स्वराज्यरक्षक संभाजी महाराज : बाणेदार छत्रपती/Chhatrapati Sambhaji Maharaj

महाराष्ट्र्राचा देदीप्यमान ऐतिहासिक परंपरेत स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या पराक्रमाचे आणि त्यागाचे पर्व अविस्मरणीय असेच आहे.सुमारे सव्वातीनशे वर्षे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम मूठभर इतिहासकारआणि बखरकार यांच्या लेखणीतून झाले;परंतु एकविसाव्या शतकात मात्र अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी ‘या मालिकेमुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा शंभूराजे यांचे शुद्ध चरित्र कळले.अर्थात या मालिकेचा जन्म होण्यापूर्वी वा सी बेंद्रे, सेतू माधवराव पगडी, शेजवलकर, इंद्रजित सावंत, जयसिंगराव पवार, श्रीमंत कोकाटे अशा विविध इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडाचा, राज्यकारभाराच्या पद्धतीचा, चारित्र्याचा आणि पराक्रमाचा चिकित्सक अभ्यास करून खरा इतिहास समाजासमोर मांडला.

14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी जन्मलेल्या शंभूराजांच्या वयाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशी सईबाई यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ते मातृसुखाला मुकले गेले असले तरी राजमाता जिजाऊ, महाराणी सोयराबाई, पुतळाबाई यांच्या देखरेखीखाली शंभूराजांचे बालपण संस्कारक्षम बनू लागले.शिवरायांनी शंभूराजांना त्यांच्या लहानपणापासूनच युद्धकलेबरोबरच विविध भाषांचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.अगदी कोवळ्या वयातच त्यांनी मराठी ,उर्दू ,संस्कृत, इंग्रजी इत्यादी भाषा अवगत केल्या होत्या.संस्कृत भाषेवर तर शंभूराजांचे एवढे प्रभुत्व होते की काशीचे पंडित गागाभट्ट राजांचे संस्कृत भाषेतील लेखन वाचून मंत्रमुग्ध झाले होते.

स्वराज्याचे पहिले युवराज शंभूराजे यांनी ऐन तारुण्यात ‘बूधभूषण'(Budhbhushan) हा राज्यकारभार विषयक ग्रंथ संस्कृत भाषेत लिहून आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली होती,तर नायिकाभेद, नखशिखांत हे ग्रंथ लिहून आपण सौंदर्याचे उपासक आहोत हे सिद्ध केले होते.शिवराज्याभिषेक झाल्यानंतर शिवरायांनी पुन्हा शाक्तपंथीय प्रथेप्रमाणे राज्याभिषेक करवून घेतला होता.यामागे स्वराज्याचे युवराज संभाजीराजे यांच्या विचारांचा प्रभाव होता.निर्भिडपणा, न्यायनिवाड्यात तरबेज, संस्कृत भाषेचा अभ्यास,स्पष्टवक्तेपणा या स्वभावांमुळे आणि गुणांमुळे ते मंत्रिमंडळाच्या नजरेत खपू लागले. मंत्र्यांच्या काही चुकीच्या गोष्टी निदर्शनासआल्या तर ते लगेच जाणवून द्यायचे.त्यामुळे आण्णाजी पंत सारख्या मंत्र्यांवर दबाव तर यायचाच,पण त्याचबरोबर स्वराज्याच्या युवराजाबद्दल मंत्र्यांच्या मनात कटुता निर्माण होऊ लागली. त्यांनी 1667 ते 1669 या काळात मुघलांची जहागिरी स्वीकारून राज्यकारभाराचे धडे सुद्धा लहान वयातच घेतले होते.

