सूर्यनमस्काराची तयारी :Preparation of Surya namaskar
सूर्यनमस्कार ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. संपूर्ण जगात सूर्यनमस्काराची साधना( Meditation Of Surya namaskar )चालू आहे.अभ्यासातून आपणास अधिकाधिक फायदेपाहिजे असतील तर त्याकरिता योग्य ती पूर्वतयारी करणे व काही पथ्ये पाळणे उपयुक्त ठरते. केव्हाही, कोठेही व कसाही अभ्यास केला तर त्याचे सर्व फायदे मिळतीलच असे म्हणणे चूक आहे. हा एक शास्त्रीय अभ्यास आहे व त्याच दृष्टीने प्रत्यक्ष तंत्र व मंत्र समजण्यासाठी आणखी काही गोष्टी समजावून घेणे आवश्यक आहे. सूर्यनमस्काराचे महत्त्व पटल्यावर प्रत्येकाच्या मनात एक शंका निर्माण होते की, हा अभ्यास एवढा चांगला आहे तर तो मीही करू शकेन का ? म्हणजेच बालकांपासून वृध्दांपर्यंत कोणत्या वर्षापर्यंत हा अभ्यास करता येतो ? खरं म्हणजे वयाच्या आठव्या वर्षापासून ऐंशी वर्षांपर्यंत हा अभ्यास करता येतो. मात्र प्रत्येकाची अभ्यासाची पध्दत थोडी थोडी प्रकृती व वयानुसार भिन्न असायला हवी. याचाही विचार आपण पुढे करणार आहोत. मात्र सर्व वयांच्या व्यक्तींनी हा अभ्यास करावयास हरकत नाही. याचबरोबर महिलांनी याचा अभ्यास करावा की नाही हाही प्रश्न निर्माण होतो. याचेही उत्तर होय असेच आहे. मात्र स्त्री शरीरात होणारा मासिक पाळीचा नित्य बदलाचा कालावधी व अपत्यप्राप्तीच्या काळातील नैमित्तिक बदलाचा कालावधी, या काळात सूर्यनमस्काराचा अभ्यास पूर्णपणे बंद ठेवावा. अन्य वेळी हा अभ्यास करावयास हरकत नाही. शारीरिक विकृती असणाऱ्यांनी मात्र योग्य तज्ञांच्या सल्ल्यानेच याचा अभ्यास करावा.
आपल्या दिनचर्येतील कोणता पाऊण तास सूर्यनमस्कार अभ्यासाकरिता उपयोगात आणावयाचा, हेही निश्चित करणे जरूर आहे. सूर्यनमस्काराचा अभ्यास मुख्यत्त्वेकरून शरीराशी संबंधित असल्याने हा अभ्यास करतांना शरीर उत्साही असणे आवश्यक आहे. या अभ्यासाचा परिणाम जसा शरीरावर होतो तसाच मनावरही होत असतो. म्हणून शरीराबरोबर मनही उत्साही असणे जरूर आहे. आपल्या चोवीस तासांच्या दिनचर्येचे नीट अवलोकन केले तर आपणास असे आढळून येईल की, सकाळची वेळ या दृष्टीने सर्वोत्तम आहे. सकाळी प्रातर्विधी व स्नान आटोपल्यानंतरची साधारणतः 5:30 ते 7:30 ची वेळ सर्व दृष्टीने अत्यंत योग्य अशी आहे.
अन्य वेळ निवडली तर मात्र ती पथ्ये कटाक्षाने प्रयत्नपूर्वक पाळावी लागतील. सकाळच्या वेळी शरीर उत्साही असते. मन प्रसन्न असते. तसेच निसर्गाचे सर्व वातावरण उत्तेजक असते. उमलत्या निसर्गाचा हा प्रसन्न उल्हास वर्णन करण्यापेक्षा स्वतः अनुभवण्यानेच अधिक समजू शकेल.
