Suryanamaskar:The great Exercise सूर्यनमस्कार – एक उत्तम व्यायाम

आपणास इतर कोणतेच व्यायाम करायला नको असतील तर सूर्यनमस्कार हा सर्वांत उत्तम व्यायामप्रकार आहे. सूर्यनमस्कार हा व्यायामप्रकार जगभर लोकप्रिय आहे. त्याची उपासना आपण दररोज केली पाहिजे.

शरीर बलसंवर्धनाचा एक सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून आपल्याला सूर्यनमस्कारांचा अभ्यास केला पाहिजे. मात्र याकरिता सूर्यनमस्काराची गती वाढविली पाहिजे. सूर्यनमस्कार गतीने घालण्यात आनंद आहेच ,त्याचबरोबर आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होतो.साधारणतः 10 ते 15 सेकंदात एक सूर्यनमस्काराचे आवर्तन पूर्ण झाले पाहिजेत.अशा गतीने स्नायू बलसंवर्धनात्मक परिणाम अनुभवायला मिळतील. संथ हालचाली व श्वसन यात बदल करण्याची आवश्यकता नाही.एका मिनिटात 5 ते 6 सूर्यनमस्कार होणे आवश्यक आहे.अशा गतीने 108 नमस्कार घालण्यास साधारणतः 20 मिनिटे लागतात. यातून सर्व स्नायूंना उत्तम व्यायाम मिळू शकतो. असा गतिमान अभ्यास करण्याची स्नायूंची क्षमता मात्र हवी. वयाच्या साठ ते सत्तर वर्षापर्यंत अशा प्रकारचा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो. वयाच्या आठव्या वर्षापासून याचा अभ्यास करता येतो.

‘अल्पारंभः क्षेमकरः’ हे सूत्र आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. पहिल्याच दिवशी 108 नमस्कार घातले तर स्नायूंना दुखापत होईल व नंतर पुन्हा आठ दिवस अभ्यास करता येणार नाही. साधारणतः 12 नमस्कार घालून प्रारंभ करावा व हळूहळू आवर्तनांची संख्या वाढवत न्यावी. सहजपणे झेपतील व त्रास होणार नाही अशा पध्दतीनेच अभ्यास करावा. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीचा विचार करून ही गती वाढवावी. अधिक अभ्यासाने ही संख्या 1000 पर्यंत वाढविण्यास हरकत नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नमस्कारांचा अभ्यास करावयाचा असेल तर दैनंदिन आहारही अधिक पौष्टिक ठेवायला हवा. लहान वयापासून रोज 108 नमस्कार घालण्याची सवय असेल तर वयाच्या साठ सत्तराव्या वर्षी सुद्धा आरामात 108 सूर्यनमस्कार घालता येतात, हा माझा स्वाअनुभव आहे.पण प्रत्येकाने आपल्या शरीरास पेलेल इतकेच सूर्यनमस्कार घालावेत.आणि त्यात सातत्य ठेवावे.

निरोगी शरीरात निरोगी मन वास करते हे नेहमी लक्षात ठेवावे.

Leave a comment