भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणे आणि झटपट श्रीमंत होणे या दोन बाबींमुळे भारतात अनेक ठिकाणी बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. आपल्याकडे चुकून सुद्धा बनावट नोट येऊ नये म्हणून ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे. जागरूक ग्राहक असेल तर बनावट नोटांचा वापर निश्चितपणे कमी होईल. जाणून घेऊया सविस्तर माहिती.
भारतात बनावट नोटा वाढत आहेत.
भारतात सर्वात जास्त बनावट नोटा आणण्याचे काम पाकिस्तान करत आहे. या पाठीमागे भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणे आणि सहज पैसे मिळवण्याचा मार्ग निवडणे या दोन उद्देशाने पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी बनावट नोटा तयार करून भारतात नेपाळ,बांगलादेश, श्रीलंकामार्गे पोचवण्याचे काम चालू आहे. अर्थात केवळ पाकिस्तान मध्येच बनावट नोटा तयार होतात असे नाही, तर भारतातही अनेक ठिकाणी बनावट नोटा तयार करण्याचे छापखाने आहेत.अनेक ठिकाणी पोलिसांनी धाड घातल्यानंतर बनावट नोटा त्याचबरोबर छपाई मशीन्स सुद्धा सापडलेले आहेत.
भिवंडीत काय घडले?
5 मे 2025 रोजी भिवंडी या छोट्याशा शहरात पाचशे रुपयांच्या सुमारे 30 लाख नोटा सापडल्या आहेत. म्हणजे जवळजवळ पंधराशे कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत.अर्थात एका धाडीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडत असतील तर अन्य ठिकाणी कितीतरी प्रमाणात चलनव्यवस्थेत बनावट नोटा असण्याची शक्यता आहे. भारतात अनेक ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून बनावट नोटांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे; पण ते पूर्णतः नष्ट करण्यास अद्याप यश आलेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बनावट नोटा केवळ भारतातच छापल्या जात नाहीत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतीय चलनात असलेल्या बनावट नोटा छापल्या जातात . त्यामुळे हे बनावट नोटांचे जाळे उद्ध्वस्त करणे भारताला जड जात आहे.
बनावट नोटा शंभर टक्के रोखता येतात. पण…
भारतीय चलन व्यवस्थेत बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. हे अगदी खरे आहे. यावर धाडी टाकून त्यांचे प्रमाण कमी करणे हा जो मलमपट्टी टाईप उपाय शोधला जातो तो पूर्णतः चुकीचा आहे. बनावट नोटांचे प्रमाण भारतीय चलन व्यवस्थेत कायमचे कमी करण्याच्या दृष्टीने एक मात्र उपाय म्हणजे भारतात संपूर्णतः ऑनलाइन व्यवहार करणे होय. प्रगत राष्ट्रात जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार होतात. त्यामुळे तेथे बनावट नोटांच्यामुळे त्यांची चलन व्यवस्था अजिबात बिघडत नाही . आज सरकार कितीही गप्पा मारत असले तरी अजूनही अनेक लोक चलन व्यवस्थेच्या बाबतीत आणि डिजिटल व्यवहाराच्या बाबतीत अशिक्षितच आहेत. अशा बहुतांश लोकांना प्रशिक्षण देऊन डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. जितके डिजिटल व्यवहार होतील, तितकेच बनावट नोटांचे प्रमाण कमी होईल. अगदीच ग्रामीण भागात जिथे डिजिटल व्यवहार करणे शक्य नाही अशा ठिकाणी ऑफलाईन व्यवहार झाले आणि तुरळक प्रमाणात नोटांचे प्रमाण राहिले तर या बनावट नोटा छापण्याच्या भानगडीत सुद्धा कोणी पडणार नाही. भारतीय चलन व्यवस्थेत बनावट नोटा आल्या म्हणून दरवेळी नोटबंदी करणे हा त्यावर उपाय नाही. नोटबंदीतून काहीही साध्य होत नाही. 2016 साली नोटबंदी झाली; पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. भारतात एकही काळा पैसा आला नाही .आणि एकही बनावट नोट सापडली नाही.