पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या शेजारी असणारा लोहगड हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने हा किल्ला 26 मे 1909 रोजी ‘महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केला. या किल्ल्याची माहिती आता आपण घेणार आहोत.
गडाचे नाव : लोहगड
समुद्रसपाटीपासूनची उंची : सुमारे 1200 मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी.
ठिकाण : लोणावळा, जिल्हा पुणे
जवळचे गाव : लोणावळा, मळवली.
पुण्याहून अंतर : 65 किमी.
डोंगररांग : मावळ, सह्याद्री
स्थापना : प्राचीन बौद्धकाल.
गडावर कसे जाल ?
पुण्याहून 58 किमी अंतरावर लोणवळ्याच्या पुढे मळवली बसस्थानक आहे. तेथून भाजे गावातून लोहगडला जाणारी वाट आहे. या वाटेने साधारणतः दीड तास चालल्यानंतर ‘गायमुख’ लागते. तेथे जवळच लोहगडवाडी गाव आहे. गायमुख खिंडीतून उजवीकडे वळल्यावर लोहगडावर जाता येते.
मुंबईहून येताना सुद्धा मळवली बसस्थानकावर उतरल्यानंतर आपल्याला लोहगडावर जाता येते.
लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने लोहगडवाडी पर्यंत जाता येते. तेथून पायी लोहगडावर जावे लागते.
पवना धरणाजवळ बसलेल्या काळे कॉलनीतूनही लोहगडला जाणारा मार्ग आहे.
लोहगडचा इतिहास :
पुणे जिल्ह्यात असणारा अत्यंत मजबूत, बुलंद आणि दुर्गम असा हा किल्ला आहे. हा किल्ला खूप प्राचीन असून जवळजवळ सत्तावीसशे वर्षांपूर्वी निर्माण झाला असावा असे या किल्ल्याच्या परिसरात असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी पाहिल्यानंतर वाटते.
सातवाहन, चालुक्य, यादव या शिवपूर्व काळातील राजवटी किल्ल्याने पाहिले आहेत. इ. स. 1498 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि त्याने अनेक किल्ले जिंकून आपल्या राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. लोहगडही त्याने जिंकून आपल्या सत्तेत आणला होता.
इ. स. 1564 मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम याला या गडावरच कैदेत ठेवले होते. 1630 साली लोहगड आदिलशाहीने ताब्यात घेतला. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या बहमनी सत्ता फुटून निर्माण झाल्या होत्या.
शिवरायांनाही ‘लोहगड’ स्वराज्यात असावा असे वाटत होते. त्यांनी 1657 मध्ये लोहगड जिंकून स्वराज्यात आणला. विसापूरही जिंकून घेतला होता. त्याच वर्षी कल्याण-भिवंडी परिसर जिंकून घेतले होते.
इ स 1665 साली मिर्झाराजे जयसिंगने औरंगजेबच्या सूचनेनुसार दक्षिण मोहीम आखली होती. त्याने स्वराज्यात प्रवेश करून एक एक गड काबीज करण्यास सुरुवात केली होती. पुरंदरमध्ये मराठ्यांचा मोठा पराभव झाला होता. शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंगशी तह केला आणि त्या तहात 23 किल्ले आणि त्याखालचा परिसर दिला. लोहगडही तहात गेला होता. लोहगडावर मोगलांनी सत्ता प्रस्थापित केली.
आग्ऱ्याहून सुटून आल्यावर शिवरायांनी गमावलेले किल्ले पुन्हा ताब्यात घेण्यास सुरुवात केली. 13 मे 1670 मध्ये लोहगड पुन्हा जिंकला आणि स्वराज्यात आणला.
स्वराज्यासाठी शिवरायांनी पहिल्यांदा सुरतेवर स्वारी केली. त्या वेळी तिथून आणलेली काही संपत्ती नेतोजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती.
3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचा मृत्यू झाला आणि स्वराज्यात अनेक उलथापालथी झाल्या. संभाजी महाराजांचा मृत्यू-राणी येसूबाई- पुत्र शाहू औरंगजेबच्या कैदेत – राजाराम महाराजांचा मृत्यू अशा एकापाठोपाठ एक घटना घडत गेल्या. इ. स. 1713 मध्ये शिवरायांचे नातू शाहू महाराज यांनी कान्होजी आंग्रेच्या पराक्रमावर प्रसन्न होऊन लोहगड कान्होजी आंग्रेला दिला.
इ. स. 1720 मध्ये लोहगड आंग्ग्रांकडून पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. 1770 मध्ये नाना फडणवीस यांचा सरदार जावजी बोंबले याने लोहगड आपल्या ताब्यात घेतला. नानांनी नंतर धोंडोपंत नित्सुरे याच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ. स. 1789 मध्ये नानांनी किल्ल्याचे मजबुतीकरण करून घेतले. किल्ल्यात नानांनी एक बावही खणून घेतली. बावीच्या बाजूस एक शिलालेख कोरला.
