दुबई दर्शन…. एक अविस्मरणीय प्रवास / Dubai Tourism

आमच्या लहानपणी कधी कधी मोठी माणसं मुंबईला जात. मग ही मुंबई रिटर्न माणसं गल्ली बोळातून ‘मी जिवाची मुंबई कशी केली ?’ याच गप्पा मारत फिरत असत. त्यामुळे त्यावेळी एक म्हण रूढ झाली होती, “जिवाची मुंबई एकदा तरी करावी”. आज परिस्थिती बदलली आहे. जग खूप जवळ आले आहे. काळाच्या ओघात म्हणी पण बदलल्या आहेत. ‘जन्माला यावे आणि एकदा तरी दुबई पाहायला जावे’ ही म्हण आता समाजात अधिक रुजत आहे.

काय आहे त्या दुबईत ? (What is in Dubai?)

संपूर्ण जगातील पर्यटक ज्या ठिकाणी भेट देतात, ते ठिकाण म्हणजे दुबई(Dubai).मलाही दुबईला जाण्याचा योग आला तो मित्रमंडळींच्या आग्रहाखातर. कोल्हापूरच्या ‘Heaven Travellers’ यांनी 16 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत ‘दुबई- अबुधाबी’ सहल आयोजित केली होती. यात आम्ही सामील झालो. माफक दर आणि नियोजनबद्ध कार्यवाही, यासाठी Heaven Travellers प्रसि‌द्ध आहे. राज बुगडे, वर्षा बुगडे, संकेत पानारी आणि स्नेह‌ल या सर्व मंडळींनी खूप मोठे सहकार्य केल्यामुळेच आमचा दुबई प्रवास यशस्वी झाला म्हणायला हरकत नाही.

महाबलीपुरम (Mahabalipuram)

महाबलीपुरम कोठे आहे? महाबलीपुरम येथे पाहण्यासारखे काय आहे? महाबलीपुरम चेन्नईपासून किती किलोमीटर दूर आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात.

 

15 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता आमचा दुबई प्रवास कोल्हापूर पासून सुरु झाला. 16 जानेवारीला पह‌ाटे 3:00 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही पोहोचलो. लागलीच आम्ही मुंबईत मुंबई-चेन्नई विमानात बसून सकाळी नऊ वाजता अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. 16 जानेवारीचा दिवस आमच्या हातात होता. म्हणून आम्ही चेन्नईपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेले महाबलीपुरम पाहायला गेलो. तेथे कृष्णचरित्रावर आधारित शिल्पकला पाहिली.आम्हाला वेगळे पाहायला मिळेल अशी अशा होती; पण हे स्थळ इतके काही नावीन्यपूर्ण वाटले नाही. परतीच्या प्रवासात वराह अवतारातील विष्णू मंदिर पाहिले आणि थेट चेन्नईला येऊन मरीन बीच पाहिला. रात्रीच्या वेळी मरीन बीचला यात्रेचे स्वरूप आले होते. एवढी प्रचंड गर्दी मी यापूर्वी कोणत्याच beach वर पाहिली नाही.चेन्नईतील हे बीच लोकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते.

17जानेवारी 2024 रोजी आम्ही पहाटे 2:30 वाजता चेन्नईच्या अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. पहाटे पाच वाजता आमच्या विमानाने अबुधाबीच्या दिशेने झेप घेतली.आमच्यापैकी बहुतांश लोक आयुष्यात प्रथमच परदेश दौरा करत होते. त्यामुळे आम्ही सर्वजण खूपच उत्साही, रोमहर्षक तर होतोच, त्याच बरोबर आमच्यापैकी कुणीतरी चुकून हरवले तर…….! ही रुखरुखही मनात घर करून बसली होती.

दुबई प्रवास (Dubai Tour)

दुबई कोणत्या देशात येते? दुबई हा देश आहे का? संयुक्त अरब अमिरात या देशात किती राज्ये आहेत? संयुक्त अरब अमिरात देशातील सर्वात मोठे जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

बघता बघता आम्ही भारताची सीमारेषा ओलांडून संयुक्त अरब अमिरात देशात प्रवेश केला. संयुक्त अरब अमिरात या देशाची स्थापना शेख जाएद यांच्या नेतृत्वाखाली मे 1971 मध्ये झाली असून या देशात एकूण सात राज्ये आहेत. अबुधाबी, दुबई, शारजाह, उम्म अल कुवैन, अजमान, फुजइराह, रस अल कुवैन या सात राज्यांनी मिळून संयुक्त अरब अमिरात हा देश बनला आहे. असे असले तरी राज्यांना बऱ्याच अंशी स्वायत्तता असल्याचे जाणवले. प्रत्येक राज्याने स्वकर्तृत्वावर आपला विकास केला आहे, हे दुबई पाहिल्यानंतरच आमच्या लक्षात आले. 17 जानेवारी रोजी सकाळी साधारणत:8:30 वाजता आम्ही अबुधाबीच्या शेख जाएद आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो आणि त्या दिवसापासून पुढील पाच दिवसांसाठी आम्ही foreigner झालो. आयुष्यात प्रथमच आम्ही foreigner झालो होतो. अबुधाबीचे प्रचंड आणि देखणे विमानतळ पाहून आमचे डोळे विस्फारून गेले होते.काही क्षण मोकळ्या जागी थांबलो आणि हे सुंदर विमानतळ डोळ्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला.

