महाभारत समकालीन श्रीकृष्णाचा जन्म झाला. याच दरम्यान महाभारत पूर्वकाळात दत्तात्रेयाचा जन्म झाला. दत्तात्रेयाचा जन्म, त्यांचे वंश आणि शिकवण हे भारतीय समाजाला आजही माहीत नाही. त्याचा परिचय करून देण्याचा या लेखातून प्रयत्न करीत आहे.
दत्तात्रेयांचे पूर्वज
प्राचीन काळात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला दैवत्वाचे रूप देण्याचे काम तत्कालीन लेखकांनी केले आहे; पण त्या व्यक्तींना एक माणूस म्हणून पाहिल्यास त्यांच्या जन्माचा, त्यांच्या शिकवणीचा आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. दत्तात्रेयांचा जन्म अत्रि ऋषी आणि अनसूया यांच्यापासून झाला. अत्रि ऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे दत्तात्रेय होय.दत्तात्रेय म्हणजेच अत्रीपासून प्रकट झालेला असा तो. अनसूयाचे पूर्वज कोण होते? म्हणजे दत्तात्रेयांच्या आईचे पूर्वज कोण होते ते पाहूया-
बळीवंश आणि दत्तात्रेय
आजच्या भारतीय समाजाला फक्त बळीराजाबद्दलच माहीत आहे. त्याच्या पूर्वजांबद्दल आणि वंशजांबद्दल फारसे माहीत नाही. बळीराजाचे पूर्वज म्हणजे हिरण्याक्ष होय. हा हिरण्याक्ष खूप पराक्रमी राजा होता. त्याचा पुत्र हिरण्यकशिपू होय. हा हिरण्यकश्यिपू तर महापराक्रमी होता. हिरण्यकश्यपूची गोष्ट तुम्हाला माहीत आहे ते प्रल्हाद आणि भक्ती या रूपात सांगितली जाते.पण ती खरी गोष्ट नाही प्रल्हाद हा नारायणाचा कधीच भक्त नव्हता. बळीवंशातील राजे आणि विष्णू परंपरेतील राजे यांचे हाडवैर होते. त्यामुळे प्रल्हाद नारायणाचा कधीच भक्त होऊ शकत नाही ;पण पुराणात खोटी कथा लिहून ठेवली आहे. प्रल्हादाचा पुत्र म्हणजे विरोचन होय. विरोचनला दोन मुलगे होते.एक कपिल आणि दुसरा बळीराजा होय. कपिल मुनी हा प्रचंड तत्वज्ञानी होता. भारतीय समाजात आजही रुजलेली आश्रम व्यवस्था म्हणजेच ब्रह्मचर्याश्रम,गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या चार आश्रम व्यवस्थेची लोकप्रियता आजही भारतीय समाजात आहे. असे महान तत्वज्ञ बळी वंशात जन्मलेले होते.याच कपिल मुनीची मुलगी म्हणजेच अनसूया होय. अनसूयाच्या पोटी जन्मलेला महान तत्वज्ञ आणि भारतीय समाजात ज्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत तो म्हणजे दत्तात्रेय होय.
दत्तात्रेयाचा जन्म आणि दत्त जयंती
दत्तात्रेयाला त्याचे आजोबा कपिल मुनी आणि वडील अत्रि ऋषी यांच्याकडून भारतीय तत्त्वज्ञानाची खूप मोठी परंपरा लाभलेली होती. ते विरक्त जीवन जगत होते. त्यांनी भारतीय समाजाला एक नवी दिशा दिली होती. दत्तात्रेयांच्या विचाराचा एवढा प्रभाव भारतीय समाजावर आहे की महाभारत कालीन जन्मलेले या दत्तात्रेयांची आजही जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि आजही या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भारतात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी दत्त जयंती साजरी केली जाते.
दत्तात्रेयांची शिकवण
दत्तात्रेयांच्या शिकवणीबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी ते भारतीय दर्शन शास्त्राचे पुरस्कर्ते होते. दर्शनशास्त्र हे वास्तवाशी धरून होते. जे आहे ते आहे आणि नाही ते नाही असे विचार सांगणारे होते. काल्पनिक गोष्टीवर आणि अद्भुत शक्तीवर विश्वास न ठेवणारे शास्त्र म्हणजे दर्शनशास्त्र होय. दत्तात्रेयाने आजन्म विरक्त राहून जनतेला जी शिकवण दिली त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत—-
1 प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन जगत असताना त्यात साधेपणा ठेवावा.कोणत्याही प्रकारचा भपकेबाजपणा असू नये. आपल्या महत्त्वाकांक्षांचा त्याग करून आपले जीवन सुकर आणि समाधानी कसे होईल हे पाहावे. अति लोभामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते.
2 दत्तात्रेयाने आपल्या तत्त्वज्ञानातून समतेची शिकवण दिली. सुखदुःख, लाभ-नुकसान यांना समान मानावे. ते आपल्या दैनंदिन जीवनात येतात आणि जातात. त्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होता कामा नये. म्हणजेच आपण या गोष्टींकडे विरक्त नजरेने पाहावे अशी शिकवण दत्तात्रेयाने दिली.
दत्तात्रेयांचे गुरु आणि शिकवण
दत्तात्रेयाने आपल्या जीवनात 24 गुरू केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतले.अशा प्रकारे 24 गुरु करणारे दत्तात्रेय हे एकमेव पुढारलेले व्यक्तिमत्त्व होते. दत्तात्रयांचे 24 गुरू होते आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यामुळे ज्ञान मिळाले. प्रत्येक वस्तू आणि परिस्थितीतून माणूस शिकत असतो आणि त्यातून त्याला नवीन संदेश मिळत असतो. हे दत्तात्रेयांच्या शिकवणीचे मूळ आहे.
एकमुखी दत्तात्रेय
भारतात दत्तात्रेयाचे अनेक ठिकाणी मंदिरे आहेत;पण बहुतांश ठिकाणी तीन तोंडे असलेले दत्तात्रेय पाहायला मिळतात. दत्तात्रेयांना ब्रह्मा, विष्णू महेश असे म्हटले जाते; पण अशा प्रकारे तीन तोंडे असलेली व्यक्ती आढळणे म्हणजे हे विज्ञानाशी विसंगत आहे. त्यांच्याकडे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे गुण होते,हे वरवर कारण दिले जाते;पण दत्तात्रयांची शिकवण ही खूप वेगळी होती आणि त्यांना माणूस म्हणून पाहिल्यानंतर त्यांची खरी शिकवण आपल्याला कळेल. महाराष्ट्रात दत्तात्रेयांची एक मुखी मूर्ती असलेली काही ठिकाणी पाहायला मिळते.कोल्हापूरामध्ये सुद्धा दत्तात्रेयांची एकमुखी मूर्ती आहे. कोल्हापुरातील खरी कॉर्नर या ठिकाणी एकमुखी दत्तात्रेय आपल्याला पाहायला मिळतो.
छत्रपती शिवाजी महाराज, राम, कृष्ण याप्रमाणेच दत्तात्रेय हा एक माणूस होता . त्या दृष्टिकोनातूनच दत्तात्रेयाचे तत्त्वज्ञान आणि शिकवण लक्षात घेतले तर ते अधिक संयुक्तिक ठरेल.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा