किल्ले प्रतापगड/ Pratapgad Fort

सातारा जिल्ह्यातील गड (Fort in Satara District)

दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा यांचा मिलाफ म्हणजे ‘किल्ले Pratapgad’ होय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधल्यानंतर अनेक किल्ले ताब्यात घेण्यास आणि बांधण्यास सुरुवात केली. जावळी ताब्यात घेतल्यानंतर जे धन सापडले. त्या धनातून कोकण, वाई प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाबळेश्वरच्या कुशीत असलेल्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी मोरोपंतांकरवी गड बांधून घेतला. याच गडाची आता आपण माहिती घेणार आहोत.

गडाचे नाव : प्रतापगड (Pratapgad Fort)

समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 1175 मी. (3556फूट)

गडाचा प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण : महाबळेश्वर, सातारा.

जिल्हा : सातारा

जवळचे गाव : महाबळेश्वर.

डोंगररांग : महाबळेश्वर, सह्याद्री

सध्याची अवस्था : व्यवस्थित डागडुजी करणे आवश्यक.

स्थापना : इ स.1656 च्या दरम्यान

साताऱ्यापासून अंतर: 76 किमी, वाईहून: 52 किमी

महाबळेश्वरहून अंतर : 21 किमी.

प्रतापगडला कसे जाल ?(How to go to Pratapgad?)

वाईहून प्रतापगडला जाता येते. प्रतापगडला जातेवेळी पाचगणी-महाबळेश्वर ही ठिकाणे पाहून आरामात प्रतापगडला जाता येते. महाबळेश्वरच्या पश्चिमेस प्रतापगड आहे.

साताऱ्याहूनही प्रतापगडला जाता येते. साताऱ्याच्या वायव्येस प्रतापगडआहे.सातारा-महाबळेश्वर–प्रतापगड असे जाता येते.

महाबळेश्वरहून 20-21 किलोमीटरवर प्रतापगड आहे.

कोकणातून महाडमार्गेही प्रतापगडला जाता येते. महाड- हावरे – पोलादपूर प्रतापगड असा हा मार्ग आहे. महाड ते प्रतापगड 46 किमी अंतर आहे.

प्रतापगडावर घडलेला इतिहास:(History of Pratapgad)

महाबळेश्वरच्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी प्रतापगड बांधून घेतला.मोरोपंत पिंगळे यांना हा किल्ला बांधण्याची आज्ञा शिवरायांनी दिली होती.त्याप्रमाणे त्यांनी दोन वर्षांत किल्ला बांधून घेतला होता.

शिवरायांनी जावळी ताब्यात घेतल्यावर जे धन प्राप्त झाले त्या धनाचा उपयोग ‘प्रतापगड’ बांधण्यासाठी करण्यात आला होता.

शिवरायांच्या पराक्रमाची चाहूल विजापूरच्या आदिलशाहाला लागली होती. त्यांनी शिवरायांचा बीमोड करण्याचा निश्चय केला होता म्हणूनच दरबारात बडीबेगम साहिबाने सवाल केला होता-

“शिवाजीराजांचा बीमोड कसा करायचा? कोण तयार आहे. शिवाजीराजांचा बंदोबस्त करायला?”

इतक्यात वाई प्रांताचा सुभेदार अफझलखान उठला. त्याने शिवाजीराजांना जिवंत किंवा मृत पकडून आणण्याचा विडा उचलला.

आदिलशाहीचा सरदार अफझलखान हा क्रूर होता. त्याने शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा कनकगिरीच्या वेढ्यात दगाबाजीने खून केला होता. खुद्द शहाजीराजेंची विजापुरातून धिंड काढली होती. असा हा कावेबाज, धोरणी, कपटी आणि जावळी प्रांताबद्दल माहिती असलेला सुभेदार स्वराज्यावर चालून आला होता.

अफझलखानाने स्वराज्यात येऊन धुडगूस घालायला सुरुवात केली. सोबत मोठी फौज होतीच. पंढरपूर, तुळजापूर परिसर बेचिराख केला होता.

