महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा किनारा कोकणासाठी वरदान आहे. शिवकाळात परकीयांपासून संरक्षण होण्यासाठी याच किनाऱ्याने आणि किनाऱ्यावरील किल्ल्यांनी साथ दिली. त्यातीलच एक किल्ला ‘जंजिरा’. जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरूड गावाशेजारील एका बेटावर वसलेला आहे.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जंजिरा दुर्ग आहे.या किल्ल्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
किल्ल्याचे नाव : जंजिरा
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
समुद्रसपाटीपासून उंची : ० मीटर
चढाईची श्रेणी : सोपी
ठिकाण : मुरूड, जि. रायगड
जवळचे गाव : मुरूड
महाडपासून अंतर : 84 कि.मी.
सध्याची अवस्था : चांगली. डागडुजी करणे आवश्यक.
स्थापना: 1490
जंजिरा पाहण्यास कसे जाल?(How to go to Janjira?)
नवी मुंबईहून रोहामार्गे जंजिऱ्याला जाता येते. नवी मुंबई ते जंजिरा अंतर 128 किलोमीटर आहे.
• लोणावळ्यापासून जंजिऱ्याला जाता येते. लोणावळा-दूरशेत-खवाली- पाली-रोहामार्गे जंजिरा 113 किलोमीटर अंतरावर आहे.
• दापोलीहून जंजिरा 127 किलोमीटर आहे. दापोलीहूनही जंजिऱ्याला जाता येते.
भौगोलिक स्थान:(Geographic location)
रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा हा एक अभेद्य आणि भक्कम सागरी किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. या समुद्रकिनाऱ्यावर मुरूड तालुक्यातील मुरूड हे गाव आहे. मुरूड गावाच्या पुढे दंडा व राजपुरी ही गावे समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत. मुरूडपासून राजपुरी पाच किलोमीटर अंतरावर आहे. राजपुरी गावाच्या पश्चिमेला अरबी समुद्रात एका बेटावर मुरूड-जंजिरा हा सागरी किल्ला डौलाने उभा आहे. राजपुरीहून गडावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.
• इतिहास: (History of Janjira fort)
‘जंजिरा’ हा शब्द अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तयार झालेला शब्द आहे. जझीरा म्हणजे बेट होय. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्या वेळी राजपुरी गावात मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारूंचा आणि चाचेगिरी करणाऱ्यांचा नेहमीच त्रास होता. त्या वेळी या लुटारूंचा आणि चाच्यांचा त्रास कमी करण्यासाठी बेटावर मेढेकोट बांधला. मेढेकोट म्हणजे मोठमोठ्या लाकडांच्या ओंडक्यांना एकाशेजारी एक असे रोवून तयार केलेली तटबंदी होय. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहात असत. त्या वेळी त्या मेढेकोटचा प्रमुख राम पाटील होता. मेढेकोट बांधण्यासाठी त्या वेळी निजामाच्या ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत असे.
मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील ठाणेदाराला जुमानेनासा झाला. ठाणेदाराने राम पाटलाचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.
राम पाटील शूर होता. मेढेकोटही बळकट होता. राम पाटील आपल्याला बधणार नाही, मेढेकोटच्या जवळही फिरकू देणार नाही, याची पिरमखानाला कल्पना होती. पिरमखान मोठा चतुर होता. त्याने आपण दारूचा व्यापारी आहे असे भासवून आपली गलबते मेढेकोटच्या जवळच खाडीत नांगरली. राम पाटीलशी स्नेह निर्माण केला. मेढेकोटवर भेट म्हणून दारूची पिंपे पाठवली. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. राम पाटलाने परवानगी दिल्यावर पिरमखान मेढेकोटवर गेला. सर्व कोळी दारूत झिंगत होते. पिरमखानने ही नामी संधी साधली. बाकीच्या गलबतातील सैनिकांना बोलावून कोळ्यांची कत्तल केली व मेढेकोट ताब्यात घेतला.
कालांतराने पिरमखानाच्या जागी बुन्हाणखानाची नेमणूक झाली. बुन्हाणखानाने याच जागेवर भक्कम किल्ला उभारण्याचा मानस निजामाकडे व्यक्त केला. निजामाने परवानगी देताच बुन्हाणखानाने या जागेवर किल्ला बांधून घेतला.
