भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील अनेक सण शेतीशी संबंधित आहेत. Bendur हा सणही शेतीशी संबंधित आहे. या सणाचे महत्त्व काय आहे, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
बेंदूर / बैलपोळा सण केव्हा साजरा करतात ?When is Bendur/Bailpola festival celebrated?
महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात बेंदूर ( बैलपोळा) हा सण साजरा करतात.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात बेंदूर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.महाराष्ट्रात बेंदूर हा सण आषाढ शुद्ध त्रयोदशीला म्हणजे आषाढ शुद्ध महिन्यांत जेव्हा मूळ नक्षत्र येते, तेव्हा साजरा करतात. या सणाला ‘महाराष्ट्रीय बेंदूर असे म्हणतात. काही ठिकाणी हा सण बैलपोळा या नावाने साजरा केला जातो.
कर्नाटकात बेंदूर हा सण ज्येष्ठ महिन्यात शुद्ध पक्षात जेव्हा मूळ नक्षत्र येते, त्यादिवशी साजरा करतात. या सणाला कर्नाटकी बेंदूर असे म्हणतात. थोडक्यात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात अनुक्रमे आषाढ आणि ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या मूळ नक्षत्रादिवशी बेंदूर हा सण साजरा केला जातो.
महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो; तर उर्वरित महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो.
बेंदूर सणाला कोणाची पूजा करतात ?Who is worshiped in Bendur festival?
बेंदूर हा सण बैलाशी संबंधित आहे. अर्थात या सणादिवशी बैलाची पूजा करतात. शेतीची कामे करून थकलेल्या बैलाला या दिवशी पूर्ण विश्रांती दिली जाते.या दिवशी चिखलाचे बैल तयार करून त्यांनाही पूजले जाते. पूर्वी बैलांची संख्या खूप होती. आता ही संख्या खूप कमी झाली आहे. भविष्यात फक्त चिखली बैलांचीच पूजा करावी लागेल, असे वाटते.
बेंदूर सण कसा साजरा करतात?How do Bendur celebrate the festival?
बेंदूर या सणादिवशी बैलांची पूजा करतात. या दिवशी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालतात. काही ठिकाणी थंड पाण्याने अंघोळ घालतात.खांद्याला गरम पाण्याने शेक देतात. खांद्याला तेल लावून चोळतात. शिंगे चांगली घोळून रंगवतात. अंगावर काही ठिकाणी थीट (काळे ठिपके) लावतात. शिंगांच्या टोकाला पितळी कॅप बसवतात. काहीजण शिंगांना रेबणी बांधतात. बैलांना छानपैकी सजवतात. त्यांना धोट्याने हळव्या, अंडी पाजतात. घोटा म्हणजे बांबूपासून बनवलेली शिप्पी. त्यांना चांगला खुराक देतात आणि हळद-कुंकू लावून मनोभावे पूजा करतात.
बेंदूर या सणादिवशी चिखली बैलजोडीची सुद्धा पूजा करतात. ही पूजा घरोघरी होते. काही ठिकाणी चिखली बैल स्वतः बनवतात.तर काही ठिकाणी कुंभाराकडून बैलजोडी आणतात. या बैलजोडीची करंज्या, चकल्या यांचा नैवेद्य दाखवून पूजा करतात. चकल्यांना कडबोळे, कटुकली असेही म्हणतात.
या दिवशी गोड आणि तिखट अशी दोन्ही प्रकारची कडबोळी (चकल्या) करतात. बेंदूर या सणादिवशी पोळ्या बनवतात. पोळ्या, कडबोळे ,भात, वरण यांचा नैवेद्य बैलांना आणि देव्हाऱ्यातील आपल्या पूर्वजांना दाखवतात.
अनेक ठिकाणी बैलांना सजवून बैलगाडीला जुंपून त्यांच्या मिरवणुका काढतात.
तोरण: toran
बेंदूर सणादिवशी घरोघरी तोरण बांधतात .मोळंडी (Desmostachya bipinnata या वनस्पतीसारखी) या गवतापासून दोऱ्या वळतात.(बनवतात) आणि या दोऱ्यांच्या वेणीत पिंपळाची पाने खोचतात. अशा प्रकारे बनवलेली तोरणे ग्रामीण भागातील शेतकरी घराच्या दाराला,बैलगाडीला, शेतीच्या अवजारांना, वाहनांना बांधतात.निसर्गातील वनस्पतींपासून बनवलेली ही तोरणे बेंदरा दिवशी घरोघरी बांधतात.
कर ओलांडणे:
कर्नाटकात आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात कर ओलांडण्याची पद्धत आहे. गावाच्या वेशीवर कर बांधलेली असते. ही कर ओलांडण्याची स्पर्धा असते. जिंकणाऱ्या बैलाच्या मालकाला बक्षीस दिले जाते.
बैलपोळा या सणावर अनेक कवींनी छान-छान कविता लिहिल्या आहेत. कवी यशवंत यांनी लिहिलेली ‘सण एक दिन’ ही कविता लहानपणी आम्हाला खूप आवडायची. बेंदूर सणादिवशी आम्ही ही कविता आवर्जून म्हणायचो.