अफझलखानाशी उघड्या मैदानावर युद्ध करणे शक्य नाही, हे शिवराय ओळखून होते. म्हणूनच त्यांनी आपला मुक्काम प्रतापगडावर हलवला होता आणि खानाशी पत्रव्यवहार चालू ठेवला होता.

शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ आणि खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हे मध्यस्थीचे, निरोपाचे काम पाहात होते. शेवटी 10 नोव्हेंबर 1659 ही भेटीची तारीख ठरली.

शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य शामियाना उभारला होता. भेटीचा दिवस उजाडला. खान अगोदरच शामियान्यात दाखल झाला होता. सोबत बंडा सय्यद होता. शिवरायांनी चतुराईने बंडा सय्यदला दूर केले. खानाने दगाफटका केलाच तर सावध असावे म्हणून हे सर्व केले होते. शिवरायांच्या बरोबर संभाजी कावजी, तानाजी मालुसरे, जिवा महाला हे जिवाला जीव देणारे साथीदार होते. खानासोबत खानाचे अंगरक्षक होते.

10 नोव्हेंबर 1659 रोजी अफझलखान (Afzal khan) आणि शिवाजी(Shivaji maharaj) यांची भेट झाली. खानाने शिवरायांना भेटीसाठी आलिंगन दिले. शिवरायही पुढे गेले आणि आलिंगन दिले. इतक्यात खानाने दगा दिला. कमरेचे कट्यार उपसले आणि त्याने शिवरायांच्या पाठीत वार केला. शिवराय सावध झाले. त्यांनी लपवून ठेवलेल्या वाघनखांनी खानाचा कोथळा काढला. खान ओरडला आणि शामियान्यात चकमक सुरू झाली.

विजेच्या चपळाईने बडा सय्यद शिवरायांवर चालून आला होता. तो शिवरायांवर वार करणार, इतक्यात जिवा महालाने त्याचा हात वरच्यावर उडवला. संभाजी कावजी व तानाजी मालुसरे खानाच्या अंगरक्षकावर तुटून पडले होते. तेवढ्यात खानाचा वकील कृष्णाजी भास्कर शिवरायांवर चालून आला. त्याला शिवरायांनी ठार केले.आपला बाहेर आलेला कोथळा आवरत अफझलखान निसटून जात होता.संभाजी कावजीने त्याला पकडून त्याचे मुंडके कापून ते मुंडके जिजामातेजवळ सादर केले.प्रतापगडावर विजयाच्या तोफा डागल्या गेल्या आणि जाळीत लपून बसलेल्या मावळ्यांनी खानाच्या सैन्याची दाणादाण उडवली.

प्रतापगड शिवरायांच्या पराक्रमाने अजरामर झाला. शिवरायांनी खानाच्या प्रेताची विटंबना केली नाही. त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशीच गाडले आणि समाधी बांधली.तेथेच दिवाबत्तीची सोय केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. त्यांनी चहूबाजूंनी येणाऱ्या शत्रूशी खंबीरपणे सामना केला; पण फितुरीमुळे संभाजीराजे मोगलांच्या हाती लागले आणि त्यांना हालहाल करून ठार मारले.

राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याची वाताहात झाली. रायगड स्वराज्यातून निसटला. त्या वेळी राजाराम महाराज रायगडावरून गुप्त मार्गान निसटले आणि जिंजीला जाण्यापूर्वी प्रतापगडावर आले. येथूनच ते जिंजीला गेले.

इ. स. 1778 मध्ये नाना फडणविसांनी पेशवाईच्या काळात सखादाम बापूस प्रतापगडावर नजरकैदेत ठेवले होते. पुढे 1796 मध्ये दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे त्यांच्यावर (नाना फडणविसांवर) चालून आले, तेव्हा त्यांनी प्रतापगडाचा काही दिवस आश्रय घेतला होता.

इ. स. 1818 मध्ये मराठे आणि बिटिश यांचे युद्ध झाले. त्यात मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. प्रतापगडही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

1935 मध्ये प्रतापगडावरील नगारखान्याची इमारत दुरुस्त करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर 1957 मध्ये शिवरायांचा 5 मी. उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू या पुतळ्याच्या उद्घाटनाला आले होते.