दुबई ते अबुधाबी रस्ता कसा आहे?दुबईत राहण्याची सोय कशी आहे?

सकाळी 9:00 वाजता एका खासगी बसमध्ये आम्ही सगळे बसलो आणि आमची बस दुबईच्या दिशेने सुसाट सुटली.शेख जाएद या राष्ट्रीय सात पदरी महामार्गाचा आमचा दोन तासांचा सुमारे 160 किमी अंतराचा प्रवास म्हणजे एक दिवसा पडलेले स्वप्नच होय. सुतासारख्या सरळ आणि कुठेडी खड्डा नसलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना आमच्या पोटातील पाणी सुद्धा हालत नव्हते. इतकेच नव्हे बसमध्ये पाणी पिताना घरी बसून अगदी आरामात पाणी पीत आहोत, असे भासत होते.भारतात कोणत्याही रस्त्यावर बसमधून न सांडता पाणी पिऊन दाखवा आणि हजार रूपये मिळवा,अशी पैज लावायला हरकत नाही.भारतीय रस्ते, त्यांत होणारी खाबुगिरी आणि दुबईतील रस्ते यांची तुलनाच होऊ शकत नाही.बसचा प्रवास करताना दुबईच्या हद्दीत प्रवेश केल्यावर तर आमचे डोळे विस्फारून गेले. गगनचुंबी आणि देखण्या इमारती आम्ही आयुष्यात प्रथमच पाहत होतो. डोळ्यांत न सामावणारे हे अद्‌भुत दृश्य आम्ही कॅमेऱ्यात मात्र कैद करून घ्यायला विसरलो नाही. बघता-बघता आम्ही दुबईत कधी पोचलो, हे कळलेच नाही. दुपारी 12:30 वाजता एका भारतीय ‘बाँबे बाइट्स’ या हॉटेलात जेवण घेतले आणि बुक केलेल्या व्हिजन हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी आम्ही गेलो. रुम नंबर 422 ला आम्हा उभयतांचा पाच दिवस मुक्काम होणार होता.

धाऊ क्रुझ कोठे आहे? दुबईतील प्रसिद्ध नृत्यप्रकार कोणता? Tanoura Dance कोणत्या देशात प्रसिद्ध आहे?

थोडी विश्रांती घेऊन सायंकाळी 7:30 वाजता आम्ही सर्व पर्यटक ‘धाऊ क्रुझ’ या कृत्रिम बंदरावर पोहोचलो. तेथे मोठ-मोठ्या क्रुझ होत्या. बुक केलेल्या क्रुझमध्ये आम्ही प्रवेश केला. क्रुझ येथे बनवलेल्या कृत्रिम खाडीतून फिरत असताना आम्ही क्रुझवरच डीनर घेतले. येथेच नृत्याचा बहारदार कार्यक्रम ठेवला होता.एका पुरुष नर्तकाने ‘Tanoura Dance’ करून प्रेक्षकांची मने जिंकली.आमच्यातील अनेकांनी उत्फूर्तपणे आणि मनमुराद‌ Dance केला. मीही Dance केला.लोकांना तो आवडला.त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.खूप मनोरंजन झाल्यावर रात्री उशिरा आम्ही व्हिजन हॉटेलवर आलो. अशा प्रकारे दुबईतील पहिला दिवस आनंद‌दायी गेला.

जबिल पॅलेस( King’s Palace Dubai)कसा आहे? दुबईत रहदारीचे नियम कसे पाळले जातात?

 

गुरुवार दिनांक 18 जानेवारी, 2024 रोजी सकाळी लवकर उठून स्नान-संध्या आवरल्यावर आम्ही हॉटेलच्या टॉप मजल्यावर नाष्टा करण्यासाठी गेलो. नाष्टा छान होता. ठीक 9:30 वाजता दुबई पाहण्यासाठी बसमध्ये येऊन बसलो.बसमधून जाताना रहदारीचे नियम, स्वच्छता या गोष्टी लक्ष वेधून घेत होत्या. आज आम्ही प्रथम जबिल पॅलेस (King’s Palace) पाहणार होतो. तत्पूर्वी दुबईचा राजा शेख महंमद बिन राशिद अल मक्तुम यांच्या विषयी आणि दुबई विषयी थोडी माहिती घेऊ. आमच्या सोबत संकेत बरोबरच दुबई दर्शन घडवणारे आणि दुबईतील माहिती भरभरून सांगणारे जमीन अहमद हे पाकिस्तानी गाइड होते. ते खूप चांगल्या पद्‌धतीने प्रत्येक ठिकाणाची माहिती अगदी तळमळीने सांगत होते.भारत आणि पाकिस्तान यांच्यात वैर फक्त राजकीय लोकांमध्येच आहे,सर्वसामान्य लोकांमध्ये नाही. राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी समाजात विष पेरत असतात , हेही आवर्जून त्यांनी सांगितले.

दुबईतील राज्यकारभार कसा चालतो?दुबईच्या बाद‌शाहाचे नाव काय? दुबईत महत्त्वाचे उत्पादनाचे स्रोत कोणते?जबिलपॅलेस(King’s Palace) कोठे आहे?

