राजगड किल्ला / Rajgad fort

पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे ‘किल्ले राजगड’ होय, पुणे शहराच्या नैर्ऋत्य दिशेला 48 किमी अंतरावर आणि भोर गावच्या वायव्येला 24 किमी अंतरावर स्वराज्याची पहिली राजधानी-किल्ले राजगड डौलाने उभा आहे. मावळ भागातील मुरुंबदेवाच्या डोंगरावर हा किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत.

गडाचे नाव : राजगड

समुद्रसपाटीपासून : 1394 मी.

गडाचा प्रकार : गिरिदुर्ग.

ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र

डोंगररांग : पुणे, सह्याद्री.

चढाईची श्रेणी : मध्यम

पुण्यापासून अंतर : 48 किमी

जवळचे ठिकाण : कर्जत, पाली,

सध्याची अवस्था : डागडुजी करणे आवश्यक

राजगडला कसे जाल?How to go to Rajgad ?

‘राजगड’ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे गडाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात. पावसाळ्यात राजगड सुन्न असला तरी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात राजगड पर्यटकांनी फुललेला असतो. अशा या

राजगडला कसे जायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पुणे, कर्जत, पाली, गुंजवणे या बसस्थानकांवरून राज्य परिवहन मंडळाच्या अनेक बसगाड्या जातात. खासगी वाहनानेही राजगडला जाणारे अनेक लोक आहेत.

पुण्याहून अवघ्या 48 किमी अंतरावर राजगड आहे. पुणे-राजगड अशी बस पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहे. त्याच्या साहाय्याने अगदी कमी वेळात राजगडावर जाता येते. वाटेने गडावर जायचे झाल्यास तीन तास लागतात.

पाली दरवाजामार्गेही राजगडावर जाता येते. पुणे वेल्हे एस.टी. बस पकडायची. वाटेत पाबे या गावी उतरून कानद नदी ओलांडून सरळ पाली दरवाजा गाठायचा. ही वाट पायऱ्यांची आहे. चढण सोपी असली तरी गडावर जाण्यास तीन तास लागतात.

चोर दरवाज्यामार्गे सुद्धा राजगडावर जाता येते. पुणे-वेल्हे हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरायचे. तेथून साखरमार्गे गुंजवणे गावात जाता येते. ही चढाई थोडी कठीण असली तरी गुंजवणेमार्गे चोर दरवाजातून गडावर पोहोचायला सुमारे अडीच तास लागतात.

भुतोंडेमार्गे आळू दरवाजातून राजगडावर जाता येते. गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून सुवेळा माचीवर येते.

इतिहास :History

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले राजकीय क्षेत्र म्हणून राजगडाला विशेष मान आहे. स्वराज्याची पहिली राजधानी अशी राजगडची खास ओळख आहे.महाराणी सईबाई यांचा मृत्यू,
छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म इत्यादी घटना याच गडावर घडल्या आहेत. राजगडचा इतिहास खूप प्राचीन आहे. इ. स. पहिल्या शतकात गौतमीपुत्र सातकर्णी राजाने हा किल्ला बांधला असे मानले जाते. ब्रह्मर्षी ऋषींचे वास्तव्य या मुरुंब देवाच्या डोंगरावर होते.

राजगडाचे पूर्वीचे नाव ‘मुरुंबदेव’ असे होते. बहमनी राजवटीच्या काळात हा किल्ला ‘मुरुंबदेव’ याच नावाने ओळखला जात असे. त्या काळी हा किल्ला दिव्य-भव्य असा काही नव्हता. इ. स. 1490 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला होता. त्याच दरम्यान त्याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेव गडावरील गडकरी बिनशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला हा किल्ला घेण्यास खूप प्रयत्न करावे लागले नाहीत. त्यानंतर हा किल्ला जवळजवळ सव्वाशे वर्षे निजामशाहीच्या ताब्यात राहिला.

इ. स. 1625 च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आला. त्या वेळी निजामशाहीच्या बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहात होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाहीचा सरदार हैबतखानाकडे सोपवला.

इ. स. 1630 च्या सुमारास हा किल्ला आदिलशाहीकडून पुन्हा निजामशाहीकडे आला. शहाजीराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन सोनाजीस किल्ल्याचा कारभार पाहण्यास सोपवले.

इ. स. 1646 ते 1647 च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून घेतल्यानंतर त्याच्या डागडुजीचे काम सुरू केले. तोरणा किल्ल्यापासून हा किल्ला 15 किलोमीटर अंतरावर आहे. त्या वेळी आदिलशाहीचा पहारा ढिलाच होता. शिवरायांनी या संधीचा फायदा घेऊन गड ताब्यात घेतला होता.

तोरणा किल्ल्यावर शिवरायांना गुप्तधन सापडले होते. त्या धनाचा उपयोग करून शिवरायांनी मुरुंबदेव किल्ला मजबूत केला आणि त्या किल्ल्याला नाव दिले ‘राजगड’. आजही हा किल्ला ‘राजगड’ या नावानेच ओळखला जातो. राजगडावर राजवाडा, बारा महाल, अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली. हीच स्वराज्याची पहिली राजधानी होय.

