आषाढी एकादशी/आषाढी वारी/Ashadhi Wari

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांप्रदायिक प्रवाह म्हणजे ‘आषाढी एकादशी’ होय. पंढरपूर येथे पाच ते सात लाख लोक दरवर्षी आषाढी एकाद‌शीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. या आषाढी एकाद‌शीची आपण माहिती घेणार आहोत.

आषाढी एकादशी केव्हा येते? When is Ashadhi Ekadashi?

आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यात शुद्ध एकादशीला येते.या एकादशीला आषाढी वारी असेही म्हणतात.ही एकादशी पावसाळयात येत असूनही माघ आणि कार्तिक एकादशीपेक्षा आषाढी एकाद‌शीला पंढरपुरात प्रचंड गर्दी असते.

1980/90च्या दशकात पंढरपूरात खच्छतागृ‌हे खूप कमी होती. त्यामुळे पंढरपुरात कॉलऱ्यासारखे साथीचे रोग पसरायचे .सध्या आवश्यक अशी स्वच्छतागृहे आहेत. तरी सुद्‌धा पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक वारक-याला कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी लागते.

पंढरपूरचा विठोबा कोण आहे ?

वैदिक काळात वेद, उपनिषदे ब्राह्मण्यके यांसारखे अनेक धर्मग्रंथ निर्माण झाले. त्यांत कुठेही पंढरपूरच्या विठ्‌ठलाचा उल्लेख नाही. रामायण, महाभारतातही पांडुरंगाचा उल्लेख नाही. गौतम बुद्धाचा जन्म इ.स.पू. 563 मध्ये झाला. त्यावेळी समाजात वर्णव्यवस्थेचे आणि कर्मकांडाचे प्रचंड स्तोम माजले होते. गौतम बुद्‌धांनी वर्णव्यवस्था, कर्मकांड नाकारून भेदभाव विरहित असा नवा विचार मांडला.लोकांना तो विचार आवडला. भावला.आणि भारतीय समाज बुद्धमय बनला. बुद्धांचे विचार सर्वत्र रुजवण्याचे काम सम्राट अशोकाने केले. मौर्य काळात बौद्ध विचार रुजवण्यासाठी अनेक स्तूप, लेणी, मंदिरे निर्माण झालीत. याच काळात पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर अस्तित्वात आले असावे ,असा विचार मांडणारे प्राच्चविद्या अभ्यासक अनेक आहेत.

वैदिक परंपरेतील लेखकांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार करून टाकला. खरेतर श्रीकृष्ण, महादेव, बु‌द्ध हे अवैदिक परंपरेतील महामानव आहेत. बुद्‌धांनी कर्मकांडापेक्षा सदाचाराला आणि समतेला महत्त्व दिले.

संतांचे विचार:Thoughts of Saints

महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य संतांनी केले. वारीत भेदभाव नसतो. पंढरपुरात भेद‌‌भाव नसतो. पांडुरंगाठायी भेद‌भाव नसतो. हा विचार संतांनी जनमानसात रुजवला. पांडुरंग अहिंसावादी होता आणि संतांनीही अहिंसावादीच विचार मांडले. वैदिक परंपरेतील देव हे हिंसावादी शस्त्र धारण करणारे होते. पंढरपूरचा विठ्ठल मात्र दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा आहे.

संत एकनाथ महाराज म्हणतात.—

बोधोनि सकळही लोका।

बोधे नेले त्रिविध तापवो ।।

बौद्‌धरूपे नांदसी। बोलेविना बोलणे एक वो ।।

पांडुरंग हा बौद्ध रूपातीलअसून बुद्धांचाच विचार रुजवण्याचे काम आपण करत आहोत, असेच संत एकनाथांना सांगायचे आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात–

बौ‌द्ध अवतार माझिया अदृष्टा।
मौन मुखे निष्ठा धरियेली ॥

मौन धारण केलेला पांडुरंग हा बु‌द्ध अवतार आहे. (म्हणजे तो बुद्‌धच आहे). तोच माझ्या वाट्याला आला आहे. बुद्ध मी पाहिलेला नाही, तरी पण तो माझ्या दृष्टिआड होत नाही.असे संत तुकाराम म्हणतात.

ज्ञानदेवे रचिला पाया।
तुका झालाशी कळस ।।

संत विचारातील सार सांगणारे हे वाक्य आहे. ज्ञानदेवांनी कर्मकांड नाकारले. त्यांनी भागवत धर्माचे विचार प्राकृत (मराठी) भाषेत लिहिले. त्यामुळे तत्कालीन सनातन्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडाना अतोनात छळले. त्यामुळे त्यांना जिवंत समाधी घेण्याची वेळ आली.तर संत तुकाराम यांना जिवंत गाडले गेले.

