* उष्माघात: काळजी, लक्षणे आणि उपचार
उन्हाळा आला की उष्माघाताचा त्रास अनेकांना होतो. खरंतर उष्माघात झाल्यावर उपाय करण्यापेक्षा उष्माघात होऊ नये म्हणून काळजी घेतली तर निश्चितच उष्माघातापासून आपल्याला आपले स्वतःचे संरक्षण करता येते. ते कसे? हे आपण सविस्तर पाहू.
*हिवाळ्यानंतर येणारा उन्हाळा
भारतीय ऋतुचक्राप्रमाणे हिवाळ्यानंतर दरवर्षी उन्हाळा येतो. साधारणतः 1 मार्च ते 15 मार्चच्या दरम्यान उन्हाळ्याची प्रकर्षाने जाणीव होते. हिवाळ्यातील थंड हवेतून आपल्याला उष्ण हवेत प्रवेश करावा लागतो. या उष्ण हवेशी जुळवून घेताना आपल्या शरीराला निश्चितच काही प्रमाणात का असेना त्रास सहन करावा लागतो.
*फेब्रुवारी महिन्यातील विषम हवामान
फेब्रुवारी महिन्यात म्हणजे साधारणतः 15 फेब्रुवारीपासून सकाळच्या वेळी खूप थंडी असते, तर दुपारच्या वेळी तापमान एकदम वाढलेली असते. विषम तापमानाशी जुळवून घ्यायला शरीराला निश्चितच त्रास होतो. या काळात ताप, कणकण, खोकला अशा सामान्य आजाराला अनेकांना तोंड द्यावे लागते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सकाळच्या वेळी हवेत चांगला गारवा असतो, अशा वातावरणात मॉर्निंग वॉकला जायला हरकत नाही. दुपारी मात्र हवेतील तापमान एकदम वाढते. आशा वातावरणात फिरणे टाळले तर आपल्या शरीराचे बरेच नुकसान टाळता येते.
*15 मार्च पासून उन्हाचा त्रास
महाराष्ट्रात साधारणतः 1 मार्च ते 15 मार्च या दरम्यान हवेतील उष्णता वाढायला सुरुवात होते. अशावेळी उन्हातून जे फिरतात, किंवा ज्यांना उन्हातून जावेच लागते अशा लोकांनी उष्माघात होण्याची शक्यता असते. हा उष्माघात म्हणजे काय? तो का होऊ शकतो? याची सविस्तर माहिती आपण घेऊया.
*उष्माघात म्हणजे काय
उष्माघात म्हणजे हवेतील तापमान वाढल्यामुळे शरीराला त्या तापमानाशी जुळवून घेण्यास होणारा त्रास होय. या उष्माघातालाच sunstroke असेही म्हणतात. हवेतील प्रचंड उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होते. अशावेळी अचानक अस्वस्थता निर्माण होते. श्वास घ्यायला त्रास होतो. शरीराची काहिली होते. शरीराचे तापमान वाढते. अशावेळी तातडीने योग्य ते उपचार केले नाही तर, उष्माघात झालेल्या व्यक्तीला कदाचित मृत्यूलाही सामोरे जावे लागते.
*उन्हाळ्यातील वाढते तापमान
सध्या संपूर्ण जगात global warming चालू आहे, म्हणजे दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होतच आहे. रस्ता रुंदीकरण, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, कारखानदारी, वाहनांचा अतिरिक्त वापर इत्यादी अनेक कारणांमुळे दरवर्षीच्या उन्हाळ्यातील तापमान मागील वर्षी पेक्षा वाढलेलेच आढळून येत आहे. उन्हाळ्यात महाराष्ट्रात आणि भारतातही अनेक ठिकाणी तापमान 35°c पासून ते 50 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेले दिसत आहे. अशा तापमानात वृद्ध, रोगी लोकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच वाढते तापमान वाढ हेच उष्माघाताचे मूळ आहे. त्याचे समूळ उच्चाटन एक-दोन वर्षात करता येणे अशक्य आहे. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच देशांनी समान कार्यक्रम आखला पाहिजे आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे.
*उष्माघात कसा टाळावा
1 आपण हिवाळ्यात जितके पाणी पितो, त्यापेक्षा अधिक पाणी उन्हाळ्यात प्यावे लागते.
