सिंहगड / Sinhagad fort

‘सिंहगड’ हा पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. पुण्याच्या नैर्ऋत्य दिशेला 25 किमी अंतरावर हा किल्ला विसावला आहे. सह्याद्रीच्या कुशीतील भुलेश्वराच्या रांगेवर असलेला हा ‘कोहिनूर हिरा’ प्रत्यक्ष भेट देऊन पाहावा असाच आहे. पुरंदर, राजगड, लोहगड, विसापूर, तुंगचा मुलूख गडावरून न्याहाळता येतो. या गडाची आपण आता ओळख करून घेणार आहोत.

गडाचे नाव : सिंहगड

पूर्वीचे नाव : कोंढाणा

समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 1300 मी.

गडाचा प्रकार : गिरिदुर्ग

ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र.

डोंगररांग: भुलेश्वर पुणे, सह्याद्री

चढाईची श्रेणी : मध्यम, सध्या सोपी.

पुण्याहून अंतर : 25 किमी.

जवळचे गाव : सिंहगड.

सध्याची अवस्था : ठीक. पण प्राचीन वास्तूंची दुरुस्ती आवश्यक.

सिंहगडला कसे जाल ?How to go to sinhagad?

* पुण्यातील स्वारगेट बसस्थानकापासून सिंहगड सुमारे 35 किमी आहे. येथून सिंहगडला जाणाऱ्या भरपूर बसेस आहेत.

* निगडीतूनही सिंहगडला जाता येते.

* बसने सिंहगडला गेल्यास गडाच्या पायथ्याशी बस थांबते. तेथून किमान 40 ते 50 मिनिटांत चालत गडावर जाता येते.आम्ही लहान मुलांची सहल घेऊन गडाच्या पायथ्यापासून गडावर चालत 35 मिनिटांत गेलो होतो.
• फोरव्हीलरने थेट गडावर जाता येते.

सिंहगडचा इतिहास :History

फार वर्षांपूर्वी सिंहगडावर कौंडिण्य ऋषींचे वास्तव्य होते. त्यांच्या नावावरूनच त्या गडाला ‘कोंढाणा’ असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला गड घेण्यास सांगितल्यावर तानाजी गडावर चाल करून गेला. उदेभान आणि तानाजी यांच्यात जोरात धुमश्चक्री झाली. त्यात तानाजीला बलिदान द्यावे लागले. ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हापासून शिवरायांनी गडाचे नाव ‘सिंहगड’ असे ठेवले.

सिंहगडावर घडलेल्या इतिहासाबाबत फारशी माहिती उपलब्ध नसली तरी शिवकाळातील घडलेल्या घटनांमुळे गडाचे नाव अजरामर झाले.

सिंहगडावर जो माहिती फलक आहे त्या फलकावरून इसामी नावाच्या कवीने शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात मुहम्मद तुघलकाने इ. स. 1328 मध्ये कुंधीयाना किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे. त्यांनी हे काव्य 1350 मध्ये लिहिले आहे.

बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात हा किल्ला आला. इ. स. 1482, 1553, 1554, 1569 च्या सालातील उल्लेख आढळतात.

इ. स. 1635 च्या सुमारास कोंढाण्यावर सिद्दी अंबर किल्लेदार होता. त्यावेळी मोगल आणि आदिलशाह यांनी संगनमताने किल्ल्यावर हल्ला करून ताबा घेतला. याच सुमारास इ. स. 1636 मध्ये आदिलशाहाचा खजिना डोणजाच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.

शहाजीराजांना पुणे, सुपे, चाकण परिसराची सुभेदारी आदिलशहाने दिली होती. याच काळात दादोजी कोंडदेव-मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानीत आढळतो. दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजीराजांशी एकनिष्ठ होते. दादोजी कोंडदेव यांच्याकडे किल्ला असेपर्यंत शहाजीराजांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला नाही. पुढे इ. स. 1647 मध्ये दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू झाल्यानंतर आदिलशहाने किल्ल्याचा किल्लेदार म्हणून सिद्दी अंबर याची नेमणूक केली होती.

शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधल्यानंतर पुणे परिसरातील किल्ले एकापाठोपाठ एक असे बांधण्यास सुरुवात केली. सिद्दी अंबरला फितूर करून शिवरायांनी हा किल्ला इ. स. 1647 मध्ये सहज हस्तगत केला होता.

इकडे शहाजीराजांना आदिलशहाने कैद केले होते. त्यामुळे शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेच्या मोबदल्यात इ. स. 2649 मध्ये हा किल्ला पुन्हा आदिलशाहीच्या ताब्यात दिला.

शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधल्यावर दादोजी कोंडदेव शिवाजीराजांचे चाकर बनले असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो.
पुढे शिवरायांनी कोंढाणा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर औरंगजेबाच्या रूपाने मिर्झाराजे जयसिंग यांचे मोठे संकट स्वराज्यावर आले, पुरंदर येथे मोठी धुमश्चक्री झाली. पुरंदरच्या लढाईत दिलेरखान आणि मुरारबाजी यांच्यात मोठी चकमक झाली. मुरारबाजीने खूप मर्दुमकी गाजवली. अखेर त्याला प्राणास मुकावे लागले. अनेक मराठे सैनिक गतप्राण झाले. शिवरायांना ही हानी रोखायची होती म्हणून इ. स. 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी तह केला. तहात 23 किल्ले मोगलांना दिले. त्यात कोंढाणा किल्ल्याचाही समावेश होता.

गड आला पण सिंह गेला :

मिर्झाराजे जयसिंग आणि शिवराय यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहानुसार शिवराय आग्ग्राला गेले; पण बादशहाने कपटाने शिवरायांना कैद केले. शिवरायांनी बादशहाच्या हातावर तुरी देऊन तेथून आपली सुटका करून घेतली.

शिवराय आणि जिजामाता राजगडावर असताना ‘कोंढाणा किल्ला मोगलांच्या ताब्यातून घ्यावा’ अशी इच्छा जिजामातांनी बोलून दाखवली. शिवरायांनाही ही गोष्ट सलत होती. त्यांच्या डोळ्यांसमोर त्या वेळी तानाजी मालुसरेंचे नाव आले होते. तानाजी शिवरायांचा बालपणीचा साथीदार होता.

तानाजी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या गडबडीत होता. तो शेलारमामांना घेऊन राजगडावर शिवरायांना व जिजामातेला निमंत्रण देण्यासाठी आला होता. त्या वेळी शिवरायांनी ‘तुम्ही तुमचे लग्न उरकून घ्या. आम्ही कोंढाण्यावर स्वारी करण्याच्या तयारीत आहोत’ असे तानाजीला सांगितले. त्यावेळी तानाजीने “आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. मीच कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार. मला आशीर्वाद द्या.” असे म्हणून मोहिमेची तयारी सुरू केली.

तानाजी रात्रीच्या वेळी बरोबर 500 मावळे घेऊन कोंढाणा सर करण्यासाठी निघाला. त्या वेळी मिर्झाराजे जयसिंगने नेमलेला उदेभान हा रजपूत किल्लेदार होता. तो शूर आणि लढवय्या होता. तानाजीने पश्चिमेकडील कड्यावरून गडावर जाण्याचा बेत आखला आणि त्याच वेळी आपला भाऊ सूर्याजीला कल्याण दरवाजाकडून गडावर घुसण्यास सांगितले.

पाच सहा मावळे अवघड कडा चढून वर गेले आणि दोर टाकून बाकीचे मावळे गडावर चढले. इकडे सूर्याजी कल्याण दरवाजावर येऊन गडाचे दार उघडण्याची वाट पाहू लागला. तानाजी गडावर आल्याचा सुगावा उदेभानला लागला. उदेभान चवताळून तानाजीवर तुटून पडला. दोन वाघांची झुंज सुरू झाली; पण घात झाला.. तानाजीची ढाल तुटली..कमरेचा शेला हातावर गुंडाळून तानाजी लढू लागला. या लढाईत तानाजीचा हात तुटला.. तानाजी धारातीर्थी पडला.. पडता पडता उदेभानलाही खाली पाडले.

