Trump 50% tariff on India-ट्रम्प यांचा भारताला 50% टॅरिफचा धक्का

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे कारण पुढे करून ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ कर लादला आहे. गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 पासून 25 टक्के लागू होईल आणि 27 ऑगस्ट 2025 पासून आणखी 25% टॅरिफ कर लागू होईल. अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केली. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर खूप मोठा रोष असल्याचे या निर्णयातून दिसत आहे.

नरेंद्र मोदी यांचे संसदेतील भाषण आणि भारताला टॅरिफचा फटका 

ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध रोखले असल्याचे 28 वेळा जाहीरपणे म्हटले आहे; पण भारताने एकदाही ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे युद्ध बंद झाले असे कधीही म्हटले नव्हते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करत असताना ट्रम्प यांनी युद्ध रोखले आहे हे कबूल करा असे आव्हान केले होते. मोदी यांनी आपल्या भाषणात उत्तर देताना ऑपरेशन सिंदूर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समन्वयातून रोखले गेले आहे. इतर कोणत्याही देशाचा त्यात हस्तक्षेप नाही असे म्हटले होते.या गोष्टीचा डोनाल्ड ट्रम्प यांना राग आला. कारण त्यांनीच युद्ध रोखले आहे असे वातावरण संपूर्ण जगभर झाले होते. खरे काय खोटे काय हे कुणालाच कळेनासे झाले; पण ट्रम्प यांनी लादलेला कर पाहता भारताने म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विधान केले त्या विधानांमुळेच टॅरिफचा फटका संपूर्ण देशाला बसला आहे. आणि त्याची झळ भारतातील संपूर्ण नागरिकांना बसणार आहे.

आर्थिक ब्लॅकमेल 

अमेरिका भारतावर वारंवार टॅरिफ कर लादून आर्थिक दृष्ट्या ब्लॅकमेल करत असल्याचे संसदेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे दिसून येते.

*अमेरिका रशिया व्यापार वृद्धिंगत 

अमेरिकेने भारतावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याचे आरोप ठेवून 50% टॅरिफचा धक्का दिला आहे. हे जरी खरे असले तरी भारत रशियाकडून तेल आयात करतो तसेच अमेरिकाही वेगवेगळ्या वस्तू रशियाकडून मोठ्या प्रमाणात आयात करते. युक्रेन-रशिया युद्धानंतरही अमेरिकेची रशियाकडून आयात वाढलेलीच आहे. त्यामुळे अमेरिकेचे दाखवायचे दात वेगळे आहेत हेच स्पष्ट होते.

Leave a comment