Assembly Election-2024 : माहीम विधानसभा मतदारसंघ ,माहीमची लढत दुरंगी की तिरंगी ? अमित ठाकरे जिंकणार की हरणार?

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक November-2024.

मुंबईत शिवसेनेची स्थाप‌ना बाळासाहेब ठाकरे यांनी माहीममध्ये केली होती. माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होय. येथील माणसांच्या नसानसात शिवसेना भिनलेली आहे. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेशी काडीमोड घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना [मनसे] स्थापन केली. हे शिवसेनेला लागलेले पहिले ग्रहण होय. राज ठाकरे यांचा शिवसेनेत दबद‌बा होता. शिवसैनिक त्यांना प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणायचे; पण ते शिवसेनेवून फुटून गेल्यावर शिवसेनेचा आवाज, ताकद काही अंशी कमी झाली. 2009 च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मन‌सेने दमदार एण्ट्री केली.मनसेचे 13 आमदार निवडून आले. नाशिक मनपा मनसेच्या ताब्यात आली; पण 2009 नंतर मात्र मनसेला ओहोटी लागली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी संयमी नेतृत्व करत शिवसेनेचा आब कायम राखला. राज ठाकरे यांची धरसोड वृत्तीच त्यांना मारक ठरली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणताही एक मु‌द्दा त्यांनी धसास लावला नाही . त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडत गेला.

एप्रिल 2024 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता: तरी सुद्धा महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला होता. माहीममध्ये मात्र लोकसभेला राहूल शेवाळे यांना मनसेच्या पाठिंब्याच्या जोरावर 13900 मतांचे मताधिक्य मिळाले. आणि याच जोरावर ते निवडून आले.

20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या दुटप्पी धोरणाचा राज ठाकरे यांना चांगलाच अनुभव आला. भाजपाच्या नादाला लागून राज ठाकरे यांचे हात चांगलेच पोळले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोड‌णाऱ्या भाजपावर राज अकरे यांनी विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम निवडणूक होण्यापूर्वीच त्यांना अनुभवायला मिळाला.

Maharashtra Assembly Election-2024. महाराष्ट्र विधानस‌भा रणधुमाळी. कोण मारणार बाजी?महाविकास की महायुती?

अमित ठाकरे यांच्या रुपाने राज ठाकरे यांनी 2024 च्या निवडणुकीत हुकमाचा एक्का बाहेर काढला आहे. सुरु‌वातीला भाजपाने पाठिंबा दिल्याचा बहाणा केला आणि एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर या वि‌द्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपाची चांगलीच गोची झाली. त्यांनी आपण युती धर्म पाळणार असल्याचे जाहीर करून हात झटकले. आता पड‌द्यामागे काय घडते यावरच अमित ठाकरे यांचे भवितव्य अवलंबून आहे.

सदा सरवणकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. गुवाहाटीच्या प्रवासात ते होते. उद्धव सेनेचे नेतृत्व डावलून त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. गद्दारीचा फटका त्यांना कितपत बसणार? भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) काय करणार ? ते खंबीरपणे सदा सरवणकर यांच्या पाठिशी राहणार का ? लोकसभेला शिंदे सेनेला जी मते मिळाली त्यातून मनसेची मते आता बाजूला काढावी लागणार. त्यामुळे सदा सरवणकर यांचे काय होणार ? या प्रश्नाचि उत्तर जनताच 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पेटीतून देईल.

उद्धव सेनेने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. माहीम मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची मते महेश सावंत यांच्या पारड्यात जातील. लोकसभा 2024 ला उद्धव सेनेला जेवढी मते मिळाली तेवढी मते जरी आता महेश सावंत यांना मिळाली, तरी महेश सावंत यांचा विजय निश्चित मानला जातो; पण अमित राज ठाकरे यांच्या उमेदवारीने मतांचे ध्रुवीकरण होणे अटळ आहे. राज ठाकरे यांचा भाजपाचा पाठिंबा मिळवण्याच्या केविलवाणा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. त्यामुळे त्यांना आता सगळ्यांवरच टीका करणे भाग पडले आहे.

घोडा-मैदान जवळ येत आहे. हळूहळू वातावरण तापत आहे. बघूया जनतेचा कौल कुणाकडे झुकतो ते. त्यावरच येथील उमेद‌वारांचे भवितव्य अवलंबून आहे.

Leave a comment