या अभ्यासाची वेळ ठरवतांना जसे अनेक मुद्दे विचारात घेतले, तसेच त्याकरिता जागा निश्चित करण्याकरिताही काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. या अभ्यासाकरिता निवडलेली जागा मोकळी, हवेशीर व स्वच्छ असावी हे सांगायला पाहिजे असे नाही. ही जागा हवेशीर असावी हे पहातांना तेथे अंगावर प्रत्यक्ष येणाऱ्या वाऱ्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची जरुरी आहे. हवा संथपणे खेळती असली तरी प्रत्यक्ष हवेचा किंचितही झोत अंगावर येणार नाही अशी अवस्था या जागी असावी. जी गोष्ट हवेची, तीच गोष्ट प्रकाशाची. प्रकाश पुरेसा पण मंद असावा. अभ्यास करीत असतांना डोळ्याला त्रास होणार नाही व त्यायोगे चित्त विचलित होणार नाही, अशा प्रकारची प्रकाश योजना असावी. या सर्वांबरोबर पाण्याची ओल त्या जमिनीस वा भिंतीस असायला नको. तेथे इतर कृमी-कीटकांचा उपद्रव होणार नाही वगैरे गोष्टी पाहणे जरूर आहे. जागेच्या संबंधात आणखी एक गोष्ट लक्षात घेणे जरूर आहे व ती म्हणजे ही जागा शक्यतो जनसंपर्कापासून दूर असावी. व्यावहारिक पातळीवरून विचार करतांना आपण एवढे लक्षात ठेवले पाहिजे की, आपला अभ्यास चालू असतांना अन्य व्यक्तींचा किंवा त्यांच्या कारवायांचा त्रास आपणाला होणार नाही. शरीराच्या हालचाली सर्व दिशांनी मोकळेपणाने करता येते.
पोषाख
सूर्यनमस्काराचा अभ्यास करतांना अंगावर पोषाख कोणता असावा हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पोषाख अर्थातच पुरुष व महिला यांच्याकरिता वेगळा वेगळा असायला हवा. पोषाखाबाबत सर्व साधारणपणे असे सांगता येईल की, पोषाख सैलसर पण त्याचबरोबर शरीराच्या अवयवांच्या हालचाली सर्व दिशांना मोकळेपणाने करता येतील व त्या हालचालींना अडथळा न होईल असा असावा. पुरुषांकरिता अर्धी विजार किंवा अंडरपँट व बनियन किंवा गंजिफ्रॉक हा पोषाख योग्य आहे. मात्र त्याचबरोबर लंगोट असणे आवश्यक आहे. थंडीचे प्रमाण अधिक असेल तर बिनबाह्यांचा स्वेटर घालायला हरकत नाही. यापेक्षा अधिक कपडे त्रासदायक होतात. महिलांकरिता सलवार व खमीस हा पंजाबी पोषाख सर्वात चांगला. पाश्चिमात्य पोषाखांपैकी स्लॅक्स हा पोषाखही वापरता येतो. परंतु तो शरीरावर ताणून बसविलेला असल्याने शरीराच्या हालचाली चालू असतांना त्या पोषाखाचा ताण त्वचेवर सतत येतो व तो त्रासदायक वाटतो. शिवाय काही प्रमाणात शरीरावयवांच्या हालचालींवर मर्यादा आणली जाते. याखेरीज चापून चोपून नेसलेली स्वच्छ साडी, या अभ्यासात सोयीस्कर असते. महिलांनी आपला केशसंभार व्यवस्थित बांधून ठेवला पाहिजे. अन्यथा अनेक प्रकारच्या हालचालींमध्ये त्याचा अडथळा होतो. या पोषाखांपैकी कोणताही पोषाख निवडला तरी तो रोजच्या रोज स्वच्छ धुतलेला असावा. हे सांगायला पाहिजे असे नाही. आरोग्याचे सर्व नियम येथेही पाळणे आवश्यक आहे.
