यावर्षी म्हणजे 2026 च्या वर्षी 15 मार्चपासूनच महाराष्ट्रात अवकाळी म्हणजे वळीव पावसाची सुरुवात झालं झाली असून मराठवाड्यासह कोकण भागात सुद्धा अनेक ठिकाणी वादळी आणि गारपीटसह अवकाळी पाऊस झाल्यामुळे आंबा आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी वळीव पाऊस कमी अधिक प्रमाणात लागत असतोच. निसर्गाच्या कोपापुढे शेतकऱ्यांचे काहीही चालत नाही. सरकारच्या मदतीची फक्त अपेक्षाच असते. पंचनामे केले जातात; पण शेतकऱ्यांना म्हणावी तशी मदत मिळत नाही. गेल्या वर्षी 15 मे 2025 पासूनच मान्सून पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. दरवर्षापेक्षा 15 ते 20 दिवस अगोदर पावसाने संपूर्ण भारतभर हजेरी लावली होती आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक शेतकऱ्यांची पेरणीच राहून गेली. एकदा सुरू झालेला पाऊस अखंडितपणे पुढे चालू राहिला आणि त्याचा फटका शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बसला. अवकाळी पावसामुळे आणि विशेषतः वादळी आणि गारपीट पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. हे नुकसान भरून न येण्यासारखे असते. त्याला मदतीची गरज असते. योग्य मदत शेतकऱ्यांना दरवर्षी मिळत राहिली तर पुन्हा नवीन जोमाने शेतकरी शेती करण्यास कामाला लागेल.