 

इ.स. 2001/2002 साली दुबईचा बाद‌शाह शेख महंमद बिन राशिद अल मक्तुम यांनी घोषणा केली ,की भविष्यात दुबई हे जागतिक पर्यटन स्थळ असेल. राजाच्या घोषणेची नोंद वर्तमान पत्रांनी घेतली. अनेकांना ही घोषणा हास्यास्पद वाटली. हे वाळवंट कसं काय जागतिक पर्यटन स्थळ बनेल ? लोकांना ही घोषणा पटण्यासारखी नव्हती. दुबईत राजेशाही आहे. लोकशाही नाही. राजाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे जनतेचे आणि प्रशासनाचे कर्तव्य असते.”दुबई भविष्यात एक आकर्षक पर्यटन स्थळ” हा विषय लोकांनी थट्टा-मस्करीवर नेला होता; पण राजाने दुबईला पर्यटन स्थळ करण्यासाठी आपल्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली होती. दुबईचे जीवन हे पेट्रोल उत्पादनावर अवलंबून होते; पण हे पेट्रोल भविष्यात संपल्यानंतर पुढे काय ? याच विचाराने राजाला ग्रासले होते. म्हणूनच त्याने आर्थिक उत्पाद‌नाचा दुसरा पर्यायी मार्ग म्हणून पर्यटनाला महत्त्व दिले होते. ज्या दुबईला पाणी पिण्यासाठी वणवण करावे लागते, ती दुबई जागतिक पर्यटन स्थळ होईल का ? कोणी म्हणेल राजाला हे दिवास्वप्न पडले आहे;पण राजाने ते सत्यात उतरले.

आज दुबईकडे पाहता दुबईच्या राजाचे स्वप्न सत्यात उतरले आहे.अठराव्या शतकात जन्माला आलेली दुबई जगाच्या नकाशावर एक नामांकित शहर म्हणून झळकत आहे .दुबईत बहुतांश वीज डिझेल, गॅसच्या माध्यमातून निर्माण केली जाते. सध्या तरी दुबईला डिझेलचा तुटवडा नाहीं. दुबईत एके काळी धड पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते; पण आज दुबईने समुद्राचे पाणी कन्व्हर्ट करून पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी वापरले आहे. दुबईसारख्या ठिकाणी दररोज बाथ टबमध्ये अंघोळ करणे अशक्य होते. ते आता दुबईकरांनी शक्य करून दाखवले आहे. रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडे, झाडे फुलवली आहेत. जिथे मोकळा जागा मिळेल तिथे लॉन तयार केली आहे. एवढे असूनही पाण्याचा एकही थेंब दुबईकर वाया घालवत नाहीत. कुठेही सांडपाणी साठलेले आढळणार नाही, फुलझाडे, झाडे यांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवले जाते. डास, किडे, मुंग्या, झुरळ, ढेकूण हे कीटक तेथे औषधालाही सापडणार नाहीत. दररोजची स्वच्छता, टापटीपपणा यांत दुबईकर खूप पुढे गेले आहेत.दररोज हजारो पर्यटक दुबईत येतात; तरी सु‌द्धा दुबई स्वच्छ,टापटीप दिसते. कुठेही कागदाचा किंवा प्लॅस्टिकचा तुकडा सु‌द्धा दिसणार नाही.बसमध्ये कोणताही खाद्‌यपदार्थ खाण्यास बंदीआहे. त्यामुळे बसेस, भाडोत्री वाहने स्वच्छ आणि टापटीप असतात.स्वच्छतागृहात कुठेही दुर्गंधी येत नाही, मग ते सार्वजनिक असले तरी……

रहदारीच्या बाबतीत तर नियम खूप काटेकोरपणे पाळले जातात. हायवेला वेगाने वाहने धावत असतात, तरी सुद्धा त्यांच्यात सुरक्षित अंतर असते. रस्ता ओलांडताना पाद‌चाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. अगदी पादचारी रस्त्याच्या कडेला रस्ता ओलांडण्यासाठी उभा जरी राहिला, तरी दोन्हीकडील वाहन वीस फुटापेक्षा जास्त अंतरावरच थांबतात. त्यामुळे अपघात हा प्रकार दुबईत नाहीच. आपल्याकडे समृद्‌धी महामार्ग अपघाती महामार्ग म्हणून ओळखला जातो. भारतात वाहने डावीकडून चालवली जातात. वाहनांचे स्टिअरिंग उजव्या बाजूला असते. दुबईत याउलट स्थिती असते.

