Maharashtra Assembly Election-2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल-2024
धक्कादायक की धोकादायक?

एप्रिल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा महायुतीचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात महायुती 45 plus वर जाणार अशी वल्गना करणाच्या महायुतीचे केवळ 17 खासदार निवडून आले आणि महाआघाडीचे 31 खासदार निवडून आले. 17 खासदारात भाजपाचे 9 खासदार एकनाथ शिंदे गटाचे 7, तर अजित पवार गटाचे 1 खासदार निवडून आले; महाआघाडीतील काँग्रेसचे 14 खासदार, उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार, तर शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आले. देशात केंद्र सरकार आणि राज्यात राज्यसरकार भाजपा महायुतीकडे असताना महाराष्ट्रातील जनतेने फोडाफोडीच्या, राजकारणाला कंटाळून महाआघाडीच्या बाजूने कौल दिला. पाच महिन्यानंतर महाराष्ट्रात अशी काय जादू झाली की महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरुन मतदान केले.

न्यायालयीन निकाले लांबणीवर :

महाराष्ट्रातील अडीच वर्षामध्ये दोन मोठे पक्ष फुटले अर्थात देवेंद्र फडणीस यांनी अंतर्गत इडी, सीबीआय ची भीती दाखवून शिवसेनेच्या आमदारांना सुरत, गुवाहटीला नेले. खरे तर महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली गेली. शिवसेनेचे 40 आमदार फुटले आणि सत्तांतर झाले. पुढे अजित पवार यांचावर सिंचन घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांनाही इडी, सीबीआयची भीती दाखवण्यात आली. तेही 40 आमदार घेऊन महायुतीत सामील झाले.अमित शहाने धक्का तंत्र देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले, तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्य‌मंत्री बनवले. पुढे अजित पवार महायुतीत गेल्यावर त्यांना उपमुख्यमंत्री बनवले. या सर्व घटनांवर महाराष्ट्रातील जनता नाराज होती. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील जनतेने मतपेटीतून दाखवला. लोकसभेच्या निवडणूकीतही मोदी, शहा यांनी आपल्याकडे सत्ता असतानाही विकासात्मक न बोलता विरोधकांवर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अशिष शेलार यांनीही विकास कामावर न बोलता टीकेची झोड उठवली. त्याचा महाराष्ट्रातील जनतेवर काहीही परिणाम झाला नाही.सर्वोच्च न्यायालयानेही शिवसेना आणि राष्ट्रवादीकाँग्रेस पक्ष कुणाचा? हा निर्णय देण्यास टाळाटाळ केली. तत्कालीन सरन्यायाधीश यांच्यावर टीकाही होत आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक-2024.

महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर 2024 ला जाहीर झाली. आणि राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. त्यापूर्वी राज्यसरकारने लाडकी बहीण योजना आणून मळलेली प्रतिमा पुसायचा प्रयत्न केला. सरकारच्या तिजोरीवर वारेमाप भर पडला. यानिमित्त कोट्यवधी रुपये उधळले, अशा प्रकारच्या कोणत्याही थेट लाभाच्या योजना अन्य कोणत्याही प्रगत किंवा विकासनशील देशात नाहीत. पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत अशा लाभाच्या योजना राबवण्याची गरज आहे का ? एवढी महाराष्ट्रात गरिबी वाढली आहे का ? मग तुम्ही दहा वर्षात काय केले?दारिद्रय रेषेखालील लोकांचे प्रमाण किती टक्के आहे? हे पैसे नेमके कुणाला दिले? ही मतदानासाठी दिलेली लाच तर नाही का ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

विरोधकांनीही तेच केले किंवा करावे लागले. त्यांनीही महिलांना मासिक 3000 रुपये देण्याचा जाहीरनामा काढला. निवडणूक जाहीर झाली आणि न्यायालयाने अशा लाभाच्या योजनेला स्थगिती दिली. मतदान होईपर्यंत हो गोष्ट लोक विसरु‌नही गेले असतील किरकोळ फरकही झाला असेल.

मोदी-शहांच्या सभांमध्ये खूर्चा मोकळ्याच:

20 नोव्हेंबर 2024 च्या निवडणुकीत मोदी-शहा उतरले; पण त्यांच्या सभेला म्हणावी तशी गर्दी झाली नाही. शरद पवार यांच्यावरील टीका महागात पडते म्हणून त्यांच्यावर टीकाही केली नाही. एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरातील सभा प्लॉप झाली. इकडे शरद पवार, राहूल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी जमत होती. निवडणूक झाली पेट्या बंद झाल्या. संपूर्ण महाराष्ट्रात महाआघाडीचे वातावरण होते.

एक्झीट पोलचा अंदाज

काही एक्झिट पोलनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. तर काही एक्झिट पोलनी महायुतीच्या बाजूने काल दिला. एक्झिट पोलच्या अंदाजाने तर महाराष्ट्रात काट्याची टक्कर वाटू लागली.

धक्कादायक की धोकादायक निकाल ?