 

इ स 1670 साली महाराणी सोयराबाई यांना राजाराम हा पुत्र झाला नि तेथून पुढे गृहकलहाला आणि मंत्रिमंडळाच्या शंभूराजांच्या विरुद्ध कटकारस्थानाला सुरूवात झाली.संभाजी आपल्या अंकित राहून राज्यकारभार करू शकत नाही, हे आण्णाजी पंत यांना चांगलेच माहीत होते.म्हणूनच त्यांनी शिवरायांनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजाराम महाराज कसे होतील, यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली.संधी मिळेल तेव्हा ते महाराणी सोयराबाई यांच्या मनात गैरसमज निर्माण करण्यास आणि भविष्यातील छत्रपती राजाराम महाराजच कसे योग्य आहेत,हे पटवून देण्यास सुरुवात केली.स्त्रीस्वभावधर्मानुसार महाराणी सोयराबाई यांना आपला मुलगा छत्रपती व्हावा असे वाटणे स्वाभाविक होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढलेली माणसं मंत्रिमंडळात होती.त्यांना नव्या दमाच्या,अभ्यासू,करारी,बाणेदार आणि स्वयंनिर्णयक्षमता असलेल्या युवराजाला मुजरा करणे,त्याची आज्ञा पाळणे रूचेनासे झाले.हाच युवराज भविष्यात छत्रपती झाला तर म़ंत्रिमंडळ हे केवळ नामधारी असेल, असे त्यांना वाटत असावे.म्हणूनच मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी युवराजांविरुद्ध कुभांड रचण्यास सुरूवात केली होती. छत्रपतींच्या आणि सोयराबाईंच्या नजरेतून युवराज कसे उतरतील यासाठी आटापिटा सुरू झाल्या होत्या.शंभूराजे यांच्या नशिबी हयातीत आणि पश्चातही बदनामीच लिहिली होती. ‘इश्कात आणि स्त्रियांत रमणारा राजा’ अशी प्रतिमा निर्माण करण्यात आण्णाजी पंतांसह मंत्रिमंडळातील काही सदस्य,पोतडीतील पंडित, यांच्या बरोबरच एकोणीस आणि विसाव्या शतकातील लेखक, कादंबरीकार, नाटककार,सिनेनिर्माते यांनी भर घातली.

पन्हाळगडाच्या(Panhala Fort) पायथ्याशी कपोलकल्पित नायिका कमळा हिची समाधी म्हणून जे थडगे दाखवले जाते,ते थडगे थोरातांच्या कमळेचे नसून पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या विरूद्ध करवीरकरांच्या बाजूने लढताना धारातीर्थी पडलेल्या यशवंतराव थोरात आणि त्यांची सती गेलेली पत्नी गोडाई यांची आहे.इतिहासकार मु गो गुळवणी यांनी या या थडग्याचा शोध लावला.रायगडाच्या (Raigad) परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांची कपोलकल्पित नायिका गोदावरीची समाधी म्हणून जे थडगे दाखवले जाते,ते थडगे माधवराव पेशवा यांच्या यशोदाबाई नावाच्या स्त्रीचे आहे.अशा अनेक कल्पित कथांद्वारे शंभूराजे यांना बदनाम करुन त्यांचा देदीप्यमान इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.

 

शिवराज्याभिषेकानंतर युवराज संभाजीराजे यांचा न्यायनिवाडा, राज्यकारभार, महाराजांनी सोपवलेल्या मोहिमा, या सर्वच बाबतीत उत्साहपूर्ण वावर आणि चौफेर यश कारभारी मंडळींना रूचेनासे झाले.शहकाटशहाच्या राजकारणात युवराज संभाजीराजे यांना दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी बरोबर नेण्याचा बेत महाराजांना बदलावा लागला.इतकेच काय,युवराजांना रायगडावर न ठेवता शृंगारपूरच्या कारभाराची जबाबदारी दिली गेली. संभाजीराजे यांना हा घोर अपमान वाटला.तरी सुद्धा महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून युवराज शृंगारपुरी जाऊन कारभार पाहू लागले;पण तेथेही कारभारी मंडळींनी कुरापती चालूच ठेवल्या.महाराजांकडे चुकीचे खलिते जाऊ लागले.या सर्व घटनांचा परिणाम असा झाला की स्वराज्याचे युवराज दिलेरखानाला जाऊन मिळाले.संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळाले,ही त्यांची सर्वांत मोठी चूक होती आणि याचे समर्थन कोणीही करणार नाही.मंत्र्यांच्या उचापती , दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी महाराजांनी बरोबर न नेल्याचा राग, युवराज असूनही रायगडाचा कारभार पाहू दिला नाही.या सर्व बाबी शंभूराजेंना खटकल्या.त्यातूनच शंभूराजे यांनी दिलेरखानाला मिळण्याची चूक केली.

