महाबळेश्वरमधील एलिफंट हेडच्या अगदी पायथ्याशी वयगाव गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एक छोटीशी गुहा आहे. या गुहेशेजारील एक छोटासा धबधबा आहे.या गुहेच्या परिसरातील वातावरण अल्हाददायक आहे. पावसाळ्यात हा परिसर पाहण्याचा आनंद लुटण्यास हरकत नाही.
या गुहेबाबत महाबळेश्वर परिसरात अनेक आख्यायिका आहेत. ही गुहा पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे महाबळेश्वरच्या पायथ्याशी म्हणजे एलिफंट हेडच्या पायथ्याशी वयगाव हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात कातकरी हे आदिवासी लोक राहतात.फार वर्षांपूर्वी म्हणजे अश्मयुगात कातकरी लोक या गुहेत राहत असत आणि ही गुहा त्यांनीच खोदून काढलेली आहे असेही म्हटले जाते.
सम्राट अशोक काळात म्हणजे मौर्यकाळात औषधी वनस्पती पासून औषधे बनवण्यासाठी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती मिळतात अशा ठिकाणी औषधी वनस्पतींपासून आयुर्वेदिक औषधे करण्याचे काम केले जात असे. या गुहेत गेल्यानंतर इथे बारकाईने निरीक्षण केले असता अनेक ठिकाणी औषधे चेचण्यासाठी आवश्यक असलेली व्हाण(खोलगट जागा)येथे पाहायला मिळतात. त्यामुळे की गुहा मौर्यकालीन असावी असे वाटते.