विजयदुर्ग / Vijaydurg Fort

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून Vijaydurg Fort कडे पाहिले जाते. तिन्ही बाजूला विशाल समुद्र आणि एका बाजूला जमीन असलेल्या या किल्ल्याचे नाव शिवपूर्वकाळात ‘घेरिया’ असे होते. शिवरायांनी या किल्ल्याचे नामकरण ‘Vijaydurg’ असे केले. याच विजयदुर्गबद्दल आता आपण माहिती घेऊ.

किल्ल्याचे नाव : विजयदुर्ग

समुद्रसपाटीपासून उंची: 5 मी.

चढाईची श्रेणी: सोपी

किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग

ठिकाण : देवगड

जिल्हा : सिंधुदुर्ग

जवळचे गाव : विजयदुर्ग

डोंगररांग: अस्तित्वात नाही

सध्याची अवस्था ;व्यवस्थित. डागडुजी करणे आवश्यक.

स्थापना : 1193

विजयदुर्गला कसे जाजचे? How to go to Vijaydurg?

विजयदुर्ग किल्ला मुंबईहून 485 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून विजयदुर्गला जाणाऱ्या बसेस आहेत.

पुण्याहून विजयदुर्ग 456 किमी अंतरावर आहे. पुण्याहून विजयदुर्गला जाणाऱ्या बसेस आहेत.

कोल्हापूरहून विजयदुर्ग 144 किमी अंतरावर आहे. कोल्हापूरहूनही विजयदुर्गला जाता येते. कुणकेश्वर-तळेवाडी रोडने जावे लागते.

सिंधुदुर्ग-मालवणहून विजयदुर्गला जाता येते. मालवण ते विजयदुर्ग अंतर 53 किमी आहे.

रत्नागिरीहून पावसमार्गे विजयदुर्गला जाता येते. रत्नागिरी ते विजयदुर्ग 95 किमी अंतर आहे.

विजयदुर्गचा इतिहास :History of Vijaydurg

‘विजयदुर्ग’ हा अभेद्य सागरी किल्ला वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर सुमारे 900 वर्षांचा इतिहास साक्षीला घेऊन आजही ताठ मानेने उभा आहे. कोल्हापूरजवळच पन्हाळा येथे शिलाहार राजघराण्याची राजधानी होती. शिलाहार राजवंशातील राजा भोज (दुसरा) याने अनेक किल्ले बांधले. विजयदुर्ग किल्ल्याचे बांधकामही त्यानेच इ. स. 1193 मध्ये सुरू केले. इ. स. 1205 मध्ये किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले.

इ. स. 1228 मध्ये देवगिरीच्या यादवांनी शिलाहारांचे राज्य बुडवले. कोल्हापूर प्रांतात यादवांची सत्ता प्रस्थापित झाली. कोकण प्रांतातही यादवांनी आपले बस्तान बसवले. इ. स. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव करून कोकण प्रांत बळकावला. पुढे बहमनी सत्तेचा सुलतान अल्लाउद्दीन अहमदशाहने विजयनगरच्या राजाचा पराभव करून दक्षिण भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली.

इ. स. 1490 ते 2526 या काळात बहमनी सत्तेचे पाच तुकडे झाले. त्यात विजापूरच्या आदिलशहाकडे कोकणचा प्रांत आला.

जवळजवळ सव्वाशे वर्षे विजयदुर्ग किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. 1653 मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला आणि स्वराज्यात आणला. शिवरायांनी पूर्वीचे ‘घेरिया’ हे नाव बदलून विजयदुर्ग असे ठेवले. आजही हा किल्ला ‘विजयदुर्ग’ या नावानेच ओळखला जात आहे.

अलिबागचा पाणकोट किल्ला [कुलाबा किल्ला] / Kulaba Fort: Alibag

छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग जेव्हा जिंकून घेतला, त्या वेळी किल्ला पाच एकर क्षेत्रात विस्तारलेला होता. किल्ला ताब्यात येताच शिवरायांनी किल्ल्याचा विस्तार केला. सध्या हा किल्ला चौदा एकरात आहे. पूर्वेच्या बाजूची तटबंदी, हनुमान मंदिर शिवरायांनीच बांधून घेतले होते. सत्तावीस बुलंद बुरूज बांधले. त्या काळी शिवरायांनी किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी अडीच लाख रुपये खर्च करून किल्ल्याचा कायापालट केला होता.

8 फेब्रुवारी 1665 मध्ये छत्रपती शिवराय आपल्यासोबत 85 गलबते आणि तीन मोठ्या महागिऱ्या घेऊन विजयदुर्ग किल्ल्यातून प्रसिद्ध बेदनूर राज्यातील बसनूर या ठिकाणी स्वारीला रवाना झाले होते.

शिवरायांनी विजयदुर्गच्या आरमाराची सूत्रे कान्होजी आंग्रे याच्याकडे दिली होती. त्यानंतर आरमार दलाची सूत्रे तुळाजी आंग्रे याच्याकडे आली. तुळाजी आंग्रेनंतर संभाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांनी हा गड मराठ्यांच्या ताब्यात ठेवण्यासाठी पोर्तुगीज, डच, इंग्रज यांच्याशी संघर्ष ठेवला.

18 जून 1718 रोजी आंग्ग्रांचे आरमारी दल नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी विजयदुर्गावर चढाई केली. या मोहिमेत मॅन्युअल डी कॅस्ट्रो हा पटाईत दर्यावर्दी इंग्रजांचा कॅप्टन होता. पावसाळा सुरू झाल्यामुळे गडावरील बरेचसे सैन्य रजेवर गेले होते. अगदी मूठभर सैन्याने इंग्रजांशी निकराचा लढा दिला. या लढाईत मराठ्यांचा विजय झाला.

