Radhanagari Dam-राधानगरी/पाटगाव धरण 100% भरले,कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका..स्वयंचलित दरवाजे कसे उघडतात पहा व्हिडीओ

श्रावण महिन्याचा शुभारंभ झाला आणि पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश धरणे 75 टक्के हून अधिक प्रमाणात भरलेली आहेत. तीच अवस्था कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100% भरलेले आहे. त्याचबरोबर पाटगाव धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे. पाहूया सविस्तर माहिती.

राधानगरी धरण 100% भरले.स्वयंचलित चार दरवाजे खुले 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या ठिकाणी असलेले राधानगरी धरण हे 8 टीएमसी पाणी साठा क्षमता असलेले असून ते शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत शंभर टक्के भरले असून धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार दरवाजे उघडलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर शहरालाही महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर असाच वाढला तर कृष्णा, कोयना,वारणा, दूधगंगा नद्याही तुडुंब भरून काठोकाठ वाहू लागतील आणि हे संकट पश्चिम महाराष्ट्रात येईलच; पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात येईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचे रहस्य

कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 1908 मध्ये राधानगरी धरणाच्या पायाचा शुभारंभ केला.ते धरण पूर्णत्वास येण्यासाठी 1952 साल उजाडले. अर्थात त्यावेळी राजर्षी शाहू महाराज हयात नव्हते. धरणाचे काम मध्यंतरीच्या काळात खूप रखडले होते. निधी उपलब्ध झाल्यावर पुन्हा जोराने सुरू झाले आणि धरण पूर्ण झाले. धरणाच्या अंतिम टप्प्याच्या वेळी जगप्रसिद्ध अभियंते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी स्वयंचलित दरवाज्यांची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात कार्यान्वित आणली. अशा प्रकारचे स्वयंचलित दरवाजे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील राधानगरी धरणावरच कार्यरत आहेत. ही बाब अभिमानास्पद आहे. धरणाच्या पाण्याची पातळी जेव्हा वाढते म्हणजे धरण पूर्ण भरते त्यावेळी या दरवाजांच्या खालच्या टोकांवर पाण्याचा दाब पडतो आणि दरवाजे हळूहळू उघडू लागतात. अर्थात हे संपूर्ण दरवाजे एक समान पातळीत असले तरी ते एकाच वेळी सर्व दरवाजे उघडत नाहीत. हे दरवाजे हळूहळू क्रमाने उघडतात.जसजसा पाण्याचा दाब वाढेल तसतसे दरवाजे उघडतात. पाण्याचा दाब अधिक वाढला तर सर्वच्या सर्व दरवाजे खुले होतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्जन होते आणि भोगावती नदी काठावरील गावांना महापुर येतो. अनेक गावातील घरे पाण्याखाली येतात .कोल्हापूर शहरातीलही अनेक घरे पाण्याखाली येतात.

Leave a comment