कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा कोल्हापूर-वैभववाडी मार्गावरील करुळ घाटात दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली. रविवारी रात्री साडेनऊ वाजता गगनबावड्यापासून दीड किमी अंतरावरील एका वळणावर अचानक खडकाचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली.तरीसुद्धा ही माहिती ठेकेदार आर बी वेल्हाळ कन्स्ट्रक्शन यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरून मोठमोठे दगड बाजूला केले आणि घाटातील वाहतूक सुरळीत केली.
गगनबावडा येथून जाणारा करुळ घाट हा चिंचोळा असला तरी निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.कोल्हापूरहून वैभववाडीला जाणारा हा शॉर्टकट रस्ता आहे. असे असले तरी करुळ घाट निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो. काही पर्यटक खास करून घाट पाहण्यासाठी पावसाळ्यात प्रवास करतात; पण अति पावसाच्या वेळी प्रवास करणे धोक्याचे आहे. कारण करूळ घाटातील दरड केव्हा कोठे कोसळतील याचा नेम नसतो.