तोरणा किल्ला/प्रचंडगड /Torna Fort

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटात तोरणा किल्ल्याला अद्वितीय असे महत्त्व आहे. जिजामातेच्या आणि शहाजीराजेंच्या प्रेरणेने स्वराज्याची ऊर्जा उत्पन्न झालेल्या शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांनी स्वबळावर निवडक सवंगड्यांसह ताब्यात घेतलेला हा पहिला किल्ला होय. या तोरणा किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.

गडाचे नाव : तोरणा, तोरणागड, प्रचंडगड.

समुद्रसपाटीपासूनची उंची : सुमारे 1400 मीटर.

किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग.

चढाईची श्रेणी : मध्यम.

डोंगररांग : कानद, सह्याद्री.

ठिकाण : वेल्हा, जिल्हा, पुणे,

पुण्यापासून : 64 किलोमीटर

जवळचे गाव : वेल्हा.

सध्याची व्यवस्था : चांगली; पण डागडुजी करणे आवश्यक.

स्थापना : 1470 ते 1486 च्या दरम्यान.

तोरणा किल्ला पाहण्यास कसे जाल ?How to visit Torna Fort?

 

तोरणा किल्ला पाहण्यासाठी आपणास पुणे-शिरवळ रस्त्यावरील नसरापूर फाट्यावर जावे लागते. नसरापूर फाट्यावरून सरळ वेल्हा गाव गाठायचे. वेल्हा गाव तोरणा किल्ल्याच्या कुशीतच पायथ्याशी वसलेले आहे. सकाळी लवकर वेल्हा गावात पोहोचल्यानंतर पुढचा प्रवास सुखकर होण्यास मदत होते. वेल्हा गावापासूनच पायपीट करावी लागते. गडावर पाण्याची सोय नसल्यामुळे पिण्यासाठी लागणारे पाणी स्वतःच घेऊन जावे लागते.

तोरणगडाचा विस्तार पाहून शिवरायांनी या गडाचे नाव ‘प्रचंडगड’ असे ठेवले होते.

भौगोलिक स्थान :geographic location :

तोरणा किल्ल्याला प्रचंडगड या नावाने ओळखले जाते. सह्याद्री पर्वताचा पुणे जिल्ह्यातील सर्वांत उंच डोंगर म्हणजे ‘तोरणा गड’ होय. या गडावर तोरणाची भरपूर झाडे होती. त्यामुळे गडाला ‘तोरणा किल्ला’ असे नाव पडले. गडकोटात अतिशय दुर्गम आणि विशाल असा गड म्हणून प्रचंडगडाची ख्याती आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. पैकी एका पदरावर तोरणा व राजगड हे किल्ले आहेत तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर डोंगररांग आहे.

पुण्याच्या नैर्ऋत्य दिशेस असलेल्या पर्वतराशीमध्ये 18.276 उत्तर अक्षांश व ७17.613 पूर्व रेखांशावर तोरणा किल्ला आहे. या किल्ल्याच्या उत्तरेला कानद खोरे तर दक्षिणेला वेळवंडी नदी आहे. गडाच्या पूर्वेला बामण व खरीप या दोन खिंडी आहेत; तर पश्चिमेला कानद खिंड आहे.

 तोरणा किल्ल्याचा इतिहास :History of Torna Fort:

तोरणा किल्ल्यावर फारसा इतिहास घडला नसला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘स्वराज्य’ निर्माण केले. त्याचा श्रीगणेशा तोरणा किल्ला जिंकून केला. म्हणूनच शिवचरित्रात तोरणा ऊर्फ प्रचंडगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

शिवरायांनी इ. स.1647 मध्ये निवडक बालसवंगड्यांसह तोरणा किल्ल्यावर हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला व स्वराज्याचे तोरण बांधले. गडावर तोरणजाईचे देऊळ आहे. या देवीवरूनच गडाला तोरणा असे नाव पडले असेही इतिहासकारांचे मत आहे.

