वृद्ध आई-वडिलांचे पालन पोषण प्रत्येक घरातील समस्या बनली आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम? की नात्यातील प्रेम कमी झाले आहे? मुलांना का नकोसे झाले आहेत आई वडील? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
घराघरातील सर्वेक्षण केले तर….
घराघरातील सर्वेक्षण केले तर प्रत्येक घरातील सामायिक समस्या एकच जाणवेल, ती म्हणजे आई-वडिलांचे म्हणजेच वृद्ध आई-वडिलांचे एकटेपणा. कुटुंबात असूनही वृद्ध आई-वडिलांना एकटे एकटे असल्याचे जाणवते. त्यातच आई किंवा वडील यापैकी एकाचा मृत्यू झाल्यास ही समस्या आणखी तीव्र प्रमाणात जाणवते. मुलांना वृद्ध आई वडील हे अडगळीच्या वस्तू वाटतात. त्यांना कोणतेही काम जमत नाही. त्यामुळे त्यांचा काहीही उपयोग नाही. अशी भावना निर्माण होते; पण सर्वच घरात अशी परिस्थिती नसते. काही मुले आपल्या आई-वडिलांना जिवापाड जपतात. त्यांची काळजी घेतात. आरोग्याची काळजी घेतात. दवापाणी करतात. त्यांचे मानसिक आणि सामाजिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी त्यांच्याशी हितगुज करतात; पण 90% घरात असे चित्र दिसून येईल की आई वडील हे निरोपयोगी वस्तू आहेत.
पन्नास वर्षांपूर्वी कौटुंबिक वातावरण कसे होते?
1970/80 पूर्वी कौटुंबिक वातावरण खूप छान होते. कुटुंबात जिव्हाळा होता. एकोपा होता. एकमेकांच्या सहकार्याने कौटुंबिक कामे केली जात असत. आर्थिक उत्पन्नाचा सोर्स खूप कमी असला तरी कुटुंब आनंदाने राहत असे. घरातील वृद्ध आई-वडिलांची काळजी मनापासून घेतली जात असे. घरातील लहान मुलांचे सगळ्यात लाडके हे आजी-आजोबा असत. त्यामुळे घरातील आजी-आजोबांना म्हणजेच वृद्ध आई-वडिलांना एकटेपणाची कधीच जाणीव होत नसे. त्यावेळी आजारी वृद्ध आई-वडिलांचे दवापाणी करणे सुद्धा कुटुंबाला परवडणारे नव्हते. तरीसुद्धा तरी त्यांचे उत्तम प्रकारे आरोग्य सांभाळले जात असे. त्यामुळे तत्कालीन वृद्ध आई-वडिलांना जीवनाचा कंटाळा येत नसे. कुटुंबातील आनंदी वातावरणामुळे त्यांचे आयुर्मानही वाढायचे .वृद्ध आई वडील दीर्घकाळ जगावे , त्यांचा सहवास दीर्घकाळ लाभावा अशी भावना कुटुंबातील मुलांची आणि नातवंडाची असे.
