एक काळ असा होता की गाव कुसाबाहेर दुर्गंधयुक्त हागणदारी असायची. खेड्यापाड्यात असे दृश्य नेहमी पाहायला मिळायचे. सकाळच्या वेळी गाव कुसाबाहेर जाणे किंवा गावात येणे मुश्किल होऊन जायचे. रस्त्याकडेला सर्व पुरुष, स्त्रिया शौचास बसलेली असायची. 2003/2004 च्या दरम्यान हागणदारी मुक्त गाव करण्याचं शासनाने विडा उचलला आणि अनेक गावे हागणदारीमुक्त झाली. हे खरे असले तरी आता प्रत्येक गावात,शहरात एक नवीन समस्या निर्माण झाली आहे आणि ती समस्या म्हणजे प्लास्टिकच्या कचऱ्यांचे डोंगर तयार होत आहेत. आता पुन्हा एकदा प्लास्टिक मुक्त गाव करण्याची वेळ आली आहे.
2005 पूर्वीची खेडी
आपल्या देशात 2005 पूर्वी अनेक ठिकाणी गावोगावी आणि घरोघरी शौचालय नव्हती. गावातील लोक हागणदारी म्हणून गावकुसाबाहेरील रस्त्याकडेला बसायचे.तेच त्यांचे शौचालय असायचे. त्यामुळे अनेक प्रकारची रोगराई पसरायची. गावाबाहेर दुर्गंधी पसरवायची. ही त्या वेळची वस्तुस्तिथी होती; पण गावात प्लास्टिक नव्हते. प्लास्टिकच्या बाटल्या नव्हत्या. प्लॅस्टिकच्या पिशव्या नव्हत्या. कुठेही प्लास्टिकचे कागद सुद्धा पाहायला मिळायचे नाहीत हेही मान्य करावे लागेल. त्यावेळी एक गोष्ट चांगली होती.गाव प्लास्टिक मुक्त होता; पण गाव हागणदारीमुक्त नव्हता.
2005 नंतर ची खेडी
2005 नंतर सगळेच बदलत गेले. गावेच्या गावे हागणदारी मुक्त झाली; पण हळूहळू त्याची जागा प्लास्टिकने घेतली.आज घरोघरी प्लास्टिकचा कचरा पाहायला मिळतो.हाच कचरा गावकुसाबाहेर बाहेर पाहायला मिळतोय. खेड्यातील सौंदर्य प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे नष्ट झाली आहे.
प्लास्टिक कचऱ्याचे करायचे तरी काय? ठोस उपाय नाही
प्लास्टिकची समस्या भारतात जेवढ्या प्रमाणात आहे, तेवढ्या प्रमाणात इतर देशांमध्ये नाही. अनेक देश चकचकीत आहेत. भारतात मात्र गावोगावी, शहरांमध्ये कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळतात. ओल्या कचऱ्याचे काहीही करता येते; पण या प्लास्टिकच्या कचऱ्याचे काय करायचे?हा प्रश्न जेवढा गांभीर्याने सरकार घेईल तेवढे अनेक उपाय मिळतील. अनेक प्लास्टिक उत्पादनावर बंदी घातली जात नाही. राजरोसपणे वेगवेगळ्या प्रकारची प्लास्टिकची उत्पादने बाजारात येत असतात आणि स्वस्त दरात विकली जातात. युज अँड थ्रो ची तर भरपूर प्रमाणात प्लास्टिकची उत्पादने आहेत. या उत्पादनांमुळेच भारतात खेड्यापाड्यांचे, शहरांचे रूपडे पूर्ण बदलून गेले आहे. भारतात कोठेही जा अगदी निसर्गरम्य ठिकाणीही जा, तेथे प्लास्टिकचा कचरा पाहायला मिळतो. मग आपण प्रगती केली म्हणजे नेमके काय केले? हा एक प्रश्न निर्माण होतो. आता पुन्हा एकदा प्लास्टिक मुक्त भारत अभियान राबवण्याची वेळ आली आहे.
प्लास्टिक मुक्त भारत होईल का?
भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील वरच्या क्रमांकाला असणारा देश आहे. भारतात साक्षरता ही खूप कमी आहे आणि सुशिक्षित असणाऱ्यांच्यामध्ये पर्यावरण जागृती असणारे खूप कमी आहेत. प्रत्येक जण आपलाच फक्त विचार करतो. संपूर्ण देशाचा कोणीच विचार करत नाही असे म्हणण्यापेक्षा असे विचार करणारे खूप कमी आहेत. जर्मन, इंग्लंड, अमेरिका, जपान, दुबई, सिंगापूर, मलेशिया यासारख्या अनेक छोट्या मोठ्या देशांमध्ये पर्यटनाला गेले तर ते देश अगदी चकचकीत दिसतात. प्रचंड स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहायला मिळतो; पण भारतात असे एकही शहर नाही की जिथे आदर्शवत स्वच्छता पाहायला मिळते. ही भारतातील वस्तुस्थिती आहे.
भारत हा देश प्रचंड लोकसंख्येचा असला तरी कठोर पावले उचलल्यास भारत देश सुद्धा प्लास्टिक मुक्त होऊ शकतो. प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था निर्माण करून प्लास्टिक मुक्त भारत अभियान स्थापित होणे खूप गरजेचे आहे. भारतातील प्रत्येक शहराला आणि खेड्यापाड्यातील प्रत्येक गावाला सतावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे प्लॅस्टिकचा कचरा होय. देश पातळीवर प्लास्टिक मुक्त देश करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत. युझ अँड थ्रो च्या वस्तूंवर कायमची बंदी घातली पाहिजे. त्याचबरोबर अनेक प्लास्टिकची उत्पादने कठोरपणे पावले उचलून थांबवली पाहिजेत. आहे त्या प्लास्टिकचा वापर आणि पुनर्वापर कसा होईल? हेही पाहिले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील प्लास्टिकचा कचरा कमी कसा करता येईल? यासाठीही नियोजन केले पाहिजे.प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी शहराशहरांमध्ये, खेड्यापाड्यात अनेक कारखाने निर्माण झाले पाहिजेत. इतके सर्व प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाय योजले तर निश्चितच एक दिवस भारत सुद्धा प्लास्टिक मुक्त भारत होईल.