पहिली मोहीम फसल्यामुळे इंग्रजांनी 1720 मध्ये पुन्हा विजयदुर्गवर हल्ला चढवला. त्या वेळी गडाचा किल्लेदार रुद्राजी अनंत होता. त्याने मोठा संघर्ष करून इंग्रजांना पळवून लावले. त्यानंतर 1724 मध्ये डचांनी विजयदुर्गवर हल्ला केला. डचांनाही रुद्राजीने धूळ चारली.

तुळाजी आंग्रे हा शक्तिशाली दर्यावर्दी होता. तो बलवान होता. इंग्रज, डचच काय पेशव्यांनाही तो जुमानत नव्हता. याचा सुगावा इंग्रजांना लागला होता. इंग्रजांनी पेशव्यांशी हातमिळवणी करून इ. स. 1756 मध्ये पेशवे आणि इंग्रज यांनी मिळून विजयदुर्गवर हल्ला चढवला. त्यात तुळाजीचे आरमार जळून खाक झाले. विजयदुर्गवर इंग्रजांचा ध्वज फडकला गेला. स्वकीयांच्या मतभेदामुळे परक्यांचे फावले. इंग्रजांनी गडावरील अमाप संपत्ती पळवली.

12 ऑक्टोबर 1756 मध्ये इंग्रज आणि पेशवे यांच्यात तह झाला. या तहानुसार विजयदुर्ग पेशव्यांच्या ताब्यात गेला. पेशव्यांनी रुद्राजी धुळप यास किल्लेदार बनवून त्यांच्या हातात विजयदुर्गच्या आरमाराची सूत्रे दिली.

इ. स. 1763 मध्ये विजयदुर्गच्या आरमार दलाची सूत्रे आनंदराव घुलप यांच्याकडे पेशव्याने दिली. त्याने पोर्तुगिजांचे संतान नावाचे लढाऊ जहाज पकडून आणले होते. विजयदुर्ग गावात आजही धुळपांचा राजवाडा पाहायला मिळतो.

इ. स. 1818 मध्ये महाराष्ट्रातील पेशव्यांची सत्ता संपुष्टात आली. इंग्रजांचा अंमल सुरू झाला. महादजी शिंदेंच्या मृत्यूनंतर मराठी सत्तेला अवकळा प्राप्त झाली होती. विजयदुर्गही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

विजयदुर्गला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दि. 13 डिसेंबर 1916 या दिवशी घोषित करण्यात आले होते.

किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे :Famous points of Vijaydurg

मारुतीचे मंदिर:Maruti Temple

किल्ल्याच्या पायथ्याशीच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मारुतीचे मंदिर आहे. शक्तीचे उपासक म्हणून शिवरायांनी अनेक गडावर मारुतीची मंदिरे बांधली. त्याप्रमाणेच या गडावरही बांधले.

मुख्य दरवाजा :Main Gate

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा दरवाजा वापरत असत. मुख्य दरवाजाला लागून बळकट अशी तटबंदी आहे. मुख्य दरवाजाला संरक्षण देणाऱ्या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर 30 मीटर उंचीची तटबंदी लागते. मुख्य दरवाजाच्या आत लहान दरवाजा होता. त्यास दिंडी दरवाजा म्हणत.

खलबतखाना :Discussion Room

दिंडी दरवाजाच्या डाव्या बाजूस खलबतखाना नावाची इमारत आहे. येथे सभा, बैठका होत. दारूगोळ्याचे कोठार खलबतखान्याच्या समोरच दारूगोळ्याचे कोठार आहे.

भुयार : Cave

विजयगडावर असलेले अद्भुत भुयार आजही पाहायला मिळते. शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी गुप्त मार्गाने निसटून जाण्यासाठी या भुयाराचा उपयोग केला जात असावा असे वाटते. भुयाराच्या बाजूने तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

तट आणि टेहळणी बुरूज :Towers

किल्ल्याचा तट आजही मजबूत आहे. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किल्ल्यावर अठरा टेहळणी बुरूज आहेत. त्यातील काही बुरूज उद्ध्वस्त झाले आहेत.

इतर काही स्थळे :Other Famous Points

तटाखाली उतरून आल्यावर चुन्याचा घाणा दिसतो. गडाचे बांधकाम करण्यासाठी हा चुन्याचा घाणा वापरला गेला असावा. गड बांधण्यासाठी शिसे, चुना, रेती, गूळ, हरड्याचे पाणी, नारळाचा काथ्या यांचे मिश्रण एकत्र करून बांधकामासाठी वापरले जात असे.

चुन्याच्या घाण्याच्या बाजूला गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. लागूनच जुने गेस्ट हाऊस, साहेबाचे ओटे, भवानी मातेचे मंदिर, जखिणीची तोफ इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :Living and eating arrange

विजयदुर्ग किल्ल्याला लागूनच विजयदुर्ग गाव आहे. गाव मोठे आहे. विजयदुर्ग गावात भरपूर खाणावळी, हॉटेल्स आहेत. राहण्यासाठी लॉज आहेत. त्यामुळे गड पाहण्यासाठी आपणास मुक्काम करायचा झाल्यास आरामात विजयदुर्ग गावात राहता येते. शाकाहारी, मांसाहारी जेवणावर ताव मारता येतो.

Leave a comment