मी दाजीपूरच्या केंद्र शाळेत असताना एका भिकाजी कोकरे नावाच्या धनगराच्या घरी जाण्याचा योग आला. त्याची आई म्हणजे माझ्याकडे शिकत असलेल्या मुलांची आजी आजारी होती. घरात तर अठरा विश्व दारिद्र्य होते. जंगलातील मध गोळा करून, जळणाची लाकडे विकून ही माणसे आपला उदरनिर्वाह करत होती. हे दृश्य पाहून त्या वृद्ध आईची आरोग्याची सेवा कशी करायची? हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. मी सहज म्हटलं, “आजीबाई तुमच्या दवापाण्याचे काय?” तर ती म्हातारी मला म्हणाली, “गुरुजी, काय सांगू?त्या भिक्याला मी सांगत होतो की घरासाठी साठवलेले पैसे माझ्या दवाखान्यावर खर्च करू नकोस. चांगले घर बांध आणि त्या घरात तुम्ही निवांत रहा. माझे आता काही राहिले नाही. माझ्या दवापाण्यासाठी खर्च करू नका; पण भिक्याने काही ऐकले नाही त्याने घर बांधण्यासाठी साठवलेले एक लाख रुपये आईच्या ऑपरेशन साठी आणि दवा पाण्यासाठी खर्च केले.” मी म्हटलं, “भिकाजी, तू असं का केलंस?” तर तो म्हणाला, “सर, आमची आईच आम्हाला सर्वस्व आहे तिला अशा वेदनामय अवस्थेत आम्ही पाहू शकत नाही. म्हणून आम्ही घर बांधण्याचं रद्द करून आईसाठी उपचार करून आईला ठणठणीत करून घेतले.” हे सर्व ऐकून मला खूप समाधान वाटले. मी उठणार इतक्यात ती आजी म्हणाली, “अरे भिक्या, गुरुजींना एक मधाची बाटली आणून दे.” भिकाजीने ताबडतोब एक मधाची बाटली आणून दिली. मी ती बाटली घेतली आणि पाचशे रुपये देऊ लागलो, तर ती आजी म्हणाली, “हे भिक्या, गुरुजींचे पैसे घेतलेस तर याद राख.” भिकाजी मला म्हणाला, “गुरुजी, ही मधाची बाटली तुम्हाला आम्ही दिली आहे त्याचे पैसे घेणार नाही. आमच्या मुलांची काळजी तुम्ही किती करता! त्यांना चांगले शिकवता यातच आमचे समाधान आहे. तुमचे मधाचे पैसे घेतले तर आम्हाला झोप लागणार नाही. गुरुजी पैसे देऊ नका”. भिकाजी आणि त्याच्या घरातील आजी यांचे मोठे मन पाहून मला असे वाटले की खरंच ही माणसे खूप श्रीमंत आहेत. अशी परिस्थिती सगळीकडे आज का दिसत नाही? याचे आश्चर्य वाटते आणि मनाला खंतही वाटते.
दुसरा एक असाच अनुभव मी सांगू इच्छितो. एका सेवानिवृत्त व्यक्तीला मी विचारले, “काय हो ,कशी काय आहे तब्येत? परवा मला समजले की मुलांनी तुम्हाला घाईघाईने दवाखान्यात नेले. बीपी वाढली होती का? मला समाधान वाटले मुलांनी तत्परता दाखवल्याबद्दल आणि आनंदही वाटला.” त्यावर ते काहीच बोलले नाही आणि नंतर म्हणाले, “कुठलं काय साहेब! माझी पेन्शन बुडेल ना ! म्हणून ते घाईघाईने दवाखान्यात घेऊन गेले. दुसरं काही नाही.ना प्रेम, ना ममता!” या गोष्टीचे मला खूप वाईट वाटलं. मी त्यांना आधार दिला आणि तिथून निघून गेलो.
या दोन्हीही कथा किती परस्पर विरोधी आहेत पहा. एका सुशिक्षित घरातील दुसरी कथा, तर एका अशिक्षित घरातील पहिली कथा. प्रत्येकालाच पहिल्या कथेतील मुलांप्रमाणे मुले भेटावीत अशी अपेक्षा करतो.
कायद्याने संरक्षण :पण तक्रार कोण करतो?
वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्याचे, त्यांचा दवा पाणी बघण्याचे कायद्याने संरक्षण दिले आहे. न्यायालयात गेल्यास आई-वडिलांना पोटगी मिळते .त्यांना काम करण्याची शक्ती नसेल तर सांभाळ करण्याचा आदेश न्यायालयाकडून दिला जातो; पण एवढे कायद्याने संरक्षण दिले असूनही बहुतांश आई-वडील न्यायालयात किंवा पोलिसांकडे जात नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याच मुलांविरुद्ध आपण तक्रार कशी करायची? यामुळे आपलीच अब्रू जाईल आणि आपल्यालाच लोक म्हणतील, मुलाविरुद्ध तक्रार केलीस? सामाजिक बांधिलकी ओळखून आई-वडील तक्रार करत नाहीत किंवा ज्यांची इच्छा असते त्यांना तिथंपर्यंत जाऊ दिले जात नाही. यातूनही काही आई-वडील कठोर मन करतात आणि मुलांना कायद्याचा बडगा दाखवतात;पण त्यातून जिव्हाळा जपला जात नाही. मुलांच्या मनात पुन्हा आकस राहते. प्रेम राहत नाही. आईवडिलांना सांभाळ करण्याचे केवळ नाटक केले जाते.आई-वडील मुलांपासून विभक्त राहत असतील तर पोटगी देतात. पण अशा पोटगीपेक्षा त्यांना गरज असते ती प्रेमाची! जिव्हाळ्याची! आपुलकीची!पण हे मुलांना कधी कळणार?
