रांगणा किल्ला/ Rangana Fort Information in Marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गडनिर्मितीचे श्रेय शिलाहार राजा विक्रमादित्य भोज (दुसरा) याला जाते. जवळजवळ पंधरा किल्ले त्याने कोल्हापूर जिल्ह्यात बांधले. त्यापैकीच ‘Rangana Fort’ एक आहे. रांगणा किल्ला इतिहासात प्रसिद्ध गड’ या नावाने ओळखला जातो. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा किल्ला बांधला गेला. विक्रमादित्य राजा भोजला ‘दुर्गनिर्मिती करणारा महान अधिपती’ आणि ‘पर्वतांना अंकित करणारा शूर सत्ताधीश’ असे संबोधले जाते.

किल्ल्याचे नाव : रांगणा – प्रसिद्धगड

समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 900 मी.

किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : मध्यम

तालुका : भुदरगड

जिल्हा : कोल्हापूर

डोंगररांग : कोल्हापूर, सह्याद्री

कोल्हापूर पासून अंतर: 96 किमी

गारगोटी पासून अंतर: 40 किमी

स्थापना : बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात

सध्याची अवस्था : दुरुस्ती करणे आवश्यक.

* रांगणा किल्ला पाहण्यास कसे जाल ?How to reach Rangana Fort

कोल्हापूरहून दक्षिणेला 96 किमी अंतरावर गर्द राईत रांगणा किल्ला वसलेला आहे. कोल्हापूरहून गारगोटीला आल्यावर गारगोटीपासून अवघ्या 40 किमी अंतरावर हा किल्ला आहे. गारगोटीहून सरळ 30 किमी अंतर गेल्यावर मौनी महाराजांचे वास्तव्याचे ठिकाण पाटगाव लागते. पाटगावपासून 8 किमी अंतरावर हणमंता घाट लागतो. तेथून पुढे 5-6 किमी अंतर गेल्यावर तांबेवाडी, पुढे चिक्केवाडी आणि मग रांगणा किल्ला लागतो. प्राचीन ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी थोडी पायपीट करण्याची तयारी ठेवावी लागते.

इतिहास:History of rangana fort

शिलाहार राजा भोज याने आपली राजधानी इ. स. 1187 मध्ये वाळव्याहून कोल्हापूरला आणली. त्यानंतर 1190ला पन्हाळगडावर राजधानी स्थापन केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 15 किल्ले बांधून घेतले. त्यातीलच एक रांगणा किल्ला होय. हा किल्ला ‘प्रसिद्धगड’ या नावाने ओळखला जातो. दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने तेराव्या शतकाच्या प्रारंभीच मराठी मुलखावर स्वारी केली. खिलजीचा पराक्रमी सेनापती मलिक नायक कपूर याने इ. स. 1307 मध्ये राजा हरपालदेव यादवाचा पराभव करून देवगिरीवरील यादवांची सत्ता संपुष्टात आणली.

महम्मद गावानने इ. स. 1470 मध्ये हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला. किल्ला जिंकल्यानंतर तो म्हणाला होता, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दुमकीबरोबरच संपत्तीही खर्च करावी लागली.’

इ. स. 1307 ते इ. स.1658 या काळात हा किल्ला मुघलांच्या आणि आदिलशाहीच्या ताब्यात राहिला.

कोकण परिसरातील रांगणा हा महत्त्वाचा किल्ला होता. जावळी खोऱ्यात मोऱ्यांचे तसेच कोकण खोऱ्यात सावंतवाडीकर भोसल्यांचे वर्चस्व होते. हे भोसले आदिलशाहीशी सख्य बांधून होते. तरीसुद्धा ते स्वतःला स्वतंत्र राजे म्हणवून घेत. चंदगड भागात हेरे येथे याच घराण्याचे राज्य होते. महिपालगड, गंधर्वगड, कलानिधिगड, भरतगड या परिसरात त्यांची सत्ता विखुरली होती. रांगणा किल्लाही बराच काळ सावंतवाडीकर भोसल्यांच्या ताब्यात बराच काळ राहिला होता.

छत्रपती शिवरायांनी अफझलखानाच्या वधानंतर पन्हाळा आणि कोकण परिसरावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी तेथील किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. रांगणा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला. इ.स 1665 साली मिर्झाराजे जयसिंगाच्या रूपाने आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी शिवरायांनी मोगलांशी तह केला.