संत जनाबाई म्हणतात—

होऊनिया कृष्ण कंस बधियेला । आता बुद्धध झाला, सखा माझा ।।

संत जनाबाईंनी सुद्‌धा पंढरपूरच्या विठोबाला बुद्ध‌ध मानले आहे. पंढरपूरच्या बौद्धरुपी विठ्ठलाने आपल्या विचाराने प्रभावित करून अनेक संताच्या मनात आपले स्थान निर्माण केले. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ निवृत्तीनाथ जनाबाई, मुक्ताबाई, सावता माळी, गोरोबा कुंभार नरहरी सोनार, चोखोबा, विसोबा, सेना अशा विविध थरातून आलेल्या संतांनी समाजात समता रुजवली.एकोपा रुजवला.

वारकरी कुणाला म्हणायचे ?

जे पंढरपूरच्या वारीत सामील होऊन समतेचा विचार रुजवतात आणि वारीत सामील न होताही समतेचा विचार मांडतात आणि अंमलात आणतात, ते सर्व वारकरीच आहेत. वारकरी होण्यासाठी गळ्यात तुळसीची माळ असावीच असे नाही. तुमचा आहार काय आहे, यापेक्षा तुमचा विहार काय आहे याला खूप महत्व आहे. महाराष्ट्रात खूप मोठा वारकरी संप्रदाय आहे. त्यांनी संतांचा समतेचा विचार समाजात रुजवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.

आषाढी वारी आणि पालखी सोहळा/Ashadhi wari and palkhi sohala

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी आपले विचार समाजात रुजवण्यासाठी खूप त्रास सहन केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम वारकऱ्यांनी केला. त्यांच्या सन्मानार्थ अनेक ठिकाणाहून पालख्या निघतात..

संत ज्ञानेश्वरांची पालखी आषाढी एकाद‌शीच्या आधी एकवीस दिवस आळंदीहून निघते. ही पालखी लोणी काळभोर, यवत, बारामती, सणगर, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव मार्गे पंढरपूरला येते.

संत तुकाराम यांची पालखी आषाढी एकादशीच्या सुमारे वीस दिवस आधी निघते.या पालखीचा सोहळा देहू गावाहून सुरु होता. पुढे आकुर्डी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळसिरस, वेळापूर, मंडी शेगाव, वाखरी मार्गे पंढरपूरला येते.

दोन्ही महत्त्वाच्या पालख्या आषाढी एकाद‌शीला पंढरपुरात येऊन पांडुरंगाच्या चरणी विलीन होतात. पालखीत अनेक भाविक सामील होतात .वातावरण भक्तिमय असते. संपूर्ण प्रवास पायीच असतो. गावोगावी पालळ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने केले जाते. पालखी सोहळा हा एक विचारांचा जागर आहे. त्याचे रुपांतर कर्मकांडात होऊ नये ,याची आपण दक्षता घेतली पाहिजे.

एकादशी आणि उपवास : ekadashi and fasting

उपवास हा मनन ,चिंतन करण्यासाठी असतो. आपल्या आरोग्याला उपवासाचा त्रास होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे.अधिक वेळ उपाशीपोटी राहिल्याने पित्त वाढते. त्याचा परिणा‌म वाईट होतो. त्यामुळे उपवास धरणाऱ्या व्यक्तींनी लिंबू सरबत, फलाहार, ताक, कोकम असा हलका आहार घ्यावा.इकडे मन प्रसन्न राहिले पाहिजे आणि इकडे शरीराला तरी कोणतीही बाधा झाली नसली पाहिजे. याची काळजी घेऊन उपवास धरावा. अलीकडे उपवासासाठी शाबूची खिचडी करतात. शाबूची खिचडी पचायला खूप जड असते. त्यामुळे असे पदार्थ शक्यतो टाळावेत.

उपवासादिवशी काय खावे काय खाऊ नये असे काहीही नसते. आपल्याला पचेल असा हलका-फुलका आहार घ्यावा. सरबत घ्यावा. आमची आई नेहमी म्हणायची….

उपास धरशी आणि दुप्पट खाशी।

असे व्हायला नको.

सारांश, आषाढी एकादशी ही एक महाराष्ट्रातील महान परंपरा आहे. समतेची, भक्तीची आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारी ही परंपरा टिकली पाहिजे. वारीत सामील व्हायला सर्वांना मुभा असते. पांडुरंगाला संतांनी माऊली (आई), विठोवा, विठ्ठल, विठू माऊली अशा विविध नावाने आर्जविले. आपणही याच नावाने पांडुरंगाला ओळखतो. पांडुरंगाच्या मंदिरात रखुमाई कधी आली? हा एक संशोधनाचा विषय आहे. सावळा वि‌ठ्ठल- सावळा कृष्ण असे आपण जेव्हा म्हणतो. तेव्हा लोक पाडुरंगाला कृष्ण रुपात पाहू लागले असावेत. कृष्ण आणि रुक्मिणी हे पती-पत्नी होते. तसेच वि‌ठ्ठल आणि रुक्मिणी पती-पत्नी आहेत. कद‌ाचित याच कारणाने पांडुरंगाच्या मंदिरात रखुमाईचा प्रवेश झाला असावा, असेही वाटते.

सर्वांना आषाढी एकाद‌शीच्या हार्दिक शुभेच्छा!

संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, राधानगरी

Leave a comment