Buddha Life Story-Part 23 :अखेर छन्न माघारी परतला.

राजपुत्र सिद्धार्थची आणि सेवक छन्न यांची खूप चर्चा झाली, पण सिद्धार्थने काही आपला निर्णय बद‌लला नाही. त्यामुळे खिन्न झालेला छन्न दुःखाने रडत रडत कंठक घोड्यासह माघारी परतत होता. दोघांनाही कपिलवस्तूला परतायला काही दिवस लागले. इतक्या हळूहळू ते माघारी परतत होते. कंठकही अस्वस्थ झाला होता. तोही पाठीमागे वळून वळून पाहत पुढे जात होता. कोणीतरी जरदस्तीने पुढे ओढत आहे, असाच कंठक पावले टाकत होता. नि मार्गात कुठेही गवताला तोंड देखील लावले नाही की तो गी देखील प्याला नाही.

अखेर कंठक आणि छन्न कपिलवस्तूला जाऊन पोहोचले. कपिलवस्तू उदास उदास जाणवत होती. अत्यंत सुंदर आणि बहरलेली कपिलवस्तू कोमेजून गेली होती. उदास आणि निस्तेज चेहऱ्यांनी ते दोघेही शहरातून चालत होते. शहरातील लोकांचीही अवस्था तशीच होती. सारी कपिलवस्तू दुःखसागरात बुडाली होती. जेव्हा लोक छन्न आणि तो घोडा पाहत, तेव्हा ते ढसाढसा रडत होते. “कुठे आहे आमचा राजपुत्र ?” असे अश्रू ढाळत रडत विचारत होते. गौतमाशिवाय नगरी उदास आणि भकास वाटत होती. रिकामा घोडा पाहवेना म्हणून लोक दारे व खिडक्या झाकून घरात रडू लागले. काही केल्या त्यांचा शोक संपत नव्हता. राजपुत्र परत येणार नव्हता; पण खोटी आशा मनात ठेवून लोक जंगलाक‌डे डोळे लावून बघत होते.

Leave a comment