशिद सुद्धा पाहायला मिळते. ही मशिद शुभ्र पांढ‌ऱ्या रंगाने रंगवलेली आहे.

पाणी महाल: Water Palace

गडावरील सर्वांत आकर्षक आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणजे पाणीमहाल होय. हा महाल विजापूरचा आदिलशाह सुलतान अबुल मुजफ्फर अली याने किल्ला बांधतेवेळीच बांधून घेतला होता (इ.स. 1560). येथे प्रथम 174 मी लांब, सरासरी 10 मीटर रुंद आणि 19 मीटर उंच असणाऱ्या बंधाऱ्याच्या पोटात पाणी महाल बांधलेला आहे.

पाणी महालाच्या बंधाऱ्यावरून जेव्हा पाणी पडते, ते दृश्य किती विलोभनीय असते, हे प्रत्यक्ष पाहणाऱ्यालाच कळते. या महालाला जोडूनच शौचकूप, स्नानगृह आहेत.

अगदी कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या धाराशिव जिल्ह्यात असणारा नळदुर्ग किल्ला मराठवाडा प्रशासकीय विभागात येतो.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

गडावर मुक्काम करण्याची अशी सोय नाही. पण गावात नाष्टा, जेवण मिळू शकते. त्यामुळे मुक्कामाची आवश्यकता भासत नाही

Leave a comment