असितमुनीचे आगमन. Arrival of Asitmuni
वैशाख शुद्ध पौर्णिमेला इ. स. पूर्व 563 रोजी गौतम बुद्धाचा जन्म झाला. बघता बघता ही बातमी सर्वदूर पसरली .त्यावेळी हिमालय पर्वतात राहणाऱ्या असित मुनीलाही ही बातमी समजली. असितमुनी तातडीने शुद्धोदन राजाचा पुत्र पाहण्यासाठी कपिलवस्तुला आला. राजाने असितमुनीचे सन्मानपूर्वक स्वागत केले आणि राजवाड्यात आसनाची व्यवस्था केली. असितमुनीने राजगृहात प्रवेश करताच तो राजाला उद्देशून म्हणाला,
“हे राजन, तुझा विजय असो. आयुष्यमान भव. राजन, तू आपले राज्य सद्धर्माने चालव.”
असितमुनीने आसन धारण केल्यावर मी बालकाचे मुख पाहायला आलो असल्याचे सांगितले. राजाला खूप आनंद झाला. पण त्यावेळी बाळ झोपले होते. त्यामुळे राजा मुनींना म्हणाला,”मुनीवर, बाळ झोपी गेला आहे. थोडा वेळ वाट पाहावी लागेल.”
यावर असितमुनी म्हणाला,
“राजन, मला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही-थोर तपस्वी, महात्मे जास्त काळ झोपत नाहीत”
असित मुनीचे म्हणणे खरे ठरले. काही वेळातच बाळाला जाग आली. बाळाला बैठकीच्या खोलीत आणले गेले. असित मुनीने बाळाला पाहताच दोन्ही हात जोडून असित मुनीने बाळाला नमस्कार केला. आणि त्याच्या तोंडातून उद्गार निघाले,
” अगदी खात्रीने सांगतो, या पृथ्वीवर अलौकिक पुरुष जन्माला आला आहे. हा महापुरुष बत्तीस लक्षणांनी युक्त आहे. अशा महापुरुषाच्या पुढे दोनच मार्ग असतात. एक संसारात रमून चक्रवर्ती सम्राट बनणे किंवा गृहत्याग करून संन्यास घेणे. संन्यास घेतला तर असा बालक सम्यक बुद्ध होईल. मी अगदी खात्रीने सांगतो, हे बालक गृहस्थाश्रमात रमणार नाही. हा बालक संन्यास घेऊन महान बुद्ध होईल.”
नंतर त्या बालकाकडे पाहून अतितमुनी ढसाढसा रडू लागला. हे दृश्य शुद्धोदनाने पाहिले. शुद्धोदनाला काही सुचेना. त्याने अगदी व्याकूळ होऊन असितमुनीला विचारले,
“हे मुनीवर तुम्ही रडत का आहात ? या बालकाच्या भविष्यात काही विघ्न तर येणार नाही ना?” यावर असितमुनी मनाला,
“”हे राजन, मी या बालकासाठी रडत नाही. याचे भविष्य अगदी उज्ज्वल आहे. मी रडतो आहे ते वेगळ्याच कारणासाठी. मी आता म्हातारा झालो आहे. माझे आयुष्य संपत चालले आहे. हे बालक पुढे बुद्ध होणार. यात तीळमात्रही शंका नाही; पण तो बुद्ध पाहायला मी असणार नाही. याचे मला रडू येत आहे. तो धम्मचक्रप्रवर्तक असेल. ज्याप्रमाणे उंबराचे फूल दुर्मिळ असते. त्याप्रमाणे हे बालक आहे. अशा या महान बुद्धाची पूजा करायला मला मिळणार नाही. म्हणून मला माझे रडू आवरत नाही. हे राजन तू मात्र भाग्यवान आहेस.”
राजा शुद्धोदनाने असिनऋषी आणि त्याचा पुतण्या नरदत्त यांचा योग्य तो सम्मान करून त्यांची पाठवणी केली.
या घटनेनंतर राजा मात्र अस्वस्थ झाला. आपला पुत्र संन्यासी होऊ नये. तो चक्रवर्ती व्हावा असे त्याला वाटत होते. महामायेला पडलेल्या स्वप्नातील पहिली बाजू (म्हणजे हे बाळ सम्राट चक्रवर्ती होणार) खरी व्हावी, असे राजाला वाटत होते. आणि तीच बाजू ख़री होण्यासाठी राजा एक योजना आखणार होता.