तोरणा किल्ला कधी, कोणी बांधला हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी येथील लेण्यांच्या व मंदिरांच्या अवशेषावरून या डोंगरावर शैव पंथाचा आश्रम असावा असे स्पष्ट होते. इ. स. 1470 ते 1486 या काळात बहमनी राजवट बळकट करण्यासाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला. शिवरायांनी तोरणा किल्ला 1647 साली जिंकून गडाची डागडुजी केली. गड पूर्णत्वास आल्यावर गडाला ‘प्रचंडगड’ असे नाव दिले.

इ. स. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबने क्रूर हत्या केली. त्यानंतर रायगडसह प्रचंडगडही मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे शंकराजी नारायण सचिवांनी तोरणा किल्ला जिंकून पुन्हा मराठ्यांच्या सत्तेत आणला.

इ. स. 1704 मध्ये औरंगजेबने गडाला वेढा दिला व गड पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबने या गडाला ‘फुतुउल्गैब’ असे नाव ठेवले. फुतुउलीब म्हणजे दैवी विजय होय. चार वर्षांनी म्हणजे इ. स. 1708 मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर (इ. स. 1707) सरनोबत नागोजी कोकाटे याने प्रचंडगड ताब्यात घेतला व गडावर भगवा फडकावला. त्यानंतर हा किल्ला दीर्घकाळ स्वराज्यात राहिला. इ. स. 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली आणि तोरणा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे :

बिनी दरवाजा :

गडावर प्रवेश करतानाच हा ‘बिनी दरवाजा’ लागतो.

कोठी दरवाजा :

गड पाहण्यासाठी आणखी एक दरवाजा ओलांडून जावे लागते. तो दरवाजा म्हणजे ‘कोठी दरवाजा’ होय. हा दरवाजा भक्कम आणि मजबूत बांधणीचा आहे.

तोरणजाईचे मंदिर :

तोरणा गडाला ‘तोरणा किल्ला’ असे नाव पडले त्याच्या दोन आख्यायिका आहेत. 1. – गडावर तोरणजाईचे मंदिर आहे, त्यामुळे गडाला तोरणा किल्ला असे नाव पडले. 2. गडावर तोरणाची भरपूर झाडे आहेत, त्यावरून तोरणा किल्ला असे नाव पडले असावे.

माळेचा बुरूज :

कोठी दरवाजाला एक जिना आहे. या जिन्यावरून वर चढायचे आणि माळेच्या बुरुजावर जायचे, अतिशय उत्कृष्ट आणि मजबूत बांधणीचा हा बुरूज आहे. या बुरुजावरून सभोवार नजरेचा फेरफटका मारायचा. या बुरुजावर वेल्हा गावातून गडावर आलेली वाट न्याहाळता येते.

सफेलीचा बुरूज :

माळेचा बुरूज पाहून दक्षिणेकडे वळायचे. तेथे आहे ‘सफेलीचा बुरुज प्रत्येक गड आणि गडाचे बुरूज वैशिष्ट्यपूर्ण असतात हे सफेलीचा बुरूज पाहिल्यानंतर लक्षात येते. येथून सभोवतालचा निसर्ग छान दिसतो.

फुटक्या बुरूज :

फुटक्या बुरुजावर गेल्यानंतर आपल्याला सभोवार पसरलेला अवीट निसर्ग डोळ्यांनी आणि कॅमेऱ्याने टिपता येतो. फुटक्या बुरुजावरून बुधला माची दिसते.

महादेव मंदिर :

पूर्वी या गडावर शैवपंथीय लोक राहात होते. त्यामुळेच येथे महादेवाचे मंदिर आढळते. मंदिरात शिवलिंग आहे. मंदिराच्या समोरच सतिस्मारक आहे, दीपमाळ आहे, सदर आहे.

