खरं तर कोणताही सण, उत्सव साजरा करत असताना तो पर्यावरणपूरक कसा राहील याकडे सर्वांनी लक्ष देण्याची आता वेळ आली आहे. गौरी-गणपतीचा हा एक असाच सण आहे की तो सुरुवातीला पर्यावरण पूरकच होता. पण अलीकडच्या वीस-पंचवीस वर्षांचा इतिहास पाहता त्याचे बदलते स्वरूप हे पर्यावरणास घातक होत आहे. म्हणूनच पुन्हा एकदा पर्यावरणपूरक गौरी-गणपतीचा सण साजरा करण्यासाठी जागृती निर्माण व्हायला हवी.
गौरी गणपतीचा सण केव्हा येतो?
गौरी गणपतीचा सण हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला येतो. हा सण भाद्रपद चतुर्दशीला संपतो. काही ठिकाणी हा सण- दीड दिवसांचा असतो. काही ठिकाणी हा सण पाच दिवसांचा, सात दिवसांचा असतो. सार्वजनिक गणेशोउत्सव मंडळांचा हा सण मात्र दरवर्षी दहा दिवसांचा असतो.गणेशाचे आगमन चतुर्थीला होते आणि विसर्जन चतुर्दशीला होते.
उत्सवाचे वाढते इव्हेंट
आजकाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशाचे स्वागत वेगवेगळ्या वाद्यांनी करतात. काही गणेशोत्सव मंडळे ही पारंपरिक वाद्यांनी गणेशाचे वाजतगाजत आगमन करतात, तर काही गणेशोत्सव मंडळे डॉल्बी, डीजेसारख्या कर्णकर्कश आवाजांच्या आणि विक्षिप्त नृत्यांच्या साहाय्याने गणेश यांचे आगमन करतात. यातील पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात केलेला गणेशाचे स्वागत यामुळे फारसे काही बिघडत नाही; पण डीजे आणि डॉल्बीसारख्या वाद्यांनी गणेशाचे स्वागत करणे म्हणजे अनेक आजारांना विशेषतः हृदयविकारासारख्या आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होतेच त्याचबरोबर मानवी जीवनावर थेट परिणाम होतो.
प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणि विविध रंग
गणेशाच्या मूर्ती बनवण्यासाठी पूर्वीच्या काळी मातीचा किंवा शाडू मातीचा उपयोग केला जात असे. त्यामुळे फारशी पर्यावरणाची हानी होत नसे. आता मात्र सर्रास राज्य शासनाने बंदी घातलेली असतानाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात आणि विशेष म्हणजे त्याचा पुनर्वापर हे टाळला जातो. गौरी गणपतीचा सण झाला की त्याचे विसर्जन नदी, तलावात केले जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण होते. अशा प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन उत्सवाच्या नावाखाली जलप्रदूषण करणे किंवा पर्यावरणाची हानी करणे हा काही धार्मिक उत्सवाचा हेतू नव्हता; पण आता तो एक इव्हेंट झाल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
पर्यावरण पूरकच गणपती उत्सव करा आणि आपले आरोग्य वाचवा
सर्वांनी पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. घरांमध्ये आरास करताना सुद्धा पर्यावरणपूरक आरास कशी असावी याचाही विचार केला पाहिजे. मातीचीच मूर्ती बसवली पाहिजे. ती रंगहीन असेल तर अधिक चांगली. आणि त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे.दरवर्षी आम्ही मातीच्याच गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आणि गौरी गणपतीचा सण साजरा करतो. सर्वांनी गौरी गणपतीचा सण साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची आणि पर्यावरण पूरक आरासाचा वापर केला पाहिजे.