इकडे ठरल्याप्रमाणे काही मावळ्यांनी आतून कल्याण दरवाजा उघडला होता. सूर्याजी गडावर पोहोचला होता. तानाजी पडताच मावळे सैरभैर झाले; पण सूर्याजीने त्यांना रोखले. गड ताब्यात घेतला; पण शिवरायांना तानाजीसारखा मोहरा गमवावा लागला. शिवराय हळहळले. ‘गड आला पण सिंह गेला’, शिवरायांच्या तोंडून उद्‌गार बाहेर पडले. तेव्हापासून त्यांनी या गडाला ‘सिंहगड’ असे नाव ठेवले. ही घटना इ. स. 1670 मध्ये घडली. शिवरायांनी तानाजीच्या उमरठे गावी जाऊन रायबाचे लग्न केले. त्यानंतर बराच काळ सिंहगड शिवरायांच्या ताब्यात राहिला.

छत्रपती राजाराम महाराजांचे जिंजीहून आल्यानंतर सिंहगडावरच वास्तव्य होते. तेथेच त्यांचा इ. स. 1700 मध्ये मृत्यू झाला. सिंहगडावरून मोगलांना शह देण्याच्या योजना आखल्या जात होत्या. संताजी आणि धनाजीने औरंगजेबाच्या सैन्यास जेरीस आणले होते.

पुढे मराठ्यांची सत्ता खिळखिळी झाली. महादजी शिंदेनंतर एकही लढवय्या मराठा सरदार निघाला नाही. इ. स. 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. त्याच वेळी कोंढाणा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

सिंहगडावर पाऊल टाकताच इतिहासाच्या पाऊलखुणांची स्मृती जागृत होते. इतिहासाला उजाळा मिळतो. पूर्वजांच्या शौर्यामुळे अंगावर मूठभर मांस चढते.

सिंहगडावरील स्थळे :

पुणे दरवाजा :

गडाच्या पायथ्यापासून गडावर गेल्यावर किंवा चारचाकी वाहनाने गडावर गेल्यानंतर पश्चिमेकडे थोड्या अंतरावर ‘पुणे दरवाजा’ आहे. या दरवाजाचे तोंड पुण्याकडे आहे. त्यामुळे कदाचित ‘पुणे दरवाजा’ असे नाव पडले असावे.

पुणे दरवाजानंतर आणखी दोन दरवाजे लागतात. तिसरा दरवाजा हा सर्वांत प्राचीन दरवाजा आहे. दरवाजावर गणेशपट्टी आहे. गणेशपट्टीच्या बांधणीत कमळे कोरलेली आहेत.

घोड्यांच्या पागा :

तिसऱ्या दरवाजाच्या थोडे पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या घोड्यांच्या पागा पाहायला मिळतात. पागा पाहायला आवश्य जायला हवे. पागा पाहण्यासाठी खडकात पाडलेल्या एका खिंडारातून आत जावे लागते. आत जाताच गारवा जाणवतो. उन्हाळ्यात घोड्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशीच ही पागा आहे. पागांच्या मध्यभागी कुंड आहे. घोड्यांना पाणी पिण्यासाठी कदाचित हा कुंड बांधला असावा.

दारूचे कोठार :

दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारूचे कोठार होय. 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली होती. या अपघातात फडणिसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील माणसे मृत्यू पावली होती.