इ. स. 1660 मध्ये औरंगजेबाच्या आदेशानुसार शायिस्ताखान दक्षिण दौऱ्यावर आला. त्याने महाराष्ट्रातील अनेक प्रदेश बेचिराख केले; पण ‘राजगड’ ताब्यात घेण्याचे धाडस केले नाही. 5 एप्रिल 1663 मध्ये शिवरायांनी लालमहालात तळ ठोकून बसलेल्या शायिस्ताखानावर हल्ला केला. त्यात त्याची बोटे कापली गेली. ‘जिवावर आले होते पण बोटांवर निभावले ‘.शायिस्ताखान घाबरून गेला होता. औरंगजेबने त्याची रवानगी बंगाल प्रांतावर केली.

इ. स. 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंगच्या रूपाने स्वराज्यावर मोठे संकट आले होते. मिर्झाराजे जयसिंगाने राजगड घेण्यासाठी दाऊदखान आणि रामसिंग या दोन सरदारांना पाठवले होते; पण मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे त्यांना किल्ला जिंकता आला नाही. इ. स. 1665 मध्येच पुरंदर किल्ल्यावर धुमश्चक्री झाली. मुरारबाजी प्राणपणाने लढला; पण दिलेरखानाचा एक बाण मुरारबाजीच्या कंठात घुसला आणि मुरारबाजी धारातीर्थी पडला. शिवरायांना आपली माणसे गमवायची नव्हती. पुढील संकट टाळण्यासाठी त्यांनी मिर्झाराजे जयसिंगाशी तह केला. या तहात त्यांनी औरंगजेबाला 23 किल्ले दिले व 12 किल्ले आपल्या ताब्यात ठेवले. त्यात राजगड, रायगड इत्यादी 12 किल्ले होते.

12 सप्टेंबर 1666 ला शिवराय आग्ग्राहून सुटून राजगडला आले. 24 फेब्रुवारी 1670 मध्ये राजगडावर राजाराम महाराजांचा जन्म झाला. सिंहगड जिंकण्यासाठी शिवरायांनी तानाजी मालुसरेला राजगडावरूनच पाठवले होते. इ. स. 1671-72 च्या दरम्यान शिवरायांनी स्वराज्याची राजधानी राजगडावरून रायगडावर हलवण्याचा बेत आखला होता. पुढे 1674 मध्ये ‘रायगड’ स्वराज्याची राजधानी बनली.

3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला आणि स्वराज्यावर एकापाठोपाठ एक संकटे येऊ लागली. छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षे शत्रूशी निकराने सामना केला; पण फितुरीमुळे ते पकडले गेले. औरंगजेबने अमानुषपणे त्यांची हत्या केली. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. जून 1689 मध्ये मुघल सरदार किशोरसिंह हाडाने राजगड जिंकून घेतला. मराठ्यांनी पुन्हा हल्ला करून गड ताब्यात घेतला होता.

11नोव्हेंबर 1703 मध्ये औरंगजेब स्वतः बलाढ्य फौजेसह राजगड जिंकण्यासाठी निघाला. दोन महिने त्याला किल्ला घेता आला नाही. शेवटी 4 फेब्रुवारी 1703 मध्ये राजगड औरंगजेबच्या ताब्यात गेला. त्याने इरादतखानची नेमणूक किल्लेदार म्हणून केली. गडाचे नाव ‘नाबिशहागड’ असे ठेवले.

29 मे 1707 रोजी गुणाजी सावंत आणि पंताजी शिवदेवा यांनी गडावर हल्ला करून गड ताब्यात घेतला. पुढे छत्रपती शाहूंच्या ताब्यात हा गड आल्यावर शाहू महाराजांनी 1709 मध्ये सुवेळा माचीस 300 रु. व संजीवनी माचीस 100 रु. अशी व्यवस्था लावून दिली.

पेशवे काळात राजगड सचिवांच्या ताब्यात गेला. इ स 1818 साली मराठ्यांच्या सत्तेचा अस्त झाला आणि स्वराज्यातील संपूर्ण गड इंग्रजांच्या ताब्यात गेले.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे

सुवेळा माची :

शिवरायांनी राजगडची डागडुजी करताना पूर्वेकडील डोंगररांग तटबंदी बांधून भक्कम केली. या माचीला ‘सुवेळा माची’ असे नाव ठेवले. ही माची संजीवनी माचीएवढी लांब नसली तरी माचीला तीन टप्पे आहेत. पुढे पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेली आहे.

माचीच्या प्रारंभी असलेल्या टेकडीसारख्या भागाला ‘डुबा’ म्हणतात. येथेच दक्षिणमुखी मारुती व पाण्याचे टाक पाहायला मिळते. जवळच येसाजी कंक, तानाजी मालुसरे, शिलींबकर या सरदारांचे चौथरे होते.

सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर काळेश्वरी बुरूज आहे. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरूज आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक उंच खडक लागतो. या खडकाला 3 मीटर व्यासाचे एक छिद्र आहे. या खडकाला ‘हत्तीप्रस्तर’ असे म्हणतात. याच टप्प्यावर एक गुप्त दरवाजा आहे. त्याला ‘मेढ दरवाजा’ असेही म्हणतात. सुवेळा माचीच्या सर्वांत शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात बाघजाईचे शिल्प आहे.

काळेश्वरी बुरूज :

सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरूज लागतो. येथे तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.

रामेश्वर मंदिर :

पद्मावती देवी मंदिराच्या समोरच रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

राजवाडा :

रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे राजवाड्याचे अवशेष दिसतात. राजवाडा जेथे बांधला होता त्या भागालाच ‘बालेकिल्ला’ असे म्हणतात. राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबरखाना लागतो. त्याच्यापुढे सदर आहे. सदरेच्या समोरच दारूचे कोठार आहे. सदर ही गडावरची सर्वांत महत्त्वाची वास्तू आहे.

पद्मावती माची :

राजगडावर एकूण तीन माच्या आहेत. त्यांपैकी ‘पद्मावती माची’ सर्वात प्रशस्त आहे. या माचीवर पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारूगोळ्याचे कोठार इत्यादी स्थळे आहेत.

पद्मावती मंदिर :

 

शिवरायांनी ‘मुरुंबदेव’ गडाचे राजगडामध्ये नामांतर केल्यानंतर येथे पद्मावती देवीचे मंदिर बांधले. २००२ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिरात तीन मूर्त्या आहेत. त्यातील एका मूर्तीची छत्रपती शिवरायांनी प्रतिष्ठापना केलेली आहे.

सईबाईंची समाधी :

पद्मावती मंदिराच्या समोरच छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी आणि संभाजीराजे यांच्या मातोश्री यांची समाधी आहे. समाधीसमोर आल्यावर क्षणभर झुकल्याशिवाय पाऊल पुढे उचलत नाही. महाराणी सईबाईंची समाधी राजगडावर आहे,हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

पद्मावती तलाव :

गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण तलाव लागतो. तलावाच्या भिंती आजही पाहायला मिळतात. तलावाच्या भिंतीतच एक कमान आहे. या कमानीतून तलावात जाता येते.

संजीवनी माची :

सुवेळा माची बांधल्यानंतर शिवरायांनी संजीवनी माची बांधण्यास सुरुवात केली. या माचीची लांबी अडीच किमी असून ती तीन टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवर आजही घरांचे अवशेष पाहायला मिळतात.

माचीच्या प्रत्येक टप्प्याला चिलखती बुरूज आहे. संजीवनी माचीला एकूण एकोणीस बुरूज आहेत. काही बलाढ्य बुरुजांवर पूर्वी तोफा असाव्यात असे वाटते. या माचीवर आळू दरवाजाने सुद्धा येता येते. आळू दरवाजापासूनच चिलखती तटबंदी पाहायला मिळते. ही तटबंदी दुतर्फा असून चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरूज आहेत.

आळू दरवाजा :

संजीवनी माचीवर येण्यासाठी ‘आळू दरवाजाचा’ उपयोग केला जात असे. सध्या या दरवाजाचा बराचसा भाग ढासळला आहे. दरवाजावर वाघाने सांबराला उताणी पाडल्याचे शिल्प आहे.

पाली दरवाजा :

पाली गावातूनच जो मार्ग गडावर जातो व गडावर प्रवेश करण्यासाठी जे द्वार लागते त्याला ‘पाली दरवाजा’ असे म्हणतात. पाली दरवाजाचा मार्ग पायऱ्यांचा बनलेला आहे. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंच व रुंद आहे. यातून अंबारीसह हत्ती जाऊ शकतात. तेथून पुढे 200 मी. अंतरावर दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारांचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केले आहे. बुरुजांवर परकोट बांधले आहेत. त्यांना गोल आकाराचे झरोके ठेवले आहेत. त्यांना ‘फलिका’ असे म्हणतात. फलिकांच्या माध्यमातून शत्रूवर बाणांचा, बंदुकींच्या गोळ्यांचा हल्ला करण्यासाठी व शत्रुसैन्याची हालचाल टिपण्यासाठी केला जात असे.

गुंजवणे दरवाजा :

‘गुंजवणे’ दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिकाच आहे. दोन्ही बाजूंना भरभक्कम बुरूज असलेला पहिला दरवाजा, वैशिष्ट्यपूर्ण कमान असलेला दुसरा दरवाजा आणि शेवटी श्री व गजशिल्प असलेला तिसरा दरवाजा आहे.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

गडावरील पद्मावती मंदिरात 20 ते 25व्यक्ती राहू शकतील एवढी सोय आहे.

पद्मावती माचीवर राहण्यासाठी पर्यटकांना निवासाच्या खोल्या आहेत. पाण्याची सोय : पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्यास योग्य असे बारमाही पाणी आहे.

जेवणाची सोय मात्र स्वतः करायला हवी. जेवणाचे साहित्य घेऊन गेल्यास गडावर जेवण बनवता येईल.

 

संभाजी पाटील

राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी,राधानगरी.

Leave a comment