भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक संदर्भ दडलेला असतो. घटस्थापना हा सण त्याला अपवाद नाही. हा सण शेतकऱ्यांचा सण मानला जातो, कारण यात थेट धान्य, शेती आणि कृषिप्रधान जीवनपद्धतीचा सन्मान केला जातो. घटस्थापने दिवशीच दुर्गा मातेची ही उपासना केली जाते. दुर्गा माता म्हणजेच भवानी, अंबिका, पार्वती होय.
घटस्थापना म्हणजे काय?
घटस्थापना म्हणजे नवरात्राची सुरुवात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतातील धान्याच्या बिया कुंडीत किंवा घरातील पवित्र स्थळी पेरतात. ज्वारी, गहू, हरभरा, तांदूळ अशी विविध धान्ये पेरून त्यांची उगवण कशी होते याची पाहणी केली जाते.
ही पेरणी ही केवळ धार्मिक विधी नसून पूर्व हंगामी शेतीचे परीक्षण आहे. अंकुर चांगले आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण हंगाम चांगला जाईल असा विश्वास वाटतो.
कृषिप्रधान भारताचा वारसा
भारताला प्राचीन काळापासून कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते.
सिंधू संस्कृतीत (हडप्पा-मोहेनजोदडो) नांगर, कोठारे, सिंचन यंत्रणा आढळतात, ज्यावरून शेतीला मिळालेलं महत्त्व दिसून येतं.
द्रविड संस्कृतीत पिके, ऋतुचक्रानुसार शेती पद्धती आणि अन्नसाठवण यांचा ठसा आढळतो.
वैदिक काळातही “अन्नं ब्रह्म” या संकल्पनेतून अन्नाला देवतासमान स्थान दिले गेले.
यावरून स्पष्ट होते की भारतातील प्रत्येक संस्कृती शेतीकेंद्रित आणि धान्यप्रधान होती.
सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व
घटस्थापना केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे.
धान्याची उगवण म्हणजे समृद्धी आणि आशेचे प्रतीक.
नवरात्रीत वाढणारे कोवळे अंकुर दशमीच्या दिवशी देवीला अर्पण केले जातात.
शेती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घटस्थापनेत दिसून येतो.
घटस्थापना आणि शेतकऱ्यांचा जीवनक्रम आहे. बळीराजा हा कृषीप्रधान राजा होता. म्हणूनच शेतकऱ्याला बळीराजाही उपमा दिली जाते. बळीराजाचा शेतीशी निगडित खूप मोठा त्याग आहे. बळीचे राज्य हे शेतकऱ्यांचे राज्य, सुखाचे ,समाधानाचे आणि शांतीचे राज्य मानले जायचे. म्हणूनच लोक म्हणतात,” इडा पिडा टळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे”.
आजही ग्रामीण भागात शेतकरी घटस्थापनेला विशेष महत्त्व देतात.
धान्य ही खरी संपत्ती आहे या जाणीवेचा हा सण प्रतीक आहे.
यामधून शेतकऱ्यांच्या परिश्रम, मेहनत आणि आशा यांना नवीन दिशा मिळते.
आधुनिक काळात उद्योग, तंत्रज्ञान, आयटी क्षेत्र विकसित झाले तरीही भारतातील खरी ओळख अजूनही शेतीतच आहे.
तात्पर्य
घटस्थापना हा भारतीय शेतकऱ्यांचा परिश्रम, आशा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. सिंधू संस्कृतीपासून आजपर्यंत भारतात शेतीला जितके महत्त्व होते, तितकेच ते पुढेही टिकून राहील. हा सण आपल्याला शिकवतो की –
“धान्य हेच खरे धन, आणि शेती हीच खरी संस्कृती.”