आहार-विहार
या अभ्यासात आपल्या शरीराच्या निरनिराळ्या अवयवांवर व आंतरेंद्रियांवर विशिष्ठ ताण कार्यान्वित होत असतात. त्याकरिता आहार विहाराची काही बंधने पाळणे जरूर आहे. मुख्यतः सूर्यनमस्काराचा अभ्यास करतेवेळी जठर पूर्णपणे रिकामे असणे आवश्यक आहे. आपण खाल्लेले अन्न, अन्ननलिकेमार्फत जठरामध्ये पोहोचविले जाते. ते अन्न जठरात पचविले जाते. ते घन असेल तर तीन ते साडेतीन तासानंतर पुढे लहान आतड्यात पाठविले जाते. पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीत हे लहान आतडे सुमारे वीस ते बावीस फूट लांब असते व त्याचा व्यास एक इंच असतो. यामुळे जठरातून आलेले अन्न एका ठिकाणी गोळा होऊन न राहता या लांबीभर पसरविले जाते. जठरात असतांना हे अन्न एका गोळ्यासारखे एकत्रच असते व त्यावर निरनिराळ्या पाचक रसांच्या क्रिया चालू असतात. यावेळी आतील अन्नामुळे जठराचा आकारही थोडा वाढलेला असतो. अन्न जठरात असतांना सूर्यनमस्काराचा अभ्यास केला तर त्यामुळे जठरावर येणारे दाब आतील अन्नाच्या प्रतिदाबामुळे अनिष्ट ठरतात. शिवाय त्या अन्नाच्या पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात. शिवाय जठरावर अधिक दाब आला तर ते अन्न पुनः अन्ननलिकेमार्फत तोंडावाटे उलट बाहेर पडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. कारण अन्न परत येऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची झडप तेथे नसते. एकदा अन्न जठरातून पुढे गेल्यावर अन्न उलटे येऊ नये म्हणून एकमार्गी झडप असते. ती जठराच्या खालील तोंडाशी असते. त्यामुळे अन्न जठरात असतांना अर्थात कोणताही घन आहार घेतल्यानंतर, साधारणतः तीन ते साडेतीन तासानंतर अभ्यास करावयास हवा. त्यापूर्वी अभ्यास करणे कटाक्षाने टाळले पाहिजे.
द्रवरूप अन्न मात्र जठरात सुमारे अर्धा ते पाऊण तासच राहते व नंतर ते पुढे लहान आतड्यात पाठविले जाते. म्हणून द्रव पदार्थ, पेये वगैरे घेतल्यानंतर सुमारे एक तासाने अभ्यास करण्यास हरकत नाही. आतापर्यंतच्या सर्व निवेदनात ‘साधारणतः’ हा शब्द हेतुपुरस्सर वापरलेला आहे. कारण सर्व व्यक्तींमध्ये अन्न जठरात राहण्याचा कालावधी सर्वच वेळी सारखा असतो असे नाही. शिवाय ठराविक वेळेनंतर सर्व अन्न चटकन लहान आतड्यात प्रवेश करते असे घडत नाही. म्हणून या सूचनेचा अर्थ शब्दशः न घेता त्यामागची भूमिका लक्षात घेऊन मग तिचे पालन केले तर अडचण पडणार नाहीं. या कसोटीवर विचार केला तर सकाळची वेळ या अभ्यासाला अधिक योग्य व उपयुक्त ठरते, हे आपल्या लक्षात येईल. कारण आहाराचे बंधन सकाळच्या वेळी अभ्यास केल्याने आपोआपच पाळले जाते. या उलट संध्याकाळची वेळ अभ्यासाकरिता निवडली तर मात्र आहाराच्या व पेयपानाच्या वेळा त्यानुसार बदलून घ्याव्या लागतात. हे आहाराचे बंधन अभ्यासापूर्वी पाळणे जसे जरूर आहे; तसेच अभ्यासानंतरही पाळणे आवश्यक आहे. या अभ्यासात ताणली गेलेली इंद्रिये पूर्वस्थितीला आल्यानंतर आहार घेणे चांगले. अनुभवावरून असे सांगता येते की, सूर्यनमस्कारानंतर एक तासपर्यंत पेय व दोन तासापर्यंत घन आहार घेणे अयोग्य व अपायकारक आहे.
आहार केव्हा घ्यायचा हे पाहिल्यानंतर तो कोणता घ्यावा याचाही विचार अपरिहार्य आहे. कारण आहारातून जसे शरीर घडत असते तसेच आहाराचा मनावरही परिणाम होत असतो. मांसाहार हा सूर्यनमस्काराला मारक ठरतो. त्यामुळे तामसी वृत्ती वाढीस लागते. उलट शाकाहार हा सत्त्वगुणांची वृध्दी करणारा असल्याने तो सूर्यनमस्काराच्या अभ्यासात फायदेशीर ठरेल. वयोमानानुसार आहार घेतला पाहिजे.