शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी ‘ज्याचे किल्ले त्याचे राज्य’ या उद्घोषाने सुरुवात केली होती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गड बांधले अनेक गडांची दुरुस्ती केली. त्यांनी उभारलेल्या गडांपैकीच ‘Pavangad’ हा एक महत्त्वाचा किल्ला होय.
समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 4040 फूट
डोंगररांग : कोल्हापूर-सह्याद्री
तालुका : पन्हाळा
जिल्हा : कोल्हापूर
कोल्हापूरपासून : 22 किमी
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी
सध्याची अवस्था : डागडुजी, दुरुस्ती करणे आवश्यक.
पावनगडाचा इतिहास :
‘पावनगड’ हा पन्हाळ्याचा जोडकिल्ला असला तरी त्या गडाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. कोल्हापूरहून वाघबीळमार्गे पन्हाळगडाला जोडूनच शिवरायांनी हा गड इ. स. 1673 मध्ये बांधून घेतला. सध्या हा किल्ला दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिला आहे.
अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांनी इ.स. 1660 मध्ये आपला मुक्काम पन्हाळगडावर हलवला. त्या वेळी चिडलेल्या आदिलशहाने सिद्दी जौहरला पाठवून पन्हाळगडाला वेढा दिला. जवळजवळ सहा महिने छत्रपती शिवराय पन्हाळगडावर अडकून पडले. त्याच वेळी शिवरायांच्या मनात पन्हाळगडाला लागूनच असलेल्या मार्कंडेय डोंगरावर गड बांधण्याचा विचार घोळू लागला.
इ. स. 1673 मध्ये पन्हाळगड मोगलांच्या ताब्यात होता. कोंडाजी फर्जंदने केवळ साठ मावळे घेऊन पन्हाळगड जिंकून घेतला. त्याच वेळी शिवरायांच्या सूचनेनुसार अर्जेजी यादव आणि हिरोजी फर्जंद यांनी मार्कंडेय डोंगरावर गड बांधून घेतला. पावनगडाचे संपूर्ण बांधकाम अर्जेजी यादव यांनी केले. शिवरायांनी स्वतः या गडाला भेट दिली. गडाचे बांधकाम पाहून अर्जेजी व हिरोजी यांना शिवरायांनी प्रत्येकी पाच हजार होनांचे बक्षीस दिले.
औरंगजेबाने पन्हाळगडाला जेव्हा वेढा दिला, त्या वेळी पावनगडाचा किल्लेदार सर्जेराव घाटगे होता. त्याने गनिमी काव्याने येथूनच औरंगजेबला जेरीस आणले होते. मोगल सैन्यांला दहशत बसवण्यासाठी मावळ्यांनी अनेक मोगल सैनिकांची कत्तल करून त्यांची मुंडकी गडावर रचली होती. सर्जेराव घाटगेंचा हा पराक्रम पाहून औरंगजेबने त्याला मोठ्या मनसबदारीचे आमिष दाखवले होते; पण सर्जेरावांनी असल्या मनसबदारीला भीक घातली नाही.
इ. स. 1842 ते 1844 च्या दरम्यान इंग्रजांनी पन्हाळगडावर हल्ला चढवला होता. पन्हाळगड ताब्यात येताच त्यांनी आपला मोर्चा पावनगडाकडे वळवला. पावनगडही त्यांनी जिंकून घेतला. पावनगडाचे दोन दरवाजे पाडले. तेथील स्थळांचे नुकसान केले. मार्कंडेय ऋषींच्या गुहेचे रूपांतर कबरीत झाले आहे. पावनगड परिसरात असणाऱ्या मंदिरातील मूर्ती गायब झाल्या आहेत.
पावनगडावरील काही निवडक स्थळांची आपण ओळख करून घेऊ या.
पावनगडावरील ऐतिहासिक निवडक स्थळे :
तुपाची विहीर :
युद्धात जखमी झालेल्या सैनिकांच्या जखमा भरण्यासाठी प्रत्येक गडावर तुपाच्या टाक्या, हंडे किंवा छोट्या विहिरी असायच्या. तूप जेवढे जुने तेवढे अधिक परिणामकारक मानले जाई. तुपाच्या विहिरीच्या बाबतीत आज्ञापत्रात म्हटले आहे—-
‘तुपाची टाकी बनवण्यासाठी काळा कुळकुळीत, भेगा न पडलेला दगड निवडावा. दगडावर भेगा असतील तर त्या बुजवण्यासाठी चुन्याचा लेप द्यावा. तूप पाझरून जाऊ नये याची काळजी घ्यावी’.
पावनगडावर तूप साठवण्यासाठी लहानसा हौद बांधला होता. त्या हौदावर घुमटीच्या आकाराचे बांधकाम केलेले आढळते. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आजही ही ‘तुपाची विहीर’ पावनगडावर पाहायला मिळते.
दक्षिण दरवाजा :
पावनगडावर काही ठरावीकच प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘दक्षिण दरवाजा’ होय. हा दरवाजा दक्षिणेच्या दिशेला तोंड करून उभा आहे. म्हणून या दरवाजाला दक्षिण दरवाजा असे संबोधले जाते.
इ. स. 1844 मध्ये संस्थानिकांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. त्या वेळी इंग्रजांनी हे बंड मोडून काढण्यासाठी पन्हाळगडावर आक्रमण केले. पन्हाळगडाचा चार दरवाजा व पावनगडाचा दक्षिण दरवाजा यांची तोफांच्या माऱ्याने नासधूस करून टाकली. सध्या या दक्षिण दरवाजाचे केवळ अवशेष उरलेले आहेत.
मार्कंडेय ऋषीची गुहा :
पन्हाळगडावर प्राचीन काळापासूनच अनेक ऋषीमुनी तपश्चर्येसाठी येत असत.त्यापैकीच एक मार्कंडेय ऋषी यांचे वास्तव्य पावनगडावर होते. मार्कंडेय ऋषी ज्या डोंगरातील गुहेत राहात होते, त्या डोंगराला ‘मार्कंडेय पर्वत’ असे नाव पडले.
मार्कंडेय ऋषींची गुहा:
दक्षिण दरवाजाच्या उजव्या हाताला दक्षिणेच्या दिशेने काही अंतरावर गेल्यास मार्कंडेय ऋषींची गुहा लागते. आज या गुहेचे काही लोकांनी लगडबंद फकिराच्या कबरीत रूपांतर केले आहे. ही कबर म्हणजेच पूर्वीची मार्कंडेय ऋषींची गुहा होय.
रेडेघाट :
पन्हाळगड आणि पावनगड यांच्या दरम्यान एक घाट आहे. त्यालाच ‘रेडेघाट’ म्हणतात. गडावर वस्तूंची ने-आण करण्यासाठी या घाटीचा वापर रस्ता म्हणून केला जात असे. वाट अत्यंत बिकट असल्यामुळे वाहतुकीची साधने म्हणून रेड्यांचा किंवा गाढवांचा उपयोग केला जात असे. त्यावरूनच या घाटीला ‘रेडेघाट’ किंवा ‘रेडेघाटी’ असे नाव पडले.
मूर्तिहीन मंदिर :
पावनगडाच्या मध्यभागी हे ‘मूर्तिहीन मंदिर’ आहे. या मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्यामुळे या मंदिराला ‘मूर्ती नसलेले मंदिर’ म्हणून ओळखले जाते.
1844 च्या इंग्रजांच्या आक्रमणाच्या वेळी पावनगडावरील मूर्तीचे व मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
इतर काही महत्त्वाची ठिकाणे :
पावनगडावर पायवाटेने चढून जाताना वाटेवर हनुमान मंदिर लागते. बुधवार पेठेतील जिल्हा परिषदेच्या शाळेमागून पावनगडाच्या डोंगरावर चढायला सुरुवात करताच शाळेमागे वाटेवरच हनुमान मंदिर लागते. मंदिरातील मारुतीची मूर्ती दिसायला सुंदर आहे.
शाळेपासून 20 मिनिटांत आपण गडावर पोहोचतो. पावनगडावरून पन्हाळगडाचे विहंगम दृश्य दिसते. गडावर पिण्याच्या पाण्याची विहीर, पाणी साठवण्यासाठी जुने दगडी भांडे आजही सुस्थितीत आहे. जुना वाडा मात्र भग्न अवस्थेत आहे. गडाच्या पूर्वेकडील टोकाला बुरूज आहे. बुरुजावर गवत, वनस्पती वाढल्यामुळे तो भेगाळलेला आहे. याच बुरुजावरून वाडी रत्नागिरीतील ज्योतिबा मंदिर दिसते.
गडावरील दर्याच्या आवारात आजही दोन तोफा आढळतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या पावनगडावरील थंडगार वारा उन्हाळ्यातही पर्यटकांना खुणावतो. येथे आल्यावर पर्यटक सुखावतो. निश्चितच भेट द्यावी असाच हा गड आहे.