दुबईतील अनेक बाबींचे निरीक्षण आणि परीक्षण करता करता आम्ही जबिल पॅलेसच्या (King’s Palace) च्या आवारात कधी प्रवेश केला हे कळलेच नाही. तेथे कोणत्याही प्रकारची फारशी सुरक्षितता आढळली नाही. राजवाड्याच्या बाहेर एक वाहन आणि एक सुरक्षा कर्मचारी तेथे आढळला. आपल्याकडे अशा प्रकारे राष्ट्रपती भवनात सहज प्रवेश मिळेल का ? असा प्रश्‍न कदाचित अनेकांच्या मनात घोळू लागला असेल. तेथे जनतेला जे नियम आहेत, तेच नियम राजालाही लागू आहेत.राजा दुबईतून कधी कधी पायी फेरफटका मारतो; पण लोक कधीही त्याच्याभोवती गराडा घालत नाहीत. आपल्याकडे मात्र गावात साधा पुढारी जरी असला तरी लोकांची झुंबड उडालेली असते. मी जवळचा की तू जवळचा, यात जणू स्पर्धाच लागलेली असते. त्यामुळे निकोप लोकशाहींच्या मूल्याचा र्‍हासच होत आहे. राज्यकर्ते जनतेच्या सेवेसाठी आहेत; जनता राज्यकर्त्यांसाठी नाही, हे भारतीय जनतेला समजण्यासाठी आणखी किती शतके लागणार आहेत? हेच कळत नाही जबिल पॅलेसच्या आवारात आम्ही भरपूर फोटो शूट केले.अप्रतिम राजवाडा, अद्‌भुत सौंदर्य आणि कमालीची स्वच्छता
पाहून आम्ही थक्कच झालो. येथील बाद‌शाह शेख महंमद बिन राशिद अल मक्तुम् यांची भेट झाली असती तर नक्कीच खूप गप्पा मारून त्यांचे मन जिंकले असते. असो…..

जुमैरा बीच

जुमैरा बीच कोठे आहे? जुमैरा बीचला white open beach असे का म्हणतात?जगातील सर्वांत महागडे Seven Star Hotel कोठे आहे? दुबईतील मोना रेलमधून दुबई दर्शन.जगातील सर्वांत मोठी फोटो फ्रेम कोठे आहे?दुबई फ्रेम

 

राजवाडा पाहून आम्ही बसमध्ये बसलो आणि काही अंतरावर असणाऱ्या ‘White open beach'[जुमैरा बीच] वर आम्ही पोहोचलो.हे बीच पण खूप सुंदर वाटले. समोर निळा अथांग सागर आणि किनारी शुभ्र खडक आणि वाळूचाही रंग काहीसा शुभ्रच! येथूनच जगातील सर्वांत महाग Seven Star हॉटेल अगदी काही फर्लांगावर असून या हॉटेलची दिमाखदार इमारत येथून स्पष्टच दिसत होती, येथे सुद्धा आम्ही भरपूर फोटो सेशन केले आणि मोनो रेलच्या दिशेने आमची बस निघाली. मोनो रेल मधून दुबई दर्शन केले. मोनो रेलचा प्रवास काही आवडला नाही.

फोटो फ्रेम (Dubai Photo Frame)

मोनो रेलमधून भ्रमंती झाल्यानंतर आम्ही जगातील सर्वांत मोठी फोटो फ्रेम पाहायला निघालो. जबिल पार्क येथे दुबई फ्रेम आहे. या फ्रेमला दुबई फोटो फ्रेम असेही म्हणतात. ही फ्रेम अद्‌भुत तर आहेच. या फ्रेममधून लिफ्टच्या साहाय्याने 150 मी उंचीवर जाता येते. फ्रेमचा आडवा भाग आहे, त्याच्या खालच्या बाजूला काच बसवली आहे. या काचेवरून 10 metre चालत जात काचेतून संपूर्ण दुबई पाहता येते. पुन्हा फ्रेमच्या दुसर्‍याबाजूने लिफ्टच्या साहाय्याने उतरता येते. आमच्यापैकी नऊ जणांनी या फ्रेममधून प्रवास करण्याचा आनंद घेतला. बी. डी. पाटील, चौगले मामा या सर्व नऊ जणांना आम्ही नवग्रह किंवा नवरत्न म्हणून चिडवायचो.त्यांनी सहलीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपले वैशिष्ट्य जपले. येथेही आम्ही फोटो सेशन केले आणि लंच साठी ‘बाँबे बाइट्स’ हॉटेलच्या दिशेने चाललो.

बुर्ज खलिफा (Burj Khalifa)

जगातील सर्वांत उंच इमारत कोठे आहे? बुर्ज खलिफा कोठे आहे?बुर्ज खलिफा कोणी बांधला? बुर्ज खलिफात किती मजले आहेत?

 

गुरुवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता व्हिजन हॉटेल वरून ऐतिहासिक ‘बुर्ज खलिका’ पाहण्यासाठी आम्ही रवाना झालो.

दुबईतील हा खलिफा अतिशय देखणा ,सुंदर आणि जगप्रसि‌द्ध आहे. 828 मी उंच आणि 163 मजले असलेला हा खलिफा जगातील सर्वांत उंच खलिफा म्हणून आहे. यापेक्षा उंच इमारत जगात कोणत्याही देशाने बांधलेली नाही. साधारणतः 2003 साली या इमारतीचे बांधकाम सुरु झाले होते. सहा वर्षातच ही भव्य इमारत पूर्ण झाली. 4 जानेवारी 2009रोजी या इमारतीचे उद्‌घाटन होऊन ही इमारत लोकार्पण करण्यात आली. दुबईच्या राजाने दूरदृष्टीने उभारलेली ही इमारत जगातील सर्वांत लोकप्रिय इमारत आहे ,असे मला वाटते. हा बुर्ज खलिफा पूर्णत्वास येण्यासाठी आठ अरब डॉलर खर्च आला होता. इमार या जगप्रसिद्ध कंपनीने हा खलिफा बांधला.