मेंगाई मंदिर :

हे मंदिर गडावरील मुख्य मंदिर मानले जाते. मंदिरात मेंगाईदेवीची मूर्ती आहे. हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे. येथे आपणास तोरणा किल्ल्याचा नकाशा पाहायला मिळतो. नकाशावरून गडावरील प्रेक्षणीय स्थळे कोणत्या दिशेला आणि कोठे आहेत, हे समजण्यास मदत होते.

मंगाई माची :

तोरणा किल्ल्यावरील महत्त्वाची माची म्हणजे मंगाई माची होय. वा माचीवरून पुढे पूर्वेकडे चालत गेल्यास भेल बुरूज लागतो.

झुंजार माची :

तोरणा ऊर्फ प्रचंडगडावरील सर्वांत महत्त्वाची आणि प्रचंड अशी माची म्हणजे ‘झुंजार माची’ होय. भेल बुरुजापासून झुंजार बुरुजापर्यंत ही माची पसरली आहे. झुंजार माची पाहिली की प्रतापगडावरील चिलखती बांध्याच्या टेहळणी बुरुजाची आठवण येते. या माचीवर उतरण्यासाठी लोखंडी बुरूज आहे. झुंजार माची भेल बुरुजावरूनच कॅमेराबद्ध करायची आणि मगच माचीवर उतरायचे. झुंजार माचीचे वैशिष्ट्य म्हणजे या माचीस एकाखाली एक असे दोन चिलखती बांधणीचे बुरूज आहेत. या दोन्ही बुरुजांच्या मध्ये एक पाण्याचे टाके आहे.

हनुमान बुरूज:

झुंजार माची पाहून जवळच असलेला हनुमान बुरूज पाहायला जायचे. हनुमान बुरुजाजवळ सह्याद्रीच्या डोंगररांगांचे नयनरम्य दृश्य टिपायला हरकत नाही.

बुधला माची :

हनुमान बुरूज पाहिल्यानंतर तेथून पायउतार व्हायचे आणि सरळ मंगाई मंदिराकडे यायचे. तेथून सरळ गडाच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या बुधला माचीकडे जायचे. बुधला माचीवर जाण्यासाठी वाटेत कोकण दरवाजा लागतो. कोकण दरवाजातून सरळ बुधला माचीवर जायचे. ही माची खूप अवघड आहे. माचीवरून चालताना जपून चालावे लागते. या माचीवरच एक बुधला सुळका आहे. बुधला सुळका म्हणजे निसर्गाची करामतच मानायला पाहिजे. या माचीवरच भगत दरवाजा, चित्ता दरवाजा, चिणला दरवाजा, पाण्याची टाकी यांचे अवशेष पाहायला मिळतात.

बुधला माचीवरून चालताना खूप जपावे लागते. क्षणभरासाठी लक्ष विचलित म्हणजे सरळ कडेलोट ! म्हणूनच बरेच जण कोकण दरवाजातूनच बुधला माचीचे दर्शन घेतात.

शिवरायांनी गड ताब्यात घेतल्यावर गडाची दुरुस्ती केली. खरे तर आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर शिवरायांनी तोरणा किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. त्या वेळी जीर्णोद्धार करताना पाच हजार होन खर्च आला. गड दुरुस्त करताना शिवरायांना या गडावर गुप्तधन सापडले होते.

गडाचे काम पूर्ण झाल्यावर शिवरायांनी या गडाचे नाव ‘प्रचंडगड’ असे ठेवले. आजही या नावानेच हा गड ओळखला जातो.

निश्चितच प्रचंडगडावरील प्रवास रोमांचकारी आणि अविस्मरणीय ठरतो,यात वादच नाही.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

प्रचंडगडावर राहण्याची सोय नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे प्रचंडगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हा गावात कुठेही राहायला जागा मिळेल. जेवणाची सोय होईल. सकाळी लवकर प्रचंडगड पाहायला जायला काहीच हरकत नाही. साधारणतः अडीच-तीन तास गड पाहण्यास लागतात. दुपारपर्यंत आपण परतीचा प्रवास करू शकतो.

Leave a comment