Bori Sukhed Village Ritual-बोरी सुखेड गावात शिव्यांची अनोखी प्रथा- श्रद्धा की अंधश्रद्धा?

भारत हा देश असा आहे की या देशात कुठे आणि कोणती प्रथा सुरू होईल याचा काहीही थांगपत्ता लागत नाही. भारतात अशा कितीतरी प्रथा आहेत की त्या आश्चर्यकारक आहेत. त्याचबरोबर त्या लोकांच्या भावनांचा प्रश्न होऊन बसलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील बोरी आणि सुखेड गावातही अशीच शिव्या देण्याची प्रथा बऱ्याच वर्षांपासून चालू आहे.ही प्रथा कधीपासून आणि का चालू आहे? आणि कशी सुरू झाली याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया.

बोरी-सुखेड गावांत घडलेली घटना

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील बोरी आणि सुखेड ही दोन खेडेगाव आहेत या दोन गावातील सुना एकदा नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावांच्या सीमेवर आल्या होत्या. त्या ठिकाणी दोघींचे कडाक्याचे भांडण झाले. ते भांडण इतके विकोपाला गेले की त्या दोन्हीही सुना भांडता भांडता त्याच ठिकाणी दोन्ही गावच्या सीमारेषेवर मृत्युमुखी पडल्या. ही घटना गावकऱ्यांना खूप हृदयद्रावक वाटली. दोन्हीही गावच्या लोकांच्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर दोन्ही गावांमध्ये काही ना काही अघटीत घटना घडू लागल्या. या सर्व घटनांमध्ये त्या दोन्ही सुनांच्याच दुःखाचे कारण आहे किंवा मृत्यूचे कारण आहे अशा गावकऱ्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला .मग दोन्ही गावच्या लोकांनी ठरवले की आपण दोन्ही गावातील लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना शिव्या देऊ आणि या समस्येवर उपाय म्हणून दरवर्षी असे करू. त्याप्रमाणे दोन्ही गावचे गावकरी दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावच्या सीमारेषेवर ओढ्याकाठी येतात आणि दोन्ही कडील बायका म्हणजे स्त्रिया एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. ही प्रथा आजतागायत चालू आहे. बऱ्याच वेळा ही प्रथा बंद पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पोलिसांनीही हस्तक्षेप केला;पण ही प्रथा बंद पडली नाही. एक वर्ष ही प्रथा बंद पाडण्यासाठी पोलिसांनी खंबीर पावले उचलली ; पण त्याच वर्षी गावामध्ये मोठ्या प्रमाणात भुंगे झाले आणि हे भुंगे आपली प्रथा बंद पडल्यामुळे झाले असे लोकांना वाटले आणि लोकांनी पुन्हा ही प्रथा चालू केली ती आजतागायत चालूच आहे.

ही प्रथा म्हणजे श्रद्धा की अंधश्रद्धा?

जगाने 21 व्या शतकात प्रवेश केला असला तरी भारतात अनेक जुनाट प्रथा, अंधश्रद्धा चालूच आहेत. त्या प्रथा किंवा अंधश्रद्धा मुळासकट उपटून टाकणे भारतीय वैज्ञानिकांना किंवा भारतीय समाज सुधारकांना, विचारवंतांना शक्य झालेले नाही. शिव्यांची लाखोली वाहने ही विचित्र प्रकारची अंधश्रद्धा आहे. अशा प्रकारच्या प्रथेतून काहीही फलनिष्पत्ती होत नाही. तरीसुद्धा या अंधश्रद्धायुक्त प्रथा भारतात चालूच आहेत. अशा प्रथा चालू करण्यापेक्षा काही लोकहितवादी प्रथा गावोगावात चालू झाल्या तर जगाच्या तुलनेत भारत कुठेतरी वरच्या क्रमांकाला येईल.

Leave a comment