बुर्ज खलिफामध्ये प्रवेश करताच आमचे डोळे दिपून गेले.अख्ख्या आयुष्यात जे कधी पाहिले नाही ते आम्ही पाहात होतो.सारे काही अद्‌भुत होते.अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रवेश करताच सुरुवातीला आपल्याला दुबई मॉल पाहावयास मिळतो. हा खलिफा आणि हा मॉल पाहायला संपूर्ण जगातील पर्यटक येथे येतात. दररोज हजारो पर्यटक या खलिफाला visit दयायला येतात. धर्म वेगळे, भाषा वेगळ्या, देश वेगळे, वेश वेगळे, प्रत्येक देशातील माणसे वेगळी हे सर्व दृश्य बुर्ज खलिफाच्या एकाच छताखाली पाहायला मिळते.

बुर्ज खलिफातील दुबई मॉलमध्ये जवळ जवळ 30000 शॉपिंग सेंटर्स आहेत. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मॉल आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचे Animal Tanks आहेत. त्यांत जवळजवळ 33,000 प्राणी अहित. वेगवेगळ्या प्रकारच्या मास्यांची संख्या लक्षणीय आहे. येथेच सिनेमागृहे आहेत. 124 musical restaurants, 163 प्रकारची फुलझाडे, ग्रंथालय, Fountain Show सर्वकाही एकाच छताखाली पाहून आम्ही थक्कच झालो.

दुबईतील Fountain Show

वेगवेगळ्या प्रकारच्या shopping Centres चे ओझरते निरीक्षण करत आम्ही Fountain Show पाहण्यासाठी गेलो. अडीच ते तीन मिनिटाच्या या शोमध्ये संगीत आणि गायनाच्या तालावर नृत्य करणारे कारंजे पाहून आमचे मन तृप्त झाले. कारंजांच्या नृत्यातून गायनातील स्वरांचे भाव उमटत आहेत, असा आभास निर्माण होत होता. Show पाहिल्यानंतर KFC Point ला सर्वांनी एकत्र यायचे ठरले होते.आमच्यातील कोणीही हरवू नये, यासाठी आम्ही काळजी घेत होतो. त्यानंतर आम्ही बुर्ज खलिफाच्या 124 आणि 125 व्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टच्या दिशेने जाऊ लागलो. लिफ्टमध्ये गेल्यानंतर साठ सेकंदातच आम्ही 124 व्या मजल्यावर पोहोचलो. रात्री नऊच्या दरम्यान दुबईचा नजारा पाहू डोळ्यांचे पारणे फिटले. विद्युत रोषणाईने नटलेली दुबई पाहताना जणू आम्ही अवकाशातच आहोत आणि दुबई हा जणू तारकांचा पुंजकाच आहे, असे भासमान दृश्य उघड्या डोळयांनी आम्ही पाहात होतो. येथे आम्ही काचेवरून चालत असताना काच जणू निखळून खाली पडते की काय? आणि तिच्याबरोबर आपणही…. असे क्षणभर वाटले. बुर्ज खलिफावरून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. नयनरम्य प्रवास संपल्यावर आमची पावले बसच्या दिशेने वळली.

अबुधाबी कशी आहे? संयुक्त अरब अमिरातची राजधानी कोणती ? अबुधाबीतीला Place of Island असे का म्हणतात?

 

शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी संयुक्त अरब अमिरात (UAE) चे मुख्य राज्य म्हणजेच मुख्यालय ‘अबुधाबी ‘पाहायला निघालो.नेहमीप्रमाणेच सकाळी साडेनऊ वाजता दुबई-अबुधाबीला जोडणाऱ्या शेख जाएद राष्ट्रीय महामार्गावरुन बसने निघालो. अबुधाबी’ ही UAE ची राजधानी असून खलिफा बिन जाएद अल नाहयान हे UAE हो राष्ट्राध्यक्ष आहेत; तर शेख महंमद् बिन राशिद अल मक्तुम हे पंतप्रधान आहेत. दुबई आणि अबुधाबी यांतील फरक सांगायचा झाला तर दुबई ही बनवलेली सिटी आहे आणि अबुधाबी ही पिढ्यान् पिढ्या विकसित झालेली सिटी आहे. येथील 80% लोक स्थानिक अमिराती आहेत, तर दुबईतील 70% हून अधिक लोक बाहेरील आहेत.

Hindu Temple In Dubai

 

अबुधाबीला जाता जाता थोडीशी वाकडी वाट करून आम्ही’Hindu temple’ पाहायला गेलो. दुबईच्या राजाने भारतीयांना येथे मंदिर, गुरुद्वारा, चर्च उभारण्यास परवानगी दिली आहे. तिन्ही प्रार्थना स्थळे एकाच ठिकाणी आहेत. सुंदर आणि नयनरम्य आहेत. येथे स्वच्छता, टापटीपपणा, शिस्त कमालीची पाहायला मिळाली. अगरबत्या लावणे, गुलाल उधळणे, भंडारा लावणे, उधळणे ,नारळ वाढवणे ,जेणे करून वातावरणामध्ये प्रदुषण होईल, असे कोणतेच प्रकार येथे पाहायला मिळाले नाहीत. येथे कमालीची शांतता आढळून झाली. तिन्ही प्रार्थना स्थळांची पाहणी करून आम्ही अबुधाबीच्या दिशेने चाललो.