तुम्ही आम्हाला सांभाळले म्हणून काय झाले! आम्ही नाही का सांभाळत आमच्या मुलांना?
बऱ्याच वेळा आई-वडिलांना आपल्या मुलांकडून तुम्ही आम्हाला सांभाळले म्हणून काय झाले ? आम्ही नाही का आमच्या मुलांना सांभाळत. मग तुम्ही असे वेगळे काय केले? उलट तुमच्यापेक्षा अनेक फॅसिलिटीज आम्ही आमच्या मुलांना देत आहोत. चांगल्या शाळांमध्ये शिकवत आहोत. अशी उत्तरे त्यांची मुलं वृद्ध आई-वडिलांना देतात. आणि जबाबदारी झटकून देतात. पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या आई वडिलांनी उत्तम प्रकारे सांभाळल्यामुळे ती मुले आपल्या मुलांना त्याहीपेक्षा उत्तम प्रकारे सांभाळतात;पण याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक आई-वडिलांचा सांभाळ करायचाच नाही.ते एक कर्तव्यच होते .आम्ही तेच करत आहोत, असे म्हणून सांभाळ करण्याची जबाबदारी ढकलणे हे कितपत योग्य आहे? उलट जेवढी आई वडिलांची जबाबदारी असते त्यापेक्षाही अधिक जबाबदारी मुलांची आई-वडिलांच्या वार्धक्यात असते. हेच मुले विसरतात आणि आपल्या नवीन संसारात गुंतून जातात.
सुशिक्षित मुलांमध्ये अधिक प्रमाण
आई-वडिलांचे मुले जेवढी कमी शिक्षित आहेत, तेवढी ते चांगल्या प्रकारे सेवा करतात;पण सुशिक्षित मुलांच्यामध्ये सेवा करण्याचे हे प्रमाण खूपच कमी आहे. सुशिक्षित सुनांना सासू-सासरे नको असतात. त्यांचे सेवा करायला नको असते. म्हणून सुना आणि मुले घरापासून दूर राहतात.जेथे नोकरी करतात किंवा व्यापार करतात तेथेच आपले बस्तान बसवतात आणि आई-वडिलांना आपल्या जुन्या घरात निवांत ठेवतात. पण ते आई वडील निवांत असतात का? त्यांना ज्यावेळी आपल्या मुलांचा आधार हवा असतो त्यावेळी मुले जवळ नसली तर त्यांचे स्वास्थ्य कसे राहील चांगले? वृद्ध आई-वडिलांना आपल्या नातवंडांसोबत खेळायचे असते. त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करायच्या असतात;पण त्यांचीच मुले आजी-आजोबांकडे आपली मुले पाठवून देत नाहीत. त्यांच्या संपर्कातच येऊ देत नाहीत. हे सुशिक्षित मुलांच्यामध्ये सरसकट घडत असते. आजी आजोबा चुकीच्या गोष्टी आपल्या मुलांना सांगत असतात. अशा तक्रारी करणाऱ्या अनेक सुना आहेत आणि अनेक मुलेही आहेत; पण त्या आजी आजोबांचे अनुभव, त्यांची जीवनशैली नातवंडांना अनुभवायची असते. त्यांच्याशी गप्पा मारायला नातवंडांना खूप आवडते; पण हेही सुख त्यांचीच मुले त्यांना मिळवून देत नाहीत. याहून त्या वृद्ध पालकांचे दुर्दैव ते कोणते?
आई वडील एक उत्पन्नाचे स्रोत!