2 उन्हाळ्यात दर तासाला एक ते दीड ग्लास पाणी प्यावे. अति थंड पाणी पिणे टाळावे.
3 पाण्याच्या ग्लासमध्ये चार-पाच लिंबाचे थेंब टाकल्यास असे पाणी अधिक लाभदायक ठरते.
4 भर दुपारी शक्यतो उन्हातून फिरणे टाळावे.
5 आपल्याला दुपारच्या वेळी बाहेर जावेच लागत असेल तर डोक्यावर पांढरे कापड अंगात सैलसर पांढरा सदरा डोळ्यांवर काळा गॉगल परिधान करावा.
6 भर दुपारी उन्हातून जाण्याची वेळ आलीच तर सोबत आवश्यक तेवढे पाणी घ्यावे.
7 कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम सारखे थंड पदार्थ शक्यतो टाळावेत. हे पदार्थ खाल्ल्याने जास्तच त्रास होतो.
6 दुपारच्या प्रहरी चालत जाण्याची वेळ आल्यास पांढरी छत्री सोबत घ्यावी ,जेणेकरून आपल्या उन्हाचा त्रास कमी होईल.
7 उन्हाळ्यात सुद्धा फ्रिजमधील थंड पाणी पिऊ नये. नॉर्मल अवस्थेतीलच पाणी प्यावे.
8 तहान लागली म्हणून एकावेळी जास्त पाणी न पिता, हळूहळू थोडे थोडे पाणी प्यावे.
*उष्माघाताची लक्षणे
उन्हाळ्यामध्ये उष्माघात होऊ नये म्हणून आपण शक्य तेवढी काळजी घ्यावी; पण त्यातूनही उष्माघात होत असल्यास किंवा उष्माघाताचा त्रास होत असल्यास त्याची प्राथमिक लक्षणे कशी ओळखावी ,ते पाहू.
1 उष्माघात झालेल्या व्यक्तीस चक्कर येऊ लागते. डोके दुखू लागते.
2 उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला मळमळ चालू होते, उलटी होते तेव्हा आपण ओळखावे की उष्माघाताचे हे लक्षण आहे आणि वेळीच सावध व्हावे.
3 उष्माघात झालेल्या व्यक्तीला अचानक प्रचंड थकवा येतो. अशावेळी अस्वस्थता जाणवते.
4 उष्माघात झालेल्या व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडते. त्याची असंबंध बडबड सुरू होते. बोलताना कसलेही भान राहत नाही.
5 उष्माघात झालेल्या व्यक्तीची जीभ जड होऊ लागते. बोलण्यास त्रास होतो. अचानक घाम सुटतो. पायात गोळे येतात.
6 वरील लक्षणे दिसताच योग्य वेळी उपचार न झाल्यास उष्माघात झालेले व्यक्ती तडफडून लागते. आणि अचानक मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
*उष्माघात झालेल्या व्यक्तीस कोणते उपचार करावे?
1 उष्माघात झालेल्या व्यक्तीस ताबडतोब थंड हवेच्या ठिकाणी न्यावे. जवळपास एखादे झाड असेल तर त्या झाडाखाली नेऊन त्याच्यावर उपचार करावेत.
2 उष्माघात झालेल्या व्यक्तीचे कपडे सैल करून अंग ओल्या कपड्याने किंवा टॉवेलने पुसावे.
3 उष्माघात झालेल्या व्यक्तीस हळूहळू टप्प्याटप्प्याने पिण्यासाठी लिंबू पाणी द्यावे.
4 उष्माघाताचा स्ट्रोक खूप मोठा असेल तर ताबडतोब जवळच्या दवाखान्यात न्यावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
5 उष्माघात झालेल्या व्यक्तीस बर्फ टाकलेले किंवा थंड पाणी देऊ नये.
6 एखाद्या व्यक्तीला घरीच उष्माघाताचा त्रास सुरू झाल्यास तिला ताबडतोब पंख्याखाली झोपवावे. कपडे सैल करून पूर्ण अंग ओल्या टॉवेलने पुसून घ्यावे आणि हळूहळू पाणी देत राहावे. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.