पूर्वीच्या काळी अबुधाबीतील लोक नौका बांधणीचे काम आणि मासेमारी करायचे. आता पेट्रोलियम पदार्थ्यांचे उत्पादन हाच येथील अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. अबुधाबीच्या सीमारेषेत प्रवेश करताच High-Way चा रंग तपकिरी होतो. उंट आणि येथील तपकिरी रंगाची वाळू या दोन घटकांचे वैशिष्ट्य अबुधाबी राजाने जपले आहे.आणखी एक बाब म्हणजे अबुधाबीला Place of Island असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या राज्यात सुमारे 2000 हून अधिक छोटी छोटी Islands’ आहेत. श्रीमंत लोकांची संख्या अबुधाबीत मोठ्या प्रमाणात आहेत. काही वेळातच आम्ही फेरारी वर्ल्ड हा पॉईंट पाहिला आणि खजूर बाजारात गेलो. येथे fix rate नाहीत. bargaining चालते. आम्ही मजदूल ही प्रसिद्ध खजूर खरेदी केली.अनेकांनी मनसोक्त खजूर खाल्ली .खरेदी केली आणि बसमध्ये बसून एका भारतीय हॉटेलात जेवायला गेलो.

शेख जाएद ग्रँड मॉस

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मशिद कोठे आहे?शेख जाएद ग्रँड मॉस कोठे आहे?

 

दुपारचे जेवण उरकल्यानंतर आम्ही अबुधाबीच्या प्रेसिडेन्ट निवास स्थानाजवळच एक सुंदर बीच आहे, या बीचवर थोडा वेळ रेंगाळलो. मनसोक्तपणे केले आणि प्रेसिडंट निवासाला वळसा घालून अबुधाबीतील सुप्रसिद्ध मशिद ‘शेख जाएद ग्रँड मॉस’ च्या दिशेने आम्ही रवाना झालो.

सायंकाळी सहाच्या दरम्यान आम्ही या मशिदीजवळ पोचलो. भुयार मार्गाने काही अंतर गेल्यावर मशिदीच्या प्रांगणात आलो.सगळे एकत्र जमल्यावर मशिदीत प्रवेश केला .त्याच वेळी मशिदीत दिवे लागले. त्यामुळे मशिदीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले, सौदी अरब मधील मक्का आणि मदिना या दोन भव्य मशिदीनंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेले अबुधाबीतील हे मशिद अत्यंत शुभ्र इटालियन मार्बलपासून बनवलेले आहे. बारा एकर जमिनीवर हे मशिद बांधले असून या मशिदीत एका वेळी चाळीस हजार लोक नमाज पडू शकतात. मशिदीत प्रवेश करण्यासाठी स्त्रियांनी अंगभर वस्त्रे परिधान करणे आवश्यक आहे. साडी चोळी परिधान करून मशिदीत जाण्यास मनाई आहे. ही मशिद बांधणासाठी 3000 पेक्षा जास्त कामगारांनी काम केले आहे. जवळ जवळ 38 कंपन्यांनी मशिद बांधण्यासाठी काम केले आहे. या मशिदीत 85 दालने असून प्रत्येक दालन भिन्न लांबी-रुंदीचे आहे. या मशिदीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मशिदीला चार मिनार व एक कळस आहे. मिनारच्या आणि कळसाच्या शिखरावर सुमारे एक टन सोन्याच्या पत्र्याचा मुलामा दिला आहे. मशिदीच्या मुख्य दालनात भव्य-दिव्य असा झुंबर आहे. जगातील विविध देशातील लोक येथे आले की नियमांचे पालन करून मशिद पाहून घेतात. मशिद पाहून आम्ही पुन्हा दुबईला व्हिजन हॉटेलवर मुक्कामाला गेलो.

मीना बाजार (Meena market)

जगातील सर्वांत मोठी सोन्याची व्यापारपेठ कोठे आहे?जगातील सर्वांत मोठी सोन्याची अंगठी कोठे आहे? जगातील सर्वांत मोठ्या अंगठीचे नाव काय?

 

शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजीचा आमचा अर्धा दिवस मीना बाजारातील सोन्याच्या पेठेत गेला.सोने हे भारतीयांचे आकर्षण आहेच.म्हणूनच हा दिवस राखून ठेवला होता.

दिल्लीचा चांदणी चौक, मुंबईचा चोर बाजार, पुण्याची तुलशी बाग हे बाजार जसे आहेत, तसाच दुबईतील मीना बाजार पसिद्ध आहे. मीना बाजारात नेमके काय काय अति ते पाहण्यासाठी आम्ही शनिवारी सकाळी 9:30 वाजता मीना बाजारात जेथे सोन्याची अधिक दुकाने आहेत, तेथे गेलो.बहुतेक जगातील सर्वात मोठी सोन्याची व्यापारपेठ दुबईतच असेल. खूप मोठ्या प्रमाणात येथे सोन्याचे दागिने बनवले जातात.विशेष म्हणजे येथे सोन्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते.

