सूर्य नमस्कार हा जसा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे, तसा तो योगाचा उत्तम मार्ग आहे. योगसाधना ही व्यायाम प्रकारातूनच साध्य होत असते.
सूर्यनमस्कारात एकूण बारा किंवा दहा योगासनांचा अंतर्भाव होतो. योगासनांचा अभ्यास म्हणून हा अभ्यास करता येतो, हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. वस्तुतः यांतील सहा स्वतंत्र आसने म्हणून अभ्यासता आली असती, परंतु ही सहा अशी सलगपणे करण्यात व स्वतंत्रपणे करण्यात निश्चितच फरक आहे. एकामागून एक करण्यात फायदे व परिणाम अधिक चांगले आहेत. या सर्व आसनांचे मागे जे वर्णन केले आहे ते बारकाईने वाचून त्याचा एकत्रित विचार केला म्हणजे हे म्हणणे आपणास पटेल. या सर्व आसनात शरीराच्या घड्या, तदनुषंगिक येणारे ताण व दाब हे एकमेकांच्या उलटसुलट आहेत. जानुभालासनात (२ ऱ्या अवस्थेत) पोटाचे स्नायू आकुंचित करून कमरेत पूर्ण घडी येते .तर अर्ध भुजंगासनात ते ताणलेले असतात. त्यावेळी एका पायाचा आधार असल्याने कमी प्रमाणात ताण येतो. नंतर हस्तपादासनात तोही आधार काढल्याने पूर्ण ताण येतो. भुजंगासनात जास्तीत जास्त ताण आहे. पुन्हा शिरासनात तो दाब आहे. अशा प्रकारे सर्व शरीराला सर्व बाजूंनी ताण व दाब एका पाठोपाठ मिळण्याची योजना या साखळी पध्दतीत आहे. पोटाप्रमाणेच अन्य इंद्रियांबाबतही हेच म्हणता येईल.
त्यामुळे सलग साखळी म्हणून या पध्दतीने सूर्यनमस्काराचा अभ्यास केला, तर थोड्या वेळात पुष्कळ फायदा मिळू शकेल. याशिवाय एका हालचालीतून दुसरे आसन त्वरीत तयार होते व त्यामुळे आसन बांधणे व सोडणे यात वाया जाणारा बराचसा वेळ वाचतो व बहुतेक सर्व वेळ, आसनाच्या अभ्यासाकरताच वापरला जातो.
अनेक आसनांचा एकत्रित सूत्रबद्धरीत्या केलेला सराव म्हणजे सूर्यनमस्कार होय. हे ध्यानात घेऊन आपण सूर्य नमस्कार घालावेत. सूर्यनमस्कारात सातत्य आणि नियमितपणा कायम असेल तर आपणास हळूहळू लक्षात येईल की सूर्यनमस्कार ही एक उत्तम साधना आहे.