इ. स. 1617 मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून जंजिऱ्याची स्वतंत्र जहागिरी मिळवली. सिद्दी अंबर हा जंजिऱ्याच्या सिद्दी घराण्याचा मूळ पुरुष मानला जातो. तो मोठा कर्तबगार, काटक आणि लढवय्या होता.
छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि महाराष्ट्रात क्रांतिकारी बदल झाले. इ. स. 1656 मध्ये त्यांनी जावळीच्या मोऱ्यांचा पाडाव करून जावळी हस्तगत केली. 1657 साली शिवरायांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना जंजिऱ्यावर हल्ला करण्यास पाठवले, पण या आक्रमणात शिवरायांना अपयश आले.
इ स 1659 साली शिवरायांनी खुद्द पेशव्यांना म्हणजे शामराव नीळकंठ यांना जंजिऱ्यावर पाठवले. या वेळी सिद्दीने घाबरल्याचे सोंग घेतले व पेशव्यांना गडावर बोलावले. पेशवे गडावर येताच त्यांना कैद केले आणि ‘पुन्हा वाटेस जाणार नाही’ या अपमानास्पद अटीवर सोडून दिले. ही गोष्ट शिवरायांच्या मनास लागून राहिली. त्यांनी मोरोपंतांची पेशवे पदावर नेमणूक केली.
इ. स. 1669 मध्ये खुद्द मोरोपंत पेशवे कोकणात आले. त्यांनी तळेगड, घोसाळगड ताब्यात घेतले. जंजिऱ्याच्या वायव्येस अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर कांसा नावाच्या बेटावर एक जलदुर्ग उभारला. त्याचे नाव पद्मदुर्ग असे ठेवले. मोरोपंतांनी सिद्दी फत्तेखानाला कोंडला होता. सिद्दीने शरणागती पत्करायचे ठरवले होते; पण दुर्दैव आड आले. गडावरील सिद्दी संबूळ, सिद्दी कासीम आणि सिद्दी खैर्यत यांनी सिद्दी फत्तेखानाला कैदेत टाकले व गडाचा ताबा घेतला. या तिघांनी औरंगजेबचे स्वामित्व मान्य करून त्याची मदत घेतली. त्यामुळे हाता- तोंडाशी आलेला घास निसटला. जंजिरा स्वराज्यात आलाच नाही.
इ. स. 1672 मध्ये मार्च महिन्यात सिद्दीच्या सैन्याने होळी पौर्णिमेच्या रात्री पद्मदुर्गावरील सारे सैन्य दारूच्या नशेत असताना हल्ला चढवला व पद्मदुर्ग ताब्यात घेतला.
शिवरायांच्या मनात ही गोष्ट सलत होती. जंजिरा स्वराज्यात आला नाही. इ स 1765 मध्ये मोरोपंतांनी पुन्हा जंजिऱ्यावर आक्रमण केले; पण हे आक्रमणहीफोल ठरले आयत्यावेळेस मोरोपंतांनी कचखाऊ धोरण स्वीकारल्यामुळे किल्ला हाताशी आला नाही. 1678 मध्ये मराठ्यांना जुलै आणि डिसेंबर महिन्यात दोन वेळा जंजिऱ्यावर हल्ला केला पण अपयश आले.मराठ्यांच्या आरमार दलाची ताकद वाढूनही किल्ला सिद्दीकडेच राहिला.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यामृत्यूनंतर संभाजीराजे गादीवर बसले. शिवरायांची सल संभाजीराजे यांना टोचत होती.त्यांनी १६८२ मध्ये दादाजी रघुनाथांना जंजिऱ्यावर पाठवले ; पण किल्ला काही हाती लागेना. शेवटी संभाजी राजे स्वतःच मैदानात उतरून जंजिऱ्यावर हल्ला केला. राजेंच्या वीस हजार फौजेला सिद्दी कादरने दाद दिली नाही .शेवटी राजपूरीचा डोंगर फोडून जंजिऱ्याच्या दिशेने पायदळासाठी वाट तयार केली. अर्थी वाट तयार झाली. जंजिरा हाताशी आता होता .दिल्लीचा बादशाह औरंगजेब स्वतः स्वराज्यावर चालून आल्यामुळे ही लढाई अर्ध्यावर सोडून संभाजीना माघारी फिरावे लागले.