मीना बाजारात आम्ही सर्वात प्रथम एका भारतीय सोने व्यापाऱ्याच्या सोन्याच्या दुकानात गेलो. अनिल धाणव या गुजराती व्यापाऱ्याने दुबईत आलिशान सोन्याचे दुकान धाटले आहे. त्यांच्याच दुकानात जगातील सर्वांत मोठी अंगठी आहे. विशेष म्हणजे ही अंगठी 64 किलोग्रॅम वजनाची असून या अंगठीची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड’ मध्ये नोंद झाली आहे. या अंगठीलाला ‘तायबा अंगठी’असे नाव दिले आहे. जगातील अनेक पर्यटक मीना बाजारात आले की ही तायबा अंगठी आवर्जून पाहायला येतात. अंगठीसोबत फोटो शूट करतात. आम्हीही या अंगठीसोबत फोटो शूट केले. ही अंगठी बनवण्यासाठी 55 कामगारांना 45 दिवस 10 तास लागले, असे दुकानाचे मालक सांगत होते आमच्यातील अनेक लोकांनी मनसोक्त सोने आणि सोन्याचे विविध प्रकारचे दागिने पाहण्याचे नेत्रसुख घेतले.

भारतातील सोन्याचा दर आणि दुबईतील सोन्याचा दर यात प्रति दहा ग्रॅम साधारणतः पाच ते सहा हजारांचा फरक पडतो. भारतापेक्षा दुबईत सोने स्वस्त आहे. म्हणूनच येथे अनेक लोक मनसोक्त सोने खरेदी करतात. येथे कॅरेटप्रमाणे सोन्यान्चे दर fix असले तरी Making Charge मध्ये bargaining चालते. दुबईतील सोन्याच्या दुकानात गेले की अनेकांचे खिसे रिकामे झाले तरी खरेदी थांबत नाही, असे म्हणतात ते अगदी खरे आहे. मीना बाजारातील सोने बाजाराचा आनंद लुटल्यावर आम्ही दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि तासभर विश्रांती घेतली.

दुबईतील Desert Safari

 

शनिवारी दुपारी ठीक अडीच वाजता आम्ही आलिशान फोरव्हिलरमधून शारजाह स्टेटच्या हद्दीत Desert Safari साठी रवाना झालो. तेथे सर्वांत प्रथम Amusement Point वर थोडा वेळ रेंगाळलो.येथे वाळवंटात सफारी करण्यासाठी छोट्या छोट्या फोरव्हिलर, टूव्हिलर आहेत.येथे दिराम[पैसे] भरून मनसोक्त सफारीचा आनंद घेता येतो.

संयुक्त अरब अमिरात या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? दुबईतील Belly Dance Amusement Point of Dubai

बहिरी ससाणा हा संयुक्त अरब अमिरात देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. या Amusement Point वर काही अरब लोक हातात बहिरी ससाणा घेऊन फिरताना दिसले. हा ससाणा हातात घेऊन फोटो काढण्यासाठी देतात. त्यासाठी पाचशे रूपये द्यावे लागतात. या Amusement Paint पासून सुमारे 6 किलोमीटर वाळवंटात आमची वाहने जाऊ लागली.वेडीवाकडी वळणे, चढउतार असा हा रोमांचक आणि थरारक प्रवास अनुभवता आला.मग पुढे एका ठिकाणी आम्ही थांबलो.वाळवंटातील छोट्याशा टेकडीवर सुद्धा चढताना आमची दमछाक व्हायची. येथेही साम्ही ग्रुप फोटो काढले आणि वाळवंटातील एका रिकाणी Belly Dance पाहण्यासाठी आम्ही उतरलो.. सायंकाळी साडेसहा वाजता आम्ही Belly Dance Point वर आलो. येथेही भरपूर अरब लोक आम्हाला भेटले. मूळ अरब लोकांचे common वैशिष्ट्य म्हणजे साडेसहा ते सात फूट उंची आणि धिप्पाड देह, स्त्रिया सुद्धा उंच.येथे स्टेजच्या चारही दिशांना प्रेक्षक बसले होते आणि मधोमध स्टेजवर नृत्य चालू होते. चारही दिशांच्या प्रेक्षकांना खूश करत नृत्यांगना नाचत होती. नृत्याच्या जोडीला Perfect अभिनयाची जोड होती. त्या नृत्यांगनेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. Belly Dance नंतर येथेही Tanoura Dance पाहायला मिळाला. संयुक्त मारब अमिरात या देशात Tonoura Dance हा लोकप्रिय नृत्यप्रकार असावा असे वाटते. याशिवाय पेटत्या मशाली हातात घेऊन नृत्य सादरीकरण झाले. तिन्ही नृत्य प्रकारात प्रत्येक वेळी एकच कलाकार आपली कला सादर करीत होता. हेही येथे एक वेगळे वैशिष्ट्य जाणवले. येथेच Dinner Party झाली. आजचे Dinner काही आवडले नाही. त्यानंतर आम्ही सगळे मुक्कामासाठी Vision Hotel वर पोहोचलो. आज प्रथमच आम्ही साडेनऊ पूर्वी रुमवर पोहोचलो होतो.

