कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसाने गेली दोन दिवस अक्षरश: झोडपले आहे. राधानगरी, गगनबावडा परिसरात तर पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. राधानगरी धरणाचे सातही दरवाजे खुले झालेले असून दूधगंगा नदीचे पाणी सुद्धा वाढलेले आहे. राधानगरी, दूधगंगा तुळशी, वारणा, घटप्रभा, धामणी, कोदे इत्यादी भागात प्रचंड पाऊस लागल्याने सर्वच धरणातून विसर्ग वाढल्याने पंचगंगेचे पाणी यावर्षी पाचव्यांदा पात्राबाहेर गेलेले आहे. विशेष म्हणजे कोयनाही 100 टीएमसीच्या घरात पोहोचली असून तिचे पाणी नियंत्रित आणण्यासाठी कोयनेतूनही 41 हजार क्युसेक विसर्ग चालू केला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