याच वेळी बेहलोलखानाच्या रूपाने रांगण्यावर संकट आले होते. शिवरायांचा सावत्र भाऊ व्यंकोजी सुद्धा त्यात होता. त्यावेळी राहुजी सोमनाथाच्या ताब्यात किल्ला होता. शिवराय राहुजीच्या मदतीला धावून आले आणि बेहलोलखान ,व्यंकोजी यांचा पराभव करून रांगण्याचा वेढा मोडून काढला.

इ. स. 1676 मध्ये शिवराय दक्षिण दिग्विजयासाठी निघाले होते. त्यावेळी पाटगावच्या मौनी महाराजांच्या भेटीसाठी महाराज आले होते. त्यावेळी ते रांगण्यावर येऊन गेले. इ. स. 1677 पासून युवराज संभाजीराजे संगमेश्वरी राहून राजापूर, बावडा, विशाळगड इत्यादी परगण्यावर देखरेख करत होते. कालांतराने संभाजीराजे छत्रपती झाल्यावर रांगण्याकडे विशेष लक्ष होते.

फितुरीमुळे छत्रपती संभाजीराजे यांना मुकर्रबखानाने पकडले. औरंगजेबने त्यांचा क्रूरपणे वध केला. स्वराज्य संकटात आले. सूर्याजी पिसाळ औरंगजेबला फितूर झाल्यामुळे इतिकदखानाने रायगडला वेढा दिला. राणी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना कैद केले. त्या वेळी राजाराम महाराज याच मागनि जिंजीला गेले. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर (इ. स. 1700) स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे महाराणी ताराबाईंकडे आली. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांसारखे सेनानी ताराराणींकडे होते. त्याच सुमारास राणी येसूबाई आणि पुत्र शाहू यांची औरंगजेबच्या कैदेतून सुटका झाली. औरंगजेबने टाकलेल्या डावाप्रमाणे शाहू आणि ताराराणी यांच्यात संघर्ष सुरू झाला. अखेर 13 एप्रिल 1731 मध्ये त्यांच्यात वारणा येथे तह झाला आणि वारणेच्या दक्षिणेकडील भाग ताराराणींना मिळाला. त्यांत रांगणा किल्लाही होता. महाराणी ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजी आणि सावत्र पुत्र संभाजी (करवीरचे छत्रपती) यांच्यासह रांगण्याला भेट दिली होती.

इ. स. 1708 मध्ये शाहूंच्या आक्रमणाच्या वेळी ताराराणींना पन्हाळा सोडून रांगण्याला आश्रयासाठी जावे लागले. शाहूने रांगण्यावरही आक्रमण केले. त्या वेळी सेनापती पिराजी घोरपडे व रामचंद्रपंत अमात्य यांनी रांगणा वाचवण्यासाठी निकराचा लढा दिला. महाराणी ताराबाई त्या वेळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आश्रयाला गेल्या होत्या. अखेर पावसाळा सुरू झाल्यावर शाहूला रांगणा न जिंकताच माघारी फिरावे लागले. शाहू माघारी फिरल्यावर ताराराणी पुन्हा रांगणा मुक्कामी आल्या होत्या. सावंतवाडीकर भोसल्यांनी अनेक वेळा रांगणा घेण्यासाठी प्रयत्न केले होते; पण त्यांना यश येत नव्हते. अखेर 1767 मध्ये रांगणा किल्ला घेण्यास सावंतवाडीकरांना यश आले. रांगणा काही काळ जिवाजी विश्रामकडे होता. करवीरकरांनी किल्ल्यातील बेइमानीचे पारिपत्य करून किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.

इ. स. 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. इंग्रजांचा अंमल सुरू झाला. इ. स. 1844 मध्ये रांगणा, भुदरगड, सामानगड येथील गडकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्यात इंग्रजांनी तोफा डागून रांगणा उद्ध्वस्त केला.

आजही भग्न अवस्थेत रांगणा उभा आहे. रांगण्याच्या दुरुस्तीसाठी २०१८ साली पाच कोटीची रक्कम मंजूर झाली. सध्या रांगण्यावर दुरुस्तीचे काम चालू आहे. खासदार युवराज संभाजीराजे यांच्या गडकोट संवर्धन मोहिमेमुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील अनेक गडांच्या दुरुस्तीचे काम चालू आहे.

