योगाची आणि योगाच्या अभ्यासाची तयारी अगदी दहा वर्षांपासून अनौपचारिक पद्धतीने झाली तर पुढे पुढे योगात अधिक चांगले प्रावीण्य मिळते. लहान वयापासूनच शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास चांगल्या पद्धतीने होतो .योग शिकताना आणि शिकवताना तज्ज्ञ मार्गदर्शकाची गरज असते. तज्ज्ञ मागदर्शकामुळे योगाचा चांगला अभ्यास होतो. योगाचा अभ्यास करण्यासाठी पुढे काही मागदर्शक तत्त्वे दिली आहेत.
1 योग अभ्यासाची सुरुवात शांत मनःस्थिती असताना झाली पाहिजे. शांत मनःस्थितीसाठी आणि मनात सकारात्मक विचार निर्माण करणाऱ्या छोट्या छोट्या प्रार्थना म्हटल्या पाहिजेत. त्यामुळे योगाभ्यास चांगला होतो आणि त्याचा आपल्या शरीरावर, मनावर, भावनेवर चांगला परिणाम होतो.
2 योगा करण्यापूर्वी प्रफुल्ल उत्तेजन (Warming up) करणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी हातांची हालचाल करणे, पायाचा घोटा वाकवणे, गुडघा वाकवणे, कोपर वाकवणे, मनगट वाकवणे, मनगट फिरवणे, घोट्यापासून पाय फिरवणे, खांदा फिरवणे, डोळ्यांची हालचाल करणे, मानेची हालचाल करणे, दोरीवरच्या उड्या मारणे उत्यादी क्रिया केल्यामुळे शरीर योगासनासाठी उत्तेजित होते.
3 योगाचा सराव हा शारीरिक आणि मानसिक पातळीवर नियमित करायला हवा. शरीर आणि मन योगा करण्यासाठी अनुकूल करणे आवश्यक आहे.
4 योगाच्या सरावासाठी शारीरिक आणि मानसिक संतुलनाबरोबर संयम हा खूप महत्त्वाचा आहे. योगासन करताना सुरुवातीलाच ते खूप चांगल्या प्रकारे करता येईल असे नाही. अशा वेळी संयम खूप महत्त्वाचा आहे. जेवढा संयम आणि सातत्य तेवढे यश मिळतच जाते. दीर्घकाळ आणि नियमित सरावाचा फायदा आपणास कालांतराने दिसून येतो.
5 उत्तम योगासाठी स्पर्धा योग्य नाही. स्पर्धेमुळे योगाचा आनंद घेता येत नाही. योगा करताना एकमेकांना सहकार्य करायला हवे. स्पर्धा ही योगाच्या अभ्यासात सर्वांत मोठा अडथळा आहे. स्पर्धेमुळे अहंकाराला खतपाणी मिळते. योगामुळेच तर अहंकार नष्ट करण्याचे सामर्थ्य मिळत असते. अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाचा अभ्यास करायला हवा.
6 आसने, प्राणायाम किंवा कोणत्याही योगक्रिया करताना आपले पोट रिकामे किंवा हलके असावे. मुत्राशय रिकामे असावे. सकाळी लवकर उठून अंघोळ करून योगाभ्यास सुरु केला तर अधिक उत्तम. आपले आतडेही रिकामे पाहिजे.
7 योगाभ्यास केव्हाही करता येतो. तरी सुद्धा पहाटेची वेळ सर्वोत्तम मानली जाते. सकाळच्या वेळी वातावरण शांत असते. हवेत ओझोनचे प्रमाण चांगले असते. इतर वेळीही योगाभ्यास करता येतो. त्यासाठी पोट रिकामे हवे.
8 निसर्गाच्या सानिध्यात योगसाधना अधिक चांगली होते. तुम्ही शहरात राहत असाल तर एखाद्या बागेत योग साधना करावी.
9. योगसाधना ही घाईघाईने पूर्ण करण्याची गोष्ट नाही. घाई केल्याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक पातळीवर काहीच फायदा होत नाही.
10 योगाभ्यास करण्यासाठी पृष्ठभाग चांगला व सपाट असावा पृष्ठभाग टणक असू नये. पृष्ठभागावर मऊ चटई, घोंगडी यासारखे काहीतरी अंथरावे, की जेणेकरून करुन योग करताना आरामदायी वाटेल. हिवाळ्यात गरम, पावसाळ्यात कोमट किंवा गरम आणि उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी.अंघोळ केल्यानंतरच योगाभ्यास करावा.
11 योगाभ्यास करताना कपडे सैलसर व आरामदायी असावेत. कपडे स्वच्छ असावेत. त्यामुळे मन प्रफुल्लित राहते.
12 योगाभ्यास करताना श्वसनक्रिया नैसर्गिक असावी सूर्य नमस्काराच्या वेळी श्वसनक्रिया मार्गदर्शक योग शिक्षकांकडून शिकून घेऊन त्याप्रमाणे करावी.
13 तुम्ही एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असाल तर योग साधनेला मर्यादा येतात. अशावेळी वैद्यकीय सल्लागार आणि योग शिक्षक यांच्या योग्य त्या सूचना अंमलात आणल्या पाहिजेत.
14 योगाच्या अभ्यास शाळेत योग शिकत असताना घरीही नियमित सराव ठेवायला हवा . तुम्ही तबलावादन च्या तासाला जात असाल तर तुम्ही घरी रियाज केल्यामुळे अधिक फायदा होतो. तसेच योग अभ्यासाचे सुद्धा आहे.
15 दैनंदिन जीवनात नैतिकता जपली पाहिजे. त्यामुळे आपले मन अधिक प्रसन्न राहते.
16 योग आणि योगाचे प्रकार व्यापक आहेत. योगाचा सखोल अभ्यास करण्यासाठी योग टप्प्याटप्प्याने शिकला पाहिजे.
17 योगाचा अर्थ खूप व्यापक आहे. आसने, प्राणायम, योगक्रिया व्यतिरिक्त सामाजिक पातळीवर नैतिक मूल्यांचे पालन केले पाहिजे.
18 योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, स्वच्छता पद्धती, मुद्रा, बंधन, धारणा, ध्याने यासारख्या अनेक पद्धतींचा समावेश होतो. या सर्व पद्धती आपण शिकल्या पाहिजेत.