नाना फडणवीस यांनी आपले सर्व द्रव्य नित्सुरे यांच्या देखरेखीखाली आणले होते. नित्सुरे हा नानांचा विश्वासू सेवक होता. इ. स. 1800 मध्ये नित्सुरे यांचा मृत्यू झाला. इ. स. 2802 मध्ये त्यांच्या पत्नी गडावर राहायला आल्या. इ. स. 1803 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला; परंतु दुसऱ्या बाजीरावाने पुन्हा गड आपल्या ताब्यात घेतला. 4 मार्च 1818 मध्ये जनरल प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्याने विसापूरसह लोहगडही ताब्यात घेतला.
गडावरील प्रेक्षणीय स्थळे :
गणेश दरवाजा :
लोहगडावर चढताना सलग चार प्रवेशद्वारे लागतात आणि सर्पाकार मार्ग लागतो. गणेश दरवाजा त्यातीलच एक. गणेश दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता,अशी आख्यायिका आहे.त्याच्या बदल्यात या कुटुंबाच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहे.
नारायण दरवाजा :
नाना फडणवीस यांच्या ताब्यात लोहगड आल्यानंतर त्यांनी हा दरवाजा बांधला. येथे एक भुयार आहे. या भुयारात भात व नाचणी साठवून ठेवण्यात येत असे. आजही ते भुयार पाहायला मिळते.
हनुमान दरवाजा :
लोहगडावरील हनुमान दरवाजा सर्वांत प्राचीन दरवाजा मानला जातो.
महादरवाजा :
या दरवाजाचे बांधकामही नाना फडणवीस यांनी नोव्हेंबर 1790 ते जून 1794 या काळात केले. हा गडाचा मुख्य दरवाजा मानला जातो. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे.
दर्गा :
महादरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्याच्या शेजारीच चुन्याची घाणी व लोहारखाण्याचे भग्न अवशेष आढळतात. जवळच एक ध्वज स्तंभ आणि चौथऱ्यावर लोहगडावरील इतिहासाची साक्षीदार म्हणून तोफ आहे.
लक्ष्मीकोठी :
ध्वजस्तंभाच्या उजवीकडे थोडे चालत गेल्यास एक इमारत लागते. हीच ती ‘लक्ष्मीकोठी’. येथेही फुटलेल्या, गंजलेल्या अवस्थेत एक तोफ आहे. लक्ष्मीकोठीत अनेक खोल्या आहेत. येथे राहण्याची सोय आहे.
शिवमंदिर :
दर्याच्या उजवीकडे थोडे अंतर गेल्यास एक उंचवटा लागतो. या उंचवट्यावर एक शिवमंदिर आहे.
पाण्याचे साठे :
शिवमंदिराच्या पुढे गेल्यास एक अष्टकोनी तळे लागते. या तळ्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे. हा गडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे.
पिण्याच्या पाण्याचे टाके ओलांडून सरळ पुढे दहा-पंधरा मिनिटे चालत गेल्यास नाना फडणवीस यांनी बांधून घेतलेले एक तळे लागते. हे तळे गडावरील सर्वात मोठे तळे आहे. या तळ्याला सोळा कोनी तळे असेही म्हणतात.
विंचूकाटा :
लक्ष्मीकोठीच्या अगदी पश्चिमेस ‘विंचूकाटा’ आहे. हा विंचूकाटा म्हणजे पश्चिमेस पंधराशे मीटर लांब व तीस मीटर रुंद अशी एक डोंगराची चिंचोळी सोंड होय. विंचूकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा ओलांडून पलीकडे जावे लागते. गडावरून या भागाचे निरीक्षण केले असता विंचवाच्या नांगीसारखा हा दिसतो. म्हणूनच या स्थळाला विंचूकाटा असे नाव पडले आहे. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी विंचू काट्याचा उपयोग होत असे.
भाजे लेणी :
गड पाहून झाल्यानंतर येतेवेळी भाजे गावातील ‘भाजे लेणी’ अवश्य पाहावीत अशीच आहेत.
राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :
गडावर लक्ष्मीकोठी सोडल्यास इतरत्र कोठेही राहण्याची सोय नाही. लक्ष्मीकोठीत 25 ते 30 जण आरामात राहू शकतात. येथे खाणावळ किंवा हॉटेल नसल्यामुळे जेवण स्वतः बनवावे लागेल. त्यासाठी जेवणाचे साहित्य घेऊन जावे लागेल.
अनेक जण पुण्यात किंवा लोणावळा परिसरात मुक्काम करून लोहगड पाहायला जातात.