जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी सुंदर आकर्षक सर्व सुविधायुक्त अनेक शाळा पाहायला मिळतात. पण राजस्थान मधील ही अनोखी शाळा आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. काय आहे ही नेमकी शाळा?
राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल- Princess Ratnavati Girl’s School
भारतातील राजस्थान राज्यांमध्ये हळदी वाळवंटामध्ये वसलेली उत्तम दर्जाची नैसर्गिक वातावरण लाभलेली शाळा म्हणजे राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल होय. ही शाळा जैसलमेरच्या वाळवंटात वसलेली आहे.या शाळेची लोकप्रियता शाळेच्या नैसर्गिक इमारतीत आणि अद्भुत रचनेत दडलेली आहे.
शाळेची वैशिष्ट्ये: Characteristics of the school
1 राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल ही शाळा राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटात वसलेली आहे. आजूबाजूचे तापमान 50°c असले तरी या शाळेमध्ये 30 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असते. हे या शाळेचे खास वैशिष्ट्य मानले जाते.
2 या गर्ल्स स्कूलमध्ये वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या एकूण 400 मुली शिक्षण घेत आहेत. येथील आनंददायी वातावरणात या मुली उत्तम प्रकारे शिक्षण घेत आहेत.
3 शाळेच्या इमारतीची रचना ही भारतीय संसदेच्या इमारतीसारखी अंडाकृती आहे.या इमारतीच्या भिंती जाडसर आहेत. त्यांच्या खिडक्या खोल आहेत. तसेच छतातून सूर्यप्रकाश येतो पण उष्णता आत येत नाही. हे या इमारतीचे खास वैशिष्ट्य आहे. खिडक्यांतून येणारी हवा गरम नसते. ती थंड होऊन आत प्रवेश करते. त्यामुळे शाळेतील वातावरण थंडगार आणि आल्हाददायक असते. या इमारतीत नैसर्गिकरित्या हवा येते आणि इमारत सुद्धा नैसर्गिकरित्या वातानुकूलित आहे . पंखे, एसी यांचा वापर येथे अजिबात केलेला नाही.
4 राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल या इमारतीचे आर्किटेक्टचे काम न्यूयॉर्क येथील डायना केलॉग या महिला आर्किटेक्चरने केलेले आहे. तिने बनवलेली ही इमारत पर्यावरणपूरक, उष्णतारोधक, सौंदर्यसंपन्न अशी आहे. प्रत्येक वर्गात नैसर्गिक गारवा आहे. हे या इमारतीचे खास वैशिष्ट्य आहे.
5 या इमारतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इमारतीच्या काही भागात कॅनोपी एरिया आहे. कॅनोपी एरिया म्हणजे मुलांना सावलीत बसून अभ्यास करण्याची जागा होय. फावल्या वेळात मुले या कॅनोपी एरियात बसून चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. ज्यांच्या घरी पोषक वातावरण नाही, अशा मुलांसाठी हा कॅनोपी एरिया खूप महत्त्वाचा आहे.
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या पाठीवर अशा प्रकारची वेगळ्या पद्धतीने बांधलेली ही एक दुर्मिळ अद्भुत आणि स्मार्ट शाळा आहे. निश्चितच या शाळेला भेट द्यावी आणि तेथील नैसर्गिक वातावरणाचा आनंद घ्यावा असे वाटते.