• प्रतापगडावरील प्रेक्षणीय स्थळे :(Sights at Pratapgad)

अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत बसेस सुद्धा जातात. त्यामुळे गडावर जाणे सोपे आहे.

महादरवाजा:

वाहनतळावरून पायऱ्या चढत गडावर निघाला की, पश्चिमाभिमुख ‘महादरवाजा’ लागतो. महादरवाजा आजही सुस्थितीत पाहायला मिळतो. पूर्वी सूर्य उगवला की गडाचे दरवाजे उघडायचे आणि मावळला की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. प्रतापगडावर आजही ही प्रथा चालू आहे. गडावर मालाची ने-आण करण्यासाठी आजही गाढवांचा वापर करतात.

टेहळणी बुरूज:

महादरवाजातून आत प्रवेश करताच खेळणी व शोभेच्या वस्तू असलेली टपरी आहे. तेथे थोडा वेळ रेंगाळल्यानंतर टेहळणी बुरुजाकडे जायचे. हा बुरूज चिलखती बांधणीचा आहे. सह्याद्रीच्या निमुळत्या रांगेवर अगदी टोकाला हा बुरूज आहे.

महामार्ग :

महादरवाजा पाहिल्यानंतर आपण जाता जाता राजमार्ग पाहायला जायचे. किल्ल्याची तटबंदी निरखत जायचे. राजमार्ग सध्या बंद केलेला आहे. 1936 मध्ये नगारखान्याची इमारत ढासळली होती. 1958 पर्यंत गडावर याच मार्गाने जावे लागत होते. पंडित नेहरू आले त्या वेळी नवीन मार्ग बनवला.

भवानी मंदिर:(Bhawani temple)

छत्रपती शिवरायांनी जातीने लक्ष घालून मोरोपंत पिंगळे यांच्याकडून भवानी मातेचे मंदिर बांधून घेतले. अफझलखानाच्या भेटीला जाण्यापूर्वी शिवराय याच भवानीमातेचे दर्शन घेऊन भेटीला गेले होते.

मंदिरात असलेली मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीतून आणलेल्या शाळिग्राम शिळेपासून बनवून घेतली होती. मूर्तीशेजारीच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवारही आहे. येथे शिवलिंगही आहे.

हनुमानाची मूर्ती:

भवानी मातेच्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे जातेवेळी वाटेत उजव्या हाताला हनुमानाची मूर्ती लागते. ही मूर्ती समर्थ रामदास यांनी स्थापित केली आहे.

महादेव मंदिर:(Mahadev Temple)

शिवरायांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक गडावर महादेव मंदिर असतेच. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ आपण येतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. मंदिराशेजारीच सदर आहे. या सदरेवर बसूनच शिवराय न्यायनिवाडे करत असत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा:

महादेव मंदिराच्या मागील बाजूसच राजमातेचा वाडा आहे. सध्या या वाड्याचे फक्त अवशेष आहेत. हे पाहून पुढे शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पाहायला जायचे. हा पुतळा पाच मीटर उंचीचा आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन 30 नोव्हेंबर 1957 रोजी झाले. पूर्वी येथे वाडा होता.

कडेलोट पॉईंट :

शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून झाल्यानंतर तटाच्या बाजूने गेल्यावर ‘कडेलोट’ पॉईंट लागतो. अपराध्याला कडेलोटाची शिक्षा देण्यासाठी या कड्याचा वापर केला जात असे.

वस्तुसंग्रहालय :

प्रतापगडावरील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर येथे एक खाजगी वस्तुसंग्रहालय व विक्री केंद्र आहे. तेथे अवश्य भेट द्यायला हरकत नाही. लाकडी वस्तू, मूर्ती, खेळणी, प्राणी, पक्षी, हस्तकलेच्या वस्तू, संसारोपयोगी वस्तू येथे पाहायला मिळतात. 20 रुपयांपासून ते 15 हजारांपर्यंत येथे वस्तू पाहायला मिळतात.

प्रतापगडाला आज राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले असले , तरी त्याची मालकी शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

प्रतापगडावर 10-12 माणसांची राहण्याची सोय होऊ शकते.

अनेक लोक महाबळेश्वरला राहतात आणि सकाळी लवकर प्रतापगड पाहायला जातात.

Leave a comment