ज्या मुलांचे आई-वडील किंवा वडील नोकरीला होते आणि सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युएटी, पेन्शन विक्री , प्रॉव्हिडंट फंड इत्यादी बाबीतून भरपूर पैसा मिळतो. त्या पैशांवर ही अनेक मुलांचा डोळा असतो.आई-वडिलांना आपल्या मुलांसाठी पैसे खर्च करावेसे वाटणे साहजिकच आहे; पण सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पैसे हे त्यांच्या भविष्यातील अडचणी दूर करण्यासाठी, आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी असतात. ते पैसे तातडीने संपवून टाकले तर भविष्यात अनेक समस्या येतात. अनेक वृद्ध लोकांना औषधोपचार करण्यासाठी किंवा मोठी शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळ पैसे नसतात. त्यांचीच मुले या वृद्ध आई-वडिलांसाठी पैसे खर्च करण्याची मानसिकता दाखवत नाहीत. ही आजच्या आधुनिक जीवनातील वृद्ध आई-वडिलांचे समस्या आहे.म्हणून सेवानिवृत्त लोकांनी आपले पैसे राखून खर्च करावेत. भविष्याचा वेध घेऊन खर्च करावेत. काही रक्कम गुंतवणूक म्हणून सुरक्षित ठेवावी.
मुलांच्या फोनची आई वडिलांना प्रतीक्षा
परदेशात असणाऱ्या किंवा नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झालेल्या मुलांचे आई-वडील हे आपल्या मूळ गावीच राहत असतात. असे चित्र बहुतांश ठिकाणी आढळते. मुले आपल्या कामात असतात .व्यापात असतात. दुर्दैव हे की त्यांना आई-वडिलांची ख्याली खुशाली विचारण्यापुरता सुद्धा वेळ मिळत नाही ! चुकून फोन केला तर त्यात आपले रडगाणे ऐकायला मिळते .आपल्या मुलांना पाहायला मिळत नाही, नातवंडांना पाहायला मिळत नाही. निदान त्यांचे आवाज फोनवरून तरी ऐकायला मिळावेत, व्हिडिओ कॉल मधून त्यांना पाहता यावे, ही माफक अपेक्षा आई-वडिलांची असते; पण तिथेही मुले आणि त्यांच्या सुना दुर्लक्ष करतात.त्यामुळे वृद्ध आई-वडिलांना एकाकीपणाची जाणीव अधिकच होत राहते.
वृद्धाश्रम: एक मलमपट्टी
ज्या वृद्ध आई-वडिलांना त्यांचीच मुले सांभाळत नाहीत, अशा आई-वडिलांसाठी त्यांचे हातपाय चालत नसतील तर वृद्धाश्रमात राहण्याशिवाय पर्याय नसतो. काही मुले तर आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. वृद्धाश्रमातील दरमाही जी काही फी आहे ती भरतात; पण आई-वडिलांना घरी ठेवत नाहीत. माझे एक शिक्षक होते, जे आम्हाला दहावीला गणित शिकवत होते, त्यांचे वडील वृद्धाश्रमात असल्याचे मला समजले. घरात सेवा होत नाही म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले होते. आता या आणि अशा शिक्षकांकडून किंवा अशा मुलांकडून आम्ही कोणत्या आदर्श कल्पना घ्यायच्या? मला ही घटना समजल्यावर खूप वाईट वाटले. वृद्धाश्रमात ठेवले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. वृद्ध आई-वडिलांना अन्न पाणी दिले म्हणजे झाले नाही. त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात गरज असते ती मुलांच्या आधाराची. मुलांच्या प्रेमाची.नातवंडांच्या प्रेमाची. पण हेच प्रेम आपण हिसकावून घेतो आणि घरात अडगळ नको म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो. हे कितपत योग्य आहे? ज्या वृद्ध पती-पत्नीला मुलेच नाहीत अशा लोकांसाठी वृद्धाश्रम ही एक काळाची गरज आहे;पण स्वतःची मुले असताना वृद्ध आई-वडील वृद्धाश्रमात जाणे ही संस्कृती म्हणायची की विकृती? खरे तर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये हीच अपेक्षा.