बुद्धाचे बालपण आणि शिक्षण- भाग 7
कपिलवस्तूच्या राजा शुद्धोदनाला दोन मुलगे होते. पहिला महामायापासून झालेला आणि दुसरा महाप्रजापतीपासून झालेला. एक सिद्धार्थ गौतम, तर दुसरा नंद. याशिवाय सिद्धार्थाला महानाम, अनुरुद्ध, आनंद हे चुलतभाऊ होते. या सर्वांमध्ये सिद्धार्थाचे बालपण आनंदात चालले होते. लहानपणापासूनच सिद्धार्थ शांत, विचारप्रवर्तक, बुद्धिमान आणि आपल्याच तंद्रीत गुंतलेला असा काहीसा होता.प्रत्येक प्रसंगात स्वतंत्र विचार करणे हा त्याचा स्थायीभाव होता. युद्ध, लढाया लहानपणापासून त्याला आवडत नसत. तो खूप संवेदनशील होता. पण राजघराण्याच्या परंपरेनुसार सिद्धार्थलाही युद्धकला, शस्त्रकला शिकावे लागले होते.
कपिलवस्तु नगरीत ‘अभया’ ही ग्रामदेवता होती. या ग्रामदेवतेच्या प्रथम दर्शनी सिद्धाथनि जावे असे गावातील वडिलधारी, जाणकार मंडळी बोलू लागली.राजा शुद्धोदनाने लगेच तयारी करायला सांगितले. महाप्रजापती सिद्धार्थाला नवीन कपडे घालून ग्रामदेवतेच्या मंदिरात जाण्याची तयारी करू लागली. यावेळी सिद्धार्थ चार-पाच वर्षाचा असेल, त्याने कुतूहलतेने महाप्रजापतीला विचारले, “मावशी, कुठे जायचे आहे आपल्याला?” मावशी म्हणाली, “देवळात!”
शाक्य घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे सिद्धार्थ ग्रामदेवतेच्या दर्शनाला गेला.
वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थ गौतमाच्या शिक्षणाची श्रीगणेशा सुरु झाली. महामायेला पडलेल्या स्वप्नाचे अर्थ ज्या आठ ज्योतिषांनी सांगितले होते, त्या आठ ज्योतिषांना म्हणजे राम, धन, लख्खन, मंती, यण्ण, सुदन्त, भोग व सुयाम यांना शुद्धोदनाने राजवाड्यात बोलावून घेतले आणि सिद्धार्थाला शिक्षणाचे धडे द्यायला सांगितले. हे आठ ज्योतिषी म्हणजे सिद्घार्थाचे पहिले शिक्षक होत.
त्यानंतर सिद्धार्थाला पुढील शिक्षण देण्यासाठी उदिच्च देशातील सबमित्त या शिक्षकाला बोलावून घेतले, सबमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, उपनिषदे, वेदांगे या सर्वांमध्ये पारंगत होता विद्वान होता. राजा शुद्धोदनाने सबमित्ताचे यथोचित स्वागत केले. त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून पाणी सोडले. त्यानंतर सिद्धार्थाला सबनित्त या शिक्षकांकडे शुद्धोदनाने स्वाधीन केले. सबमित्त हा सिद्धार्थाच्या आयुष्यातील दुसरा शिक्षक होय. सबमित्ताने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे सिद्धार्थला शिकवली. सिद्धार्थने ती आत्मसातही केली.
आलारकालामचा शिष्य भारद्वाज याने सिद्धार्थला ध्यानधारणेची विद्या शिकवली. भारद्वाजचा आश्रम कपिलवस्तूतच होता. सिद्धार्थने ध्यान धारणा विद्या सुद्धा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. भारद्वाज हा सिद्धार्थच्या आयुष्यातील तिसरा शिक्षक होय. तत्कालीन परंपरेनुसार शिक्षकांना ‘गुरु ‘असे म्हणत.
गुरु हा सर्वव्यापी शब्द आहे. तो सदासर्वकाल आपल्या शिष्याला मार्गदर्शन करत असतो. तो सर्वार्थाने परिपक्व असतो. म्हणजे शिष्याचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात गुरुचा सिंहाचा वाटा असतो. गुरु ज्ञानानं, विवेकानं परिपक्व असतो. जसे स्वामी विवेकानंद यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही जीवनात काही शिक्षक आले होते, पण गुरु मात्र एकच आणि तो गुरु म्हणजे जिजाऊ होय.जिजामातेनेच शिवरायांना घडवले.
तुमचे लेख वाचण्याजोगे आहेत. धन्यवाद सर
Thanks