राजपुत्रासाठी स्वर्गीय सुखाची योजना-भाग 11
राजा शुद्धोदन आणि राणी महाप्रजापती यांना राहून राहून सारखे वाटायचे ,की महामायेचे पहिले स्वप्न खरे ठरले तर? म्हणजेच राजपुत्राने अचानक गृहस्थाश्रमाचा त्याग केला तर? असे होऊ नये म्हणून त्यांचा आटापिटा चाललेला असायचा .
सिद्धार्थाचा विवाह झाल्याबद्दल राजा शुद्धोदन खुश झाला होता. पण असितमुनीच्या भविष्यवाणीची त्यांना सारखी रुखरुख लागलेली असायची. त्याचे भविष्य खरे होऊ नये म्हणून सिद्धार्थला सुखविलासात गुंतवून ठेवण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू असायचा.
तीन महालांची उभारणी
राजा शुद्धोदनाने आपल्या पुत्राला सुखासीन अवस्थेत राहण्यासाठी तीन महाल बांधून घेतले. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तीन ऋतूत अनुकूल राहतील असे तीन महाल बांधून घेतले होते. सिद्धार्थाला कोणताही त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली होती. हे तीनही महाल विलासी जीवनासाठी सुसज्ज असे होते. महालांच्या सभोवार सुंदर सुंदर फुलांच्या बागा निर्माण केल्या होत्या. निरनिराळ्या प्रकारच्या फळांची रचनाबद्ध झाडे लावली होती.उद्यान अप्रतिम बनवले होते. उद्यानात तासन्तास घालवले तरी कंटाळा येणार नाही , अशी व्यवस्था केली होती. उद्यानात सुंदर, मनोहारी पक्ष्यांचा मधुर किलबिलाट असायचा.
सुंदर युवतींची व्यवस्था:
राजपुत्राला सर्व प्रकारचे सुख मिळावे यासाठी राजा शुद्धोदनाने कोणतीही उणीव ठेवलेली नव्हती. राजघराण्याचा पुरोहित उदयीन याला सांगून सुंदर युवतींची व्यवस्था केली होती. उदयीन हा चतुर होता. त्याने अनेक सुंदर युवतींचा शोध लावला आणि त्यांना तीन महालात आणून ठेवले. राजपुत्राला कसे वश करायचे, याचे त्यांना प्रशिक्षण दिले. उदयीन त्या युवतींना म्हणायचा,
“तुम्ही सर्व युवती वशीकरण विद्येत पारंगत आहातच. मदनाची भाषा जाणण्यात तरबेज आहात. तुमच्या ठायी सौंदर्य व आकर्षकता परिपूर्ण आहे . तुम्ही वाकबगार आहात. विश्वामित्राला सुद्धा एका अप्सरेने वेडे केले. तेच तुम्हाला करायचे आहे. आपल्या समोर कितीही तपस्वी किंवा योगी असला तरी त्याची तपस्या भंग करण्याची कला तुमच्यात आहे . वीर पुरुषांच्या पराक्रमापेक्षा तुमचे सामर्थ्य मोठे आहे. असा तुमचा दृढनिश्चय असू द्या विश्वामित्राला दहा वर्षे घृताची नावाच्या अप्सरेने जंगलात गुरफटून ठेवले होते. हे तुम्ही कधीही विसरू नका. तुम्हालाही तेच करायचे आहे. सिद्धार्थाला तुमच्या मोहजाळ्यात अडकवून ठेवायचे आहे.”
अशा प्रकारच्या विविध सूचना सांगून उदयीनने त्या सुंदर युवतींना महालात आणून ठेवले होते. सिद्घार्थ गौतमाला जिंकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते .हे आव्हान आम्ही लीलया पेलू , असे त्या सौंदर्यवतींनी उदयीनला सांगून राजा शुद्धोदनाने निश्चिंत राहावे, असा निरोप त्यांनी उदयीनकडे दिला होता. आता पुढे काय घडते ते पाहू..