मिरॅकल गार्डन (Miracle Garden)

मिरॅकल गार्डन कोठे आहे?

 

रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी आम्ही सर्वजण लवकर उठलो. आजचा दिवस आमच्यासाठी दुबईतील शेवटचा दिवस होता. घरची ओढही होती आणि अजून काही Points पाहायचे होते. सकाळी साडेनऊ वाजता Vision Hotel वर आमचे Check out झाले आणि गेली पाच दिवस चांगले स्वास्थ्य ज्याने दिले, ते Vision Hotel आम्ही सोडले. आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आजच्या दिवस आम्ही Foreigner आहोत याची आम्हाला जाणीव झाली होती. सोमवारी सकाळी आम्ही मुंबईत पोहोचू .त्यावेळी आम्ही foreign return होणार .हेही आम्हाला उमगले होते. असो……..

दुबईत म्हणजे अगदी वाळवंटी प्रदेशात निर्माण केलेली Miracle Garden नावाप्रमाणे खरोखरच अदभुत आहे. सुमारे 72000 चौ.मी. जागेत वसलेल्या या बागेतील प्रत्येक फुलझाडाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवले आहे. सन 2013 साली व्हॅलेंटाइन डे या दिवशी ही बाग लोकांसाठी खुली करण्यात आली होती. या बागेत सुमारे 25 कोटी रोपे आहेत. या रोपांना लागलेल्या फुलांची गणती केल्यास 5 million फुले या बागेत असतील. विविध देशातील लोक ही miracle Garden पाहायला येतात. इथे तर फोटो काढायला भरपूर संधी आहे. फोटो काढावे तितके थोडेच. सगळीकडे फुलांचा बहर पाहून डोळे दिपून जातात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रचना, वेगवेगळे आकार पाहून थक्क होऊन जायला होते. सगळीकडे फुलेच फुले;पण कोणीही फुलांना हात सुद्धा लावत नाही. एखादे फूल तोडण्याचा मोह सुद्धा कुणाला होत नाही.नटवलेल्या निसर्गाची किमयाडोळे भरून पाहायची. आपल्याकडे morning walk ला जाणारी मंडळी काय करतात ? याचे उत्तर सर्वांना माहीत आहेच. फुलांचे खिसे भरून घरी येतात. सर्वांनी Miracle Garden ला आवश्य भेट द्या आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटून या.

ग्लोबल व्हिलेज (Globle Village- Dubai)

 

मिरॅकल गार्डन पाहून पुन्हा काही लोक मीना बाजारला गेलेत. बराच वेळ टाईमपास झाला. सायंकाळी सात नंतर आम्ही दुबईतील शेवटचे ठिकाण म्हणजे Globle Village पाहायला गेलो. Globle Village मध्ये वेगवेगळ्या तीसहून अधिक देशांनी आपल्या संस्कृतीचे, कलागुणांचे, व्यापारा‌चे प्रदर्शन भरवलेले आहे. ग्लोबल व्हिलेज पाहायला सुमारे दोन ते अडीच तास लागतात.या ठिकाणी भारतीय कलाकारांनी मुंबईच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. इतर देशांच्या तुलनेत भारतीय कलाकारांची कला फिकी पडल्याचे जाणवले. ग्लोबल व्हिलेज पाहून आमची पावले शारजाह विमानतळाच्या दिशेने पडू लागली.

16 जानेवारी 2024 ते 22 जानेवारी 2024 या सात दिवसांच्या दुबई प्रवासात अनेक अविस्मरणीय अनुभव आले.या अविस्मरणीय अनुभवाचे सोबती होते ते दिलीप चव्हाण, शशिकुमार पाटील, संजय बरगे, कुंडलीक हातकर, विलास संकपाळ, बाबुराव शिरसाट, अशोक पाटील, बी. डी. पाटील, कृष्णात खामकर, आनंदा सावर्डेकर, यशवंत संकपाळ, शिवाजी ढेरे, श्रीकांत वणकुद्रे, अशोक बेडेकर, बाळासो चौगले, कुंडलिक चौगले, विजयकुमार पाटील, नायकू काळे, सर्जेराव काळे इत्यादी पुरुष मंडळींबरोबर आम्ही काही लोक संपत्नीक गेलो होतो. त्यांत शारदा पाटील, सुप्रिया पाटील, निर्मला चव्हाण,राजश्री बरगे, दीपाली हातकर, संयोगिता खामकर, सुवर्णा संकपाळ, विमल संकपाळ, सुजाता सावर्डेकर, सुरेखा ढेरे ,पूजादेवी शिरसाट, आनंदी पाटील, संगीता वर्णकुद्रे या महिला मंडळींनी खूप मोठे योगदान दिले आहे. आपला नवरा, सर्व साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे .दुबईचा प्रवास सुखाचा, समाधानाचा आणि आनंददायी झाला याचे कारण म्हणजे या सर्व महिला मंडळी आहेत.याशिवाय संकेतचेही खूप योगदान आहेच. Heaven Travellers ने आमचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा केला.त्याबद्दल धन्यवाद.

संभाजी पाटील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक

माजी शिक्षण विस्तार अधिकारी राधानगरी.

फोन: 9049870674…

Leave a comment