मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे रस्त्यावर वायू गळती झाली. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव 30 तास वाहतूक ठप्प करण्यात आली. यामध्ये प्रवाशांचे आणि लहान मुलांचे खूप हाल झाले. सर्वांची वाताहात झाली. वाहतूक यंत्रना विस्कळीत झाली.
*वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचे हाल*
मुंबई-पुणे मेगा हायवेवर अचानक झालेल्या वायुगळतीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली.या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांजवळील पाण्याचा साठा संपला आणि त्यांचे हाल सुरू झाले. लहान मुलांच्या अन्नासाठी तर पालकांची वणवण सुरू झाली. अनेक वाहनांमधील इंधन संपल्यामुळे वाहने धक्का मारून बाजूला करण्याची वेळ आली. अशा अनेक समस्या केवळ मेगा हायवेवर झालेल्या वायुगळतीमुळे निर्माण झाल्या. खरे तर तातडीने उपाययोजना करून महामार्ग मोकळा करणे आवश्यक होता; पण सरकारकडून संथ गतीने पावले उचलल्यामुळे प्रवाशांचे आणि लहान मुलांचे अतोनात हाल झाले.
*प्रचंड वाहतूक कोंडी आणि सक्तीची टोल वसुली*
मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे -मुंबई एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणात वायुगळतीमुळे वाहतूक कोंडी झाली. असे असूनही टोल ठेकेदारांनी या वाहतूकदारांवर कोणत्याही प्रकारची दया न दाखवता सक्तीने टोल वसुली केली. त्यामुळे प्रवाशांच्यामध्ये आणि वाहतूकदारांच्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.अशावेळी खरंतर सरकारने तातडीने लक्ष घालून टोल फ्री करायला हवे होते.