भारतातील हिमालय पर्वतात अमरनाथ येथे नैसर्गिक वातावरणामुळे तयार झालेले शिवलिंग मुदतीपूर्वीच वितळले. नेमके काय आहे या मागील कारण? ते हिमलिंग आहे. मग त्याला शिवलिंग का म्हणतात? .
अमरनाथ गुंफा कोठे आहे?
भारतातील जम्मू काश्मीर राज्यात हिमालय पर्वताच्या कुशीत जम्मू पासून 344 किलोमीटर अंतरावर अमरनाथ येथे हिमलिंग आहे. या हिमलिंगाचा आकार शिवलिंगासारखा असल्याने या हिमलिंगाला भाविक लोक शिवलिंग असे म्हणतात. हे अद्भुत शिवलिंग केव्हा आणि कसे तयार होते? तेही आपण पाहू.
अमरनाथ गुंफेत हिमलिंग केव्हा तयार होते?
अमरनाथ येथे असलेल्या गुंफेत हिमलिंग तयार होते अशा अनेक गुंफा हिमालय पर्वतात आहे; पण त्या ठिकाणी अशा प्रकारचे हिमलिंग पाहायला मिळत नाही.
या अमरनाथ गुंफेत नैसर्गिक वातावरण असे काही आहे, की तेथे हिमलिंग तयार होण्यासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण तयार होते. जेव्हा हिमालयातील म्हणजेच अमरनाथ परिसरातील वातावरणाचे तापमान शून्य अंश किंवा त्यापेक्षा कमी तापमान असेल तेव्हाच हिमलिंग तयार होते. दुसरी गोष्ट अशी की या अमरनाथ गुंफेत डोंगरातून पाणी ठिबकत असते. या ठिबकणाऱ्या पाण्याचा वातावरणातील कमी तापमानाचा परिणाम होऊन बर्फ तयार होतो. हा बर्फ इतका सुंदर आणि उंच असा बनतो की तो शिवलिंगासारखा दिसतो. त्यामुळेच या हिमलिंगाला शिवलिंग असेही भाविक म्हणतात. हिमालयातील अन्यत्र असणाऱ्या गुंफेमध्ये अशा प्रकारे पाणी ठिपकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी बर्फ तयार होण्याची शक्यता नाही.या अमरनाथ गुंफेत तयार झालेला बर्फ जोपर्यंत वातावरणात शून्य अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे, तोपर्यंत हा हिमलिंग अस्तित्वात असतो. जसजसे तापमान वाढेल तसतसे हिमलिंग वितळत जाते आणि ते पूर्ण नष्ट होते. चालू वर्षी म्हणजे 2025 यावर्षी 12 जुलै 2025 रोजी हिमलिंग पूर्णतः वितळलेले आहे. त्यामुळे येथून पुढे भाविकांना हिमलिंग दिसणार नाही.
शिवलिंग पाहण्यासाठी भारतातील लोक केव्हा जातात?
साधारणतः हिमलिंग तयार झाल्यावर भारतातील लोक ते पाहण्यासाठी जातात. हे हिमलिंग पाहण्यासाठी परदेशी पर्यटक सुद्धा येतात. अर्थात त्यासाठी काश्मीर खोऱ्यातील वातावरण थोडे गरम असते तेव्हा पर्यटक यायला सुरुवात करतात.उन्हाळ्यामध्ये प्रवासी लोक मोठ्या प्रमाणात हिमलिंग म्हणजेच शिवलिंग पाहण्यासाठी येतात. भाविक लोक हे आषाढ पौर्णिमेपासून ते नारळी पौर्णिमेपर्यंत शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. भारतात जेथे जेथे चमत्कार अर्थात विज्ञानाला धरून चमत्कार असो किंवा अन्य कोणत्याही कारणाने तेथे तेथे भाविक लोक हे जमत असतात. तेच शिवलिंगाच्या बाबतीत आहे. शिवलिंग हा काही दैवी चमत्कार नसून ते एक हिमलिंग असून ते तयार होण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. हे सुजाण नागरिकांनी जाणून घेतले पाहिजे.
अमरनाथ गुंफेतील हिमलिंग लवकर का वितळले?
हिमालयातील वातावरणातील तापमान वाढले की दरवर्षी हे हिमलिंग वितळत असते; पण चालू वर्षी म्हणजे 2025 यावर्षी हिमलिंग हे नारळी पौर्णिमेपूर्वीच वितळून गेले आहे. नेमके असे का घडले असावे? याबाबत विचारणा होत असते. म्हणूनच आपण ते कारण जाणून घेऊया.
एक म्हणजे जागतिक तापमान वाढ. जागतिक तापमान वाढीचा फटका हिमालयातील तापमान लवकर वाढण्यासाठी मदत झाली आणि त्याचा परिणाम म्हणून हिमलिंग लवकर वितळायला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट अशी की यात्रेकरू मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्या उच्छवासाद्वारे निघणाऱ्या उष्ण हवेमुळे हिमलिंग वितळायला मदत झाली असेही म्हटले जाते; पण दुसरे कारण पुरेसे समर्थनीय वाटत नाही. याचे कारण म्हणजे दरवर्षीच यात्रेकरू मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. मग त्यावेळी हिमलिंग का वितळले नाही? असा प्रश्न समोर उपस्थित राहतो. भाविकांच्या उच्छवासाद्वारे निघणाऱ्या उष्णतेचा प्रतिबंध करण्यासाठी अमरनाथ येथील श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने काही उपाययोजना केली होती. ही उपाययोजना म्हणजे हिमलिंगाला लोखंडी ग्रील बसवून त्याला काच बसवली,जेणेकरून भाविक लोक गुंफेत न जाता बाहेरूनच हिमलिंगाचे दर्शन घेतील ; पण ही उपाययोजना कुचकामी ठरली. आणि हिमलिंग वितळलेच. याचा अर्थ जागतिक तापमानवाढ हेच मुख्य कारण आहे. त्यामुळेच हिमलिंग वितळले आहे.