रांगणा किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे :

पडझड झालेला बुरूज:

गारगोटी-पाटगाव-तांबेवाडी, चिक्केवाडी मार्गे गडाकडे जाताना प्रथम दिसतो तो पडझड झालेला बुरूज. 1844 मध्ये गडकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केल्यानंतर इंग्रजांनी गडावर तोफांचा मारा करून गड ताब्यात घेतला. त्या वेळी या बुरुजाचे सुद्धा नुकसान झालेले दिसते. पडझड झालेल्या बुरुजावरूनच उद्ध्वस्त रांगणा किल्ल्याचे चित्र डोळ्यांसमोर तरळू लागते.

निंबाळकरांचा वाडा: Nimbalkar wada

हा वाडा कोणी, केव्हा बांधला याची कल्पना येत नसली तरी वाड्याच्या अवशेषांवरून खूप वर्षांपूर्वीचा असावा असे दिसते. संपूर्ण पडझड झालेला हा वाडा पाहून मन हेलावून जाते. वाड्यातच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. विहिरीवर उन्हाळ्यातही पाणी असल्याचे दिसून आले; पण पाला- पाचोळा साचल्यामुळे आणि कुजल्यामुळे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे जाणवले.

भुयारी मार्ग :

विहिरीपासून समोरच थोडे अंतर गेल्यावर एक भुयारी मार्ग लागतो. हा मार्ग पक्क्या दगडांनी बांधलेला असून द्वाराचे मुख आजही सुस्थितीत असल्याचे जाणवते. या द्वारावरच हनुमंताची कोरीव मूर्ती दगडी पाषाणावर आढळते.

गणेश मंदिर: Ganesh Temple

बुरुजापासून थोड्या अंतरावरच गणेश मंदिर आहे. पूर्ण दगडी मंदिर असून काळातील असावी याची खात्री पटते. मूर्तीचे निरीक्षण केल्यानंतर ती खूप जुन्या काळातील असावे असे वाटते.

फळझाडांचा सुकाळ :

गणेश मंदिराला भेट देऊन पुढे रांगणादेवीकडे जाताना उन्हाळ्यात गेला असाल तर निश्चितच फळझाडांचा आस्वाद घ्यायला मिळतो. जांभूळ, पेरू, उंबर इत्यादी फळांची अगदी रेलचेल असते. या फळांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

रांगणादेवीचे मंदिर (रांगणाई) :Ranganadevi temple

गडावर असलेले रांगणादेवीचे मंदिर अगदी साधेसुधे आहे. मंदिरावर कौलारू खापऱ्या आहेत. मंदिरासमोर असलेली पाषाणी दीपमाळ अगदी सुस्थितीत दिसली. थकलेल्या पर्यटकांना या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिरातील मूर्ती, ढाल, तलवार, त्रिशूल इत्यादी आयुधे घेतलेली आहे. देवीच्या उजव्या हाताला विष्णूची मूर्ती आहे; तर डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे. येथे एक फारशी शिलालेख असलेला एक दगड आहे.

कोकण दरवाजा :

रांगणा किल्ल्याची रचना राजगडावरील संजीवनी माचीप्रमाणे आहे. गडाच्या पश्चिमेला एक दरवाजा आहे. या दरवाजावर एक गोल बुरूज आहे. या दरवाजातून कोकणात जाण्याची वाट आहे, म्हणूनच या दरवाजाला ‘कोकण दरवाजा’ असे म्हटले जाते.

* राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

कोल्हापूर-गारगोटी-पाटगाव मार्गावर हा किल्ला असल्याने पर्यटक गारगोटीत राहू शकतात. गारगोटीत लॉजिंग-बोर्डिंगची सोय आहे. पाटगावातही राहण्याची व खाण्यापिण्याची सोय आहे. गरज पडली तर रांगणा किल्ल्यावर असलेल्या रांगणाई देवी मंदिरात मुक्काम करता येतो. फक्त जेवणाची शिदोरी बरोबर असायला हवी. निसर्गरम्य वातावरणात, गर्द राईत, शुद्ध हवेत असलेला रांगणा किल्ला अवश्य पाहावा असाच आहे. मनाला निश्चितच आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.

Leave a comment