ऑक्टोबर 1678 मध्ये शंभूराजे सज्जनगडावरून निघून जाऊन माहुली येथे दिलेरखानाला मिळाले.सुमारे वर्षभर ते दिलेरखानाच्या गोटात राहिले;पण तेथील हवामान राजांना मानवणारे नव्हते.इकडून महाराजांकडून समजूतीची पत्रे चालूच होती.त्यातच दिलेरखानाने स्वराज्यात असलेल्या भूपाळगडावर हल्ला चढवला.त्यात स्वराज्याचे मोठे नुकसान झाले.गडावरील सातशे मावळ्यांचे हात दिलेरखानाने छाटले होते.या घटनेमुळे शंभूराजे आणि दिलेरखान यांच्यात खटके उडाले. शंभूराजे ज्या हेतूने दिलेरखानाच्या छावणीत दाखल झाले होते,तो हेतू केव्हाच बाजूला पडला होता. हे शंभूराजांना जाणवत होते.म्हणूनच ते दिलेरखानाच्या छावणीतून निसटून नोव्हेंबर 1679 मध्ये विजापूरमार्गे पुन्हा स्वराज्यात आले..

शंभूराजे पुन्हा स्वराज्यात आले ,याचा आनंद शिवरायांना झालेला असला तरी आण्णाजीपंतादी मंडळींना ही गोष्ट निश्चित रूचलेली नव्हती.त्यामुळे शंभूराजेंना तातडीने रायगडला नेणे शिवरायांनी टाळले.शंभूराजेंना पन्हाळगडावरच ठेवून पन्हाळा प्रांताचा कारभार सोपवून महाराज रायगडावर गेले. राजारामाच्या लग्नालाही शंभूराजेंना निमंत्रण दिले गेले नव्हते.लग्नानंतर काही दिवसातच महाराज आजारी पडले.ताप वाढतच होता .आजार बळावला;पण उपाय सापडत नव्हता.त्यातच महाराजांचा अंत झाला.रायगड हादरला; पण शंभूराजेंना याचा थांगपत्ता सुद्धा लागला नव्हता .शिवरायांच्या आकस्मिक मृत्यूमुळे रायगड परिसरात अनेक अफवा पसरल्या गेल्या होत्या. महाराणी सोयराबाई यांना या अफवेची भीती दाखवून आण्णाजीपंतांनी त्यांना आपल्या कटात सामील करून घेतले.राजाराम महाराजांचे घाईघाईने मंचकारोहण करून घेतले आणि शंभूराजे यांना अटक करण्याची तयारी सुरू केली.

इंग्रजांच्या कागदपरत्रानुसार शिवरायांना Bloody Flux हा आजार झाला होता,तर पोर्तुगीजांच्या कागदपत्रांनुसार घोड्यांच्या सतत संपर्कात आल्यामुळे Intestinal Anthrax हा आजार झाला होता.दोन्हीही आजारांची लक्षणे (symptoms) सारखीच असतात.त्यामुळे महाराजांना विषबाधा झाली होती, असे वाटत नाही. वरीलपैकी एखादा आजार झाला असेल असे वाटते

शिवरायांच्या मृत्यूनंतर रायगडावरील चक्रे वेगाने फिरू लागली.शंभूराजांना अटक करण्यासाठी आण्णाजी पंत आणि मोरोपंत पन्हाळगडाच्या दिशेने निघाले.या कटात हंबीरराव मोहिते यांना सामील करून घेण्यासाठी ते त्यांना भेटायला गेले;पण हंबीरराव मोहित्यांनीच मोरोपंत व आण्णाजी पंत यांना अटक करुन शंभूराजांसमोर उभे केले.पित्याचा मृत्यू झाल्यानंतरही शंभूराजेंनी सर्वकाही संयमाने घेतले.हंबीरराव मोहिते आणि पिलाजी शिर्के यांना आपल्या बाजूला वळवून घेतले.कारभाऱ्यांचा कट उध्दवस्त केला आणि रायगडावर पोहोचले.कटात सहभागी असणाऱ्यांना तुरुंगात टाकले.महाराणी सोयराबाई, पुतळाबाई यांचे सांत्वन केले. बारा दिवस दुखवटा पाळला.सारे काही निवळल्यानंतर मंचकारोहण करून घेतले.लगेच राज्यकारभारात लक्ष घालून मुघल सैन्य थोपविण्यासाठी रणनीती आखली गेली.16 जानेवारी 1681 रोजी शंभूराजेंनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. कटात सहभागी मंत्र्यांना माफ केले . त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील करून घेतले.

छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले आणि लगेच स्वत: मुघल बादशहा औरंगजेब मराठ्यांचे राज्य बुडवण्यासाठी महाराष्ट्रात आला.मराठ्यांना चहुबाजूंनी घेरण्याचा औरंगजेबचा डाव होता.हसनअलीने कोकणात धुमाकूळ घातला होता.त्याला स्वत: संभाजी महाराज सामोरे गेले आणि त्याचा पराभव केला. याच दरम्यान मराठ्यांनी औरंगाबाद लुटले.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली बुऱ्हाणपूर लुटले.कर्नाटकात स्वारी केली.याच दरम्यान औरंगजेबचा पुत्र अकबर मराठ्यांच्या आश्रयाला आला होता ‌.संभाजी महाराज यांनी अकबराच्या बाबतीत सावध पावले उचलली होती.अकबर स्वराज्यात आला आणि आण्णाजीपंतादी मंडळींच्या कुरापती पुन्हा उचल खाऊ लागल्या.हिरोजी फर्जंद करवी अकबराशी संधान बांधण्याचा प्रयत्न करुन राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट रायगडावर शिजला गेला.त्याच वेळी संभाजीराजांना विषबाधा करण्याचा ही कट शिजला गेला.ही गोष्ट जेव्हा राजांना समजली तेव्हा मात्र त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली ‌.कवी कलश यांच्या करवी कटातील सर्व कारभाऱ्यांची रोजद्रोहाच्या आरोपाखाली हत्तीच्या पायी देऊन हत्या केली.आण्णाजीपंतांनी सोयराबाईंना सुद्धा या कटात सामील करून घेतले होते.कट उघडकीस आल्यावर सोयराबाईंच्या मनाला ही गोष्ट खूप लागली.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

संभाजी महाराज यांनी औरंगाबाद आणि बुऱ्हाणपूर लुटले याचा प्रचंड राग औरंगजेबाला आला होता, म्हणून त्याने रामसेजचा किल्ला जिंकण्यासाठी अनेक सरदार पाठवले.पाच वर्षे लढूनही औरंगजेबाच्या हाती काहीही लागले नाही.रामसेजचा किल्ला लढताना मुघल सैन्य हैराण झाले होते.याप्रसंगी मुघल इतिहासकार काफीखान म्हणतो,”संभाजी शिवाजीपेक्षा दसपट तापदायक आहे”.काफीखानाचे हे वाक्य बरेच काही सांगून जाते. शेवटी निराश होऊन औरंगजेब आदिलशाही, कुतुबशाही बुडवण्यासाठी दक्षिणेकडे वळला.

औरंगजेबाने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या मुलखात हल्ले करण्यासाठी चिथावले होते.सिद्दीचा उपद्रव वाढला होता.त्याचा बिमोड करण्यासाठी संभाजी महाराज स्वत:चालून गेले.मराठ्यांच्या आणि तोफांच्या हल्ल्याला घाबरून सिद्दी जंजिऱ्याच्या बिळात लपून बसला.सिद्दीला नेस्तनाबूत करायचाच या उद्देशाने संभाजी महाराजांनी समुद्रात भरावा टाकून हल्ला करण्याचे काम सुरू केले:पण औरंगजेबाच्या वाढत्या हालचालीमुळे संभाजी राजांना माघारी परतावे लागले.

 

सिद्दीने जे केले तेच पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमावर्ती भागात औरंगजेबाच्या चिथावणीवरून चालू केले होते.पोर्तुगीजांनी आपला विस्तार वाढवण्यासाठी फोंडा किल्ल्यावर हल्ला चढवला.संभाजी राजांना ही खबर लागताच राजे स्वत: चालून गेले . पोर्तुगीजांचा पूर्ण पराभव करून गड ताब्यात घेतला.संभाजीराजे एवढ्यावरच थांबले नाहीत.त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा परिसरातील अनेक बेटांवर हल्ला करून बेटे ताब्यात घेतली.पोर्तुगीजांचे नाव गोव्यात शिल्लक राहणार नाही ,अशी परिस्थिती निर्माण झाली होती;पण इथेही माशी शिंकली.शाहआलम गोव्याच्या दिशेने येत असल्याची खबर लागताच संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांशी तहाची बोलणी मान्य करून त्यांच्यावर खंडणी लादून राजे रायगडावर आले.

अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज यांची नऊ वर्षांची कारकीर्द अत्यंत धावपळीत गेली.अत्यंत कठीण परिस्थितीत महाराणी येसूबाई यांनी खंबीर साथ दिली.पोर्तुगीज, इंग्रज,सिद्दी, औरंगजेब आणि अंतर्गत शत्रू यांना शह देत अगदी दमदारपणे आपल्या राज्याचा कारभार चालू ठेवला होता.त्यांना इश्क,ऐयाशी करण्यासाठी वेळ होता कुठं? आणि शिवरायांच्या संस्कृतीत वाढलेले संभाजीराजे असे कसे करतील..? संभाजी राजांच्या काळात स्वराज्याच्या सीमारेषा रूंदावल्या होत्या.औरंगजेबाने सुद्धा हताश होऊन डोक्यावर टोपी न घालण्याचा निर्णय घेतला होता.पण अखेर काळ फिरला.फितुरीमुळे आणि बेसावधतेमुळे स्वराज्याचे छत्रपती संगमेश्वर मुक्कामी मुकर्रबखानाच्या हाती लागले.स्वराज्याच्या या छत्रपतींचे औरंगजेबाने अतोनात हाल केले; संभाजीराजांनी अखेरच्या श्वासापर्यंत आपला बाणेदारपणा सोडला नाही.स्वाभिमान विकला नाही.औरंगजेबाने ” तुझा सर्व खजिना आणि सर्व किल्ले ताब्यात दिलेस तर जीवदान देईन”असा प्रस्ताव ठेवला होता; परंतु मरण समोर दिसत असतानाही तो प्रस्ताव धुडकावून लावला. शेवटी राजांची अमानूषपणे छळ करून हत्या केली.एका चक्रवर्ती सम्राट होण्याची क्षमता असणाऱ्या राजाचा अंत खूप वाईट झाला असला तरी मराठ्यांनी आपला लढा पुढे चालू ठेवून औरंगजेबाचे मराठ्यांचे राज्य बुडवण्याचे स्वप्न साकार होऊ दिले नाही.उलट औरंगजेबालाच या मातीत गाडून घ्यावे लागले.

काही विचारले जाणारे प्रश्न

छत्रपती संभाजी महाराज यांना किती पत्नी होत्या?(How many wives did Chhatrapati Sambhaji Maharaj have?)

छत्रपती संभाजी महाराज यांना राणी येसूबाई या एकमेव पत्नी होत्या.बाकी कथा,कादंबर्‍कादंबऱ्यात रंगवलेल्या गोष्टी केवळ भ्रामक आहेत.

संभाजी महाराज कोण होते?(Who was Sambhaji Maharaj?)

संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते.ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे पुत्र होते.त्यांनी नऊ वर्षे राज्य केले

संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला.?(How did Sambhaji Maharaj die?)

छत्रपती संभाजी महाराज कोकणात न्यायनिवाडा करायला गेले असताना दगाबाजीने मुकर्रबखानाने संगमेश्वर येथे वेढा दिला.तुळापूर येथे छापा टाकून कैद केले.अखेरच्या क्षणी त्यांना खूप हाल हाल करून वढू येथे ठार मारले. वढू येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे.

संभाजी महाराज यांची जयंती केव्हा साजरी केली जाते?(When is Sambhaji Maharaj’s Jayanti (birth anniversary) celebrated?)

संभाजी महाराज यांची जयंती दर वर्षी 14 मे रोजी साजरी केली जाते.

संभाजी महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी 11 मार्च रोजी साजरी केली जाते.11 मार्च हा दिवस छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो.

 

संभाजी पाटील

(राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक ,माजी शिक्षण विस्तार अधिकारी,पंचायत समिती राधानगरी

मो.9049870674

Leave a comment