इ. स. 1716 मध्ये कान्होजी आंग्रे आणि पेशवे यांनी दोघांनी मिळून संयुक्त मोहीम हाती येऊन यावर स्वारी केली; पण पदरी अपयशच आले. सुमारे तीस वर्षांनी म्हणजे 1746 मध्ये नानाजी सुर्व्याने सिद्दीला ठार मारले. त्यामुळे सिद्धी रहमानने बारा महालांपैकी सहा महाल पेशव्यांना दिले. पण गड मात्र आपल्याकडेच ठेवला.
इ. स. 1761मध्ये पुन्हा पेशव्यांनी जंजिऱ्यावर धडक मारली; पण पुन्हा अपयशच आले. नाना फडणवीस यांनी देखील जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. कूटनीती वापरून सिर्द्धचा वारस बाळुमियां याला आपल्याकडे वळवून घेतले. पण गडावर बरीच उथापालथ झाली होती. सिद्दी अब्दुलनंतर बाळुमियांला डावलून सिद्धी जोहर गादीवर बसला.
जंजिरा किल्ला अखेरपर्यंत स्वराज्यात आलाच नाही. जंजिऱ्यावर सिद्दी घराण्याचेच वर्चस्व राहिले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील सहाशेहून अधिक संस्थानांचे विलिनीकरण केले. त्यात सिद्दीच्या ताब्यातील जाफराबाद संस्थानही होते.
जंजिरा किल्ल्याचे वर्णन अजिंक्य, अभेद्य, अजिंक्य किल्ल्यासारखेच आहे.
गडावरील प्रेक्षणीय स्थळे (Sights of the Fort Janjira)
जजिरा किल्ल्याचे बांधकाम एकाच वेळी झालेले नाही. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून या किल्ल्याचे बांधकाम टप्प्याटप्याने केले आहे.
जंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून दरवाजाच्या एका पांढऱ्या दगडावर कोरून एक शिलालेख बसवलेला आहे. तो शिलालेख अरबी लिपीत आहे. इ. स. 1696 मध्ये कमानीचे बांधकाम झाल्याचे अनुमान निघते.
प्रवेशद्वारावर लगेच उजवीकडे मंदिरासारखे बांधकाम आहे. या स्थळाला ‘पंचायतन दोरे’ असे म्हणतात. तेथे कार्तिकी पौर्णिमेस जत्रा भरते. तेथून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दक्षिणेकडे एक प्रचंड तलाव आहे. परंतु तलावातील पाणी पिण्यास अयोग्य वाटते. याशिवाय किल्ल्याच्या वायव्येस आणखी एक तलाव आहे.
जंजिरा किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात पाच मजली इमारत आहे. येथे सत्तर मोटर उंचीचा वाडा आहे. या वाड्याला सुरुलखानाचा वाडा असे म्हणतात. आता या वाड्याची खूपच दुरावस्था झाली आहे.
गडावर अनेक पडक्या इमारतींचे अवशेष आहेत. कबरी आहेत. काही जुन्या हिंदू शिल्पांचे अवशेषही आहेत. गडाच्या तटबंदीवर एकूण एकोणीस बुरूज आहेत. प्रत्येक बुरूज दहा ते पंधरा मीटर उंचीचा असून त्यांचा व्यास प्रत्येकी पंचवीस मीटर आहे. दोन बुरुजांमधील अंतर तीस मीटरच्या दरम्यान आहे.
गडाच्या महाद्वाराच्या वर बुरुजांवर तीन अजस्र तोफा आहेत. ‘कलालबांगडी’, ‘चावरी’ आणि ‘लांडा’ अशी त्या तोफांची नांवे आहेत. कलालबांगडी तोफ सर्वात मोठी आणि भव्य आहे. कलालबांगडी तोफ पेशव्यांनी आणली होती, परंतु अपयश आल्याने तेथेच टाकून गेले होते. नंतर या तोफेची स्थापना सिद्दीने केली. उरलेल्या सर्व बुरुजांवर दोन ते सात तोफा आहेत. सुमारे दीडशे ते दोनशे तोफा या गडावर आहेत. एवढ्या प्रमाणात तोफा अन्य गडावर क्वचितच आढळतात. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही गडावर एवढ्या प्रमाणात तोफा आढळत नाहीत.
राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :
गडावर राहण्याची कोणतीही सुविधा नाही. जेवणाचे डबे घेऊनच गडावर गेलात तर गडावर जेवण्याचा आणि गड पाहण्याचा आनंद लुटता येतो.