एक्सिट पोल नंतर 23 नोव्हेंबर 2024 ला निकाल यायला सुरुवात झाली. इतका एकतर्फी निकाल महाराष्ट्रात कधीही लागला नाही. संपूर्ण देश काँग्रसमय असतानाही कधी असा एकतर्फी निकाल लागला नाही. मग या नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवड‌णुकीत अशी काय जादू झाली की संपूर्ण निकाल एकतर्फी लागला. जसजसे निकाल बाहेर पडू लागले, तसतसा सर्वांनाच आश्चर्याचे धक्के बसू लागले. तासाभरातच निकालाचे वारे एकतर्फी फिरु लागले .सुरूवातीला एक्झिट पोलच्या निकालात 50-50 संधी वाटत असताना तिसऱ्या-चौथ्या फेरीत तरी संपूर्ण महाराष्ट्रात एकतर्फी कल दिसू लाग‌ला. विरोधकांनाच काय, सत्ताधारी लोकांनाही धक्के बसू लागले. नेमके काय चित्र समोर येत आहे? कोल्हापूर जिल्ह्यात गावागावात शांतता पसरली होती. महाआघाडीच्या बाजूने 8-2 होण्याची शक्यता असताना महायुतीच्या बाजूने 10-0 निकाल लागला. संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीच आघाडी 100 च्या खाली येणार नाही असे चित्र असताना असताना महाराष्ट्र विधानसभेचा निकाल एकतर्फी लागला. महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून असे चित्र कधीच निर्माण झाले नाही. शरद पवार सारख्या तळागाळापर्यंत पोहोचलेल्या कसलेल्या नेत्यालाही ते शक्य झाले नाही. मग 20 नोव्हेंबर 2024 च्या निवडणुकीत अशी काय जादू झाली? काँग्रेसची केंद्रात सत्ता असताना शेतकऱ्यांचे 70,000 कोटी कर्ज माफ केले होते. तरीही त्यांना एवढे मोठे यश मिळाले नव्हते. मग 1500 रुपयांच्या लाडकी बहीण योजनेचा एवढा परिणाम होईल का ? पतीच्या माघारी आपला मतदानाचा हक्क स्वतंत्ररीत्या घेण्याइतपत महाराष्ट्रातील स्त्रिया स्वतंत्र विचाराच्या झाल्यात का?संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांचे बांधकाम झाले. यांचा दर्जा कसा होता? ते किती वर्षे टिकतात ? मग हा विकास म्हणायचा का ? महाविकास आघाडीच्या काळातही जे रस्ते झाले, तेही सुमार दर्जाचेच होते. असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात. याची उत्तरे येत्या काळात निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि सरकार देईल का ?

EVM वर लोक शंका का होतात ?

निवड‌णूक आयोगाने गेल्या काही वर्षात म्हणजे भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आल्यापासून निवडणूक निर्णय आयोगाने किंवा न्यायालयांनी कोणताही निर्णय सरकारच्या विरोधात दिलेला नाही.
पक्ष पळवून नेले. तरी पळवून नेणारेच पक्ष आयोगाने योग्य करून ठेवले आणि न्यायालयाने प्रश्न प्रलंबित ठेवून त्याला दुजोरा दिला.

आपच्या एका खासदाराने संसदेत EVM मध्ये छेडछाड करता येते, हे प्रात्यक्षिकासह सिद्ध केले होते, विद्यमान सरकारने त्याची खिल्ली उडवली, निवडणूक आयोग तरीही कसे काय म्हणू शकते की आमच्याकडे तक्रार आली नाही ते, मग निवडणूक आयोगाने सुद्धा जनतेत येऊन याची म्हणजे लोकशाहीची आगृती करायला नको का? बॅलेट पेपरवर आम्ही मतदान का घेत नाही? अमेरिकेसारखा प्रगत देश बॅलेट पेपरवरच मतदान का घेतो ? अमेरिका EVM वर विश्वास का ठेवत नाही ? EVM वर छेडछाड करता येते. असे अमेरिका सरकार का म्हणते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाला द्यावी लागतील.निवडणूक आयोग वा सरकार या जनसेवक संस्था आहेत.देशात निखळ लोकशाही नांदेल ,अशी व्यवस्था करणे हे या जनसेवक संस्थांचे काम आहे .

* महायुतीला सुद्धा आश्चर्य!

भारतीय जनता पक्षाचे 148 पैकी 13 उमेदवार निवडून आलेत. शिंदे गटाचे 57 उमेदवार निवडून आलेत. तर अजित पवार गटाचे 41 उमेदवार निवडून आलेत. भाजपाचा स्ट्राइक रेट पाहता संपूर्ण भारतातील मोठ्या राज्यात विधानसभेला इतका मोठा स्ट्राइकरेट क्वचितच पाहायला मिळेल. महाराष्ट्रात तर असे कधीच घडले नाही. याचा धक्का विरोधकांनाच काय,तर सत्ताधारी लोकांनाही बसला आहे. मग असे काय घडले‌ म्हणून असा निकाल लागला. याचे उत्तर सत्ताधारी देऊ शकेल काय?

भविष्यात असा अविश्वास टाळण्यासाही आणि लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी येथून पुढचे सर्वच मतदान बॅलेट पेपरवरच घेणे उचित ठरेल.

Leave a comment