Spondylosis-सतत पाठदुखीचा त्रास? स्पॉंडिलायसिस असू शकतो! कारणे व उपाय

बैठे काम करणाऱ्या लोकांच्यामध्ये स्पॉंडीलायसिस हा मणक्यांच्या संबंधित आजार सर्वत्र आढळतो. स्पॉंडिलायसिस म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? कारणे कोणती? त्यावर उपाय काय? याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

स्पॉंडिलायसिस म्हणजे काय? 

आपल्या पाठीच्या मणक्याची झीज होण्याच्या प्रकाराला स्पॉंडीलोसिस असे म्हणतात. वयोमानाप्रमाणे प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात स्पॉंडीलॉसिसचा त्रास होत असतो.

स्पॉंडीलॉसिसच्या या त्रासाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा प्रकारचा त्रास कमी प्रमाणात आहे , तोपर्यंतच योग्य ती काळजी घेऊन हा आजार पूर्णतः नष्ट करण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत.

पाठीच्या मणक्यांमध्ये म्हणजे कोणत्याही दोन मणक्यांमध्ये एक डिस्क असते. या डिस्कला गादी किंवा कुर्चा म्हणतात. हा कुर्चा एकदम मऊ आणि नाजूक असतो. यालाच आपल्या शरीराचे बॉल बेरिंग किंवा शॉक ऑब्जर्वर असे म्हणतात. त्यांचे कार्यही शॉक ऑब्झर्वर प्रमाणेच चाललेले असते. हा कुर्चा जेली स्वरूपात असतो. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपल्या शरीराची झीज व्हायला सुरुवात होते तेव्हा, या डिस्कमधील पाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे दोन मणक्यांमध्ये अंतर कमी कमी होत जाते. जेव्हा हे प्रमाण अगदीच कमी होते, तेव्हा आपल्याला स्पॉंडिलोसिसचा त्रास होतो. याचा परिणाम म्हणजेच मानेचे स्नायू आखडणे, पाठीचे स्नायू आखडणे, प्रचंड प्रमाणात कंबर दुखणे, मणक्यात एकसारख्या वेदना होणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे दोन मणक्यांमधील डिस्कचे प्रमाण पूर्णच कमी होत जाते ,तेव्हा मात्र दोन मणक्यांची टोके एकमेकांना घासतात आणि मग प्रचंड त्रास व्हायला सुरुवात होते. हा त्रास इतका वाढतो की पुढे पुढे त्याचा परिणाम मज्जारुज्जूवरही होतो.

मणक्यांमधील डिस्क जेव्हा संपत जाते, तेव्हा मज्जारज्जूवर विपरित परिणाम होतो. मज्जारज्जूभोवती आणि इतर ठिकाणीही कॅल्शियमचा थर जमा व्हायला सुरुवात होते. या सर्व प्रक्रियेला स्पॉंडीलोसिस प्रोसेस असेही म्हणतात. ही प्रक्रिया वयाच्या तिसाव्या वर्षांपासून पुढे केव्हाही होऊ शकते. वयाच्या पन्नाशीनंतर आणि 75 नंतर स्पॉंडीलोसिसचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळते.

मानेच्या स्पॉंडीलोसिसची लक्षणे

बैठे काम करणाऱ्या आणि तासंतास मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करणाऱ्या लोकांमध्ये मानेच्या स्पॉंडीलोसिसचे प्रमाण आढळते. मान आखडणे, मानेची हालचाल व्यवस्थित न होणे, मान वरचेवर दुखत राहणे इत्यादी मानेच्या स्पॉंडीलोसिसची लक्षणे दिसून येतात. स्पॉंडीलॉसिसची प्रक्रिया नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात झाल्यास मज्जारज्जू आणि नसांवर दाब येऊ शकतो.
आणि अशी स्थिती निर्माण झाल्यास चालताना पायात पाय अडखळणे, पायांमध्ये जडपणा जाणवणे, चालताना पाय न उचलणे, चालताना पायातील चप्पल निसटणे, पायात किंवा तळहातात बधिरपणा जाणवणे , हातांच्या बोटांच्या सहाय्याने जी जी कामे करता येतात, ती कामे करताना अडथळा निर्माण होणे म्हणजे पॅन्टची झिप ओढता न येणे, शर्टचे बटन घालता न येणे अशी अनेक लक्षणे स्पॉंडिलेसिसचा त्रास मज्जारुज्जूपर्यंत गेला की जाणवू लागतात.

जेव्हा आपल्या शरीरातील माने जवळच्या किंवा मणक्यांजवळच्या सर्वच नसांवर दाब पडतो, तेव्हा हात , पाय यांच्यावर नियंत्रण ठेवणे खूप जड जाते. एखादा हात किंवा पाय बधिर होतो. हात किंवा पाय उचलणे शक्य होत नाही. एका बाजूची मान पूर्णपणे अवघडून राहते. अशावेळी उपचार करणे खूप जड जाते.

स्पॉंडिलेसिसवर उपचार

खरे तर स्पॉंडिलेसिसचा त्रास वाढल्यानंतर उपाय करणे किंवा उपचार करणे खूप जड जाते. सुरुवातीलाच आपण योग्य ती काळजी घेतली तर स्पॉंडीलोसिसचा आजार बरा होऊ शकतो.

पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी असे त्रास सुरू होताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आपण योगासने करणे आणि स्ट्रेचिंग सारखे व्यायाम करणे उपयुक्त ठरते.

सूर्यनमस्कार हा स्पॉंडिलायसिसवर उत्तम उपाय मानला जातो, पण स्पॉंडीलोसिस जेव्हा प्राथमिक अवस्थेत असतो, त्याच वेळी सूर्यनमस्कार फायदेशीर ठरतो.

आपल्या चालण्या फिरण्याच्या सवयी, उठण्या बसण्याच्या सवयी बदलल्यास स्पॉंडीलोसिसचा त्रास कमी होतो.

बैठे काम करणाऱ्या लोकांनी एकसारखे एकाच ठिकाणी बसून न राहता अधून मधून हालचाल केल्यास किंवा स्ट्रेचिंग केल्यास स्पॉंडीलोसिसचा त्रास टाळता येतो.

मोबाईल किंवा लॅपटॉपचा वारंवार वापर करणाऱ्या व्यक्तीने मान ताठ ठेवल्यास स्पॉंडीलोसिसचा त्रास टाळता येतो.

Leave a comment