Maratha Military Landscape-12 किल्ले जागतिक वारसा स्थळ यादीत, यामुळे काय होणार फायदा? जाणून घेऊया अधिक माहिती.

संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनेस्को) पॅरिस येथे सुरू असलेल्या 47 व्या वार्षिक अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या बारा किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात झालेला आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वासाठी अभिमानास्पद अशीच आहे. कोणते आहेत ते किल्ले? जाणून घेऊया अधिक माहिती.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील 12 किल्ले 

6 जुलै 2025 ते 16 जुलै 2025 पर्यंत चालणाऱ्या युनेस्कोच्या 47 व्या अधिवेशनात 11 जुलै 2025 रोजी झालेल्या चर्चेदरम्यान छत्रपती शिवरायांच्या ताब्यात असलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यात आला. ते किल्ले पुढीलप्रमाणे आहेत.

1 राजगड,जिल्हा पुणे.

2 रायगड, जिल्हा रायगड.

3 शिवनेरी, जिल्हा पुणे.

4 साल्हेर,जिल्हा नाशिक

5 लोहगड, जिल्हा पुणे.

6 खांदेरी, जिल्हा रायगड.

7 प्रतापगड, जिल्हा सातारा.

8 सुवर्णदुर्ग, जिल्हा रत्नागिरी.

9 पन्हाळगड, जिल्हा कोल्हापूर.

10 विजयदुर्ग, जिल्हा: रत्नागिरी.

11 सिंधुदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग.

12 जिंजी,जिल्हा वेल्लुपुरम, राज्य तामिळनाडू.

जागतिक वारसा स्थळ यादीत कोल्हापूरच्या पन्हाळगडाचा समावेश 

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड या किल्ल्याला खूप मोठा इतिहास आहे. इसवी सन 11 व्या शतकात राजा भोज याने हा किल्ला बांधल्याचे अनेक पुरावे सापडलेले आहेत.या किल्ल्यावर अनेक सत्ता होत्या. सातवाहन, चालुक्य, शिलाहार, यादव, आदिलशाह, औरंगजेब, ब्रिटिश, मराठा राज्य इत्यादी राजांनी या किल्ल्यावर सत्ता गाजवलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर सहा महिने मुक्काम करून होते. छत्रपती संभाजी महाराज यांनीही पन्हाळगडावरून दक्षिणेकडील राज्यकारभार पाहिला आहे. महाराणी ताराबाई यांनी पन्हाळगड ही स्वराज्याची राजधानी केली होती. त्यांनी अनेक वर्ष पन्हाळगडावरून स्वराज्याचा राजकारभार केला.

जागतिक वारसा स्थळामुळे काय होणार फायदा?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळात झाल्यामुळे या स्थळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळीच ओळख निर्माण होणार आहे. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा मिळणार आहे. या सर्व बाबींमुळे पर्यटनक्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर चालना मिळणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एके काळच्या बालेकिल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळात झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला याचा अभिमान आहे.

Leave a comment