टिळक बंगला :

लोकमान्य टिळक यांनी रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून जागा खरेदी करून तेथे बंगला बांधला. टिळकांनी हा बंगला हवा पालटण्यासाठी आणि लेखनकार्यासाठी बांधला होता. टिळक मंडालेच्या तुरुंगात होते त्या वेळी त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली होती. टिळकांनी पत्र पाठवून आपल्या पत्नीला सिंहगडावरील या बंगल्यात हवा पालटण्यासाठी जाण्यास सांगितले होते. टिळक बंगला आजही पाहायला मिळतो. येथे जवळच टिळकांचा पुतळा आहे.

नरवीर तानाजीचे स्मारक :

बंगल्यापासून थोडे पश्चिमेला वळले की, बालेकिल्ल्याची चढण लागते. चढण चढल्यानंतर तानाजी मालुसरेंचे स्मारक लागते. येथे मेघडंबरी आहे. मेघडंबरीत नरवीर तानाजीचा पुतळा आहे. पुतळ्यात वीररस ओतलेला आहे. पुतळा अतिशय सुंदर आणि देखणा आहे. ही मेघडंबरी सिंहगड स्मारक मंडळाने उभारलेली आहे.

सिंहगड स्मारक मंडळ एक जागृत मंडळ आहे. हे मंडळ दर वर्षी माघ वद्य नवमीला तानाजीची पुण्यतिथी साजरी करते. तो दिवस तानाजीच्या पराक्रमाच्या आठवणीने भारावलेला असतो.

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर :

कोंडाणेश्वर मंदिराजवळून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती आहेत. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

देवटाके :

तानाजीच्या स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध ‘देवटाके’ लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होत असे. आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत. यावरून या देवटाक्यातील पाण्याच्या माधुर्याची कल्पना येते. टाक्यातील पाणी काढण्यासाठी रहाट बसवलेला आहे. उन्हाळ्यातही या टाक्यात पाणी असते. सिंहगडावर भेट दिल्यावर निश्चितच या देवटाक्यातील पाण्याची चव चाखा.

कल्याण दरवाजा :

सिंहगडाच्या पश्चिमेस कल्याण दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास कल्याण दरवाजा लागतो. हे एकामागून एक असे दोन दरवाजे आहेत. तानाजीने सिंहगड हस्तगत करण्यासाठी याच कल्याण दरवाजाच्या बाहेर सूर्याजीला थांबायला सांगितले होते. गड सर केल्यावर शिवराय याच दरवाजाने गडावर आले होते. त्यामुळे या कल्याण दरवाजाला खूप महत्त्व आहे.

उदेभानचे स्मारक :

या दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर जो चौकोनी दगड आहे ते उदेभान राठोडचे स्मारक असल्याचे मानले जाते. येथून पुरंदर किल्ला दिसतो.

डोणगिरीचा कडा (तानाजीचा कडा) :

गडाच्या पश्चिमेस डोणगिरीचा कडा आहे. हा कडा ‘तानाजीचा कडा’ या नावाने ओळखला जातो. येथून तानाजी कडा चढून तीनशे मावळ्यांनिशी गडावर चढला होता. काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री कडा चढून गडावर जाणे किती अवघड होते याची कड्यावर आल्यानंतरच कल्पना येते.

छत्रपती राजाराम महाराज स्मारक :

राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच राजाराम महाराजांची समाधी होय. जिंजीहून आल्यावर प्रवासाच्या दगदगीने राजाराम महाराज आजारी पडले होते. सिंहगडावर असतानाच इ. स. 1700 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

कोंडाणेश्वर मंदिर :

राजाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे जायचे. तेथे कोंडाणेश्वर मंदिर लागते. हा सिंहगडावरील शेवटचा पॉईंट होय.

सिंहगडाचे क्षेत्रफळ कमी असल्याने 2-3 तासात आरामात किल्ला पाहता येतो. सर्व स्थळांना भेटी देऊन परतीच्या प्रवासाला लागता येते.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

सिंहगड पुण्यापासून जवळच असल्यामुळे पुण्यात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आरामात सिंहगड पाहता येतो. त्यामुळे राहण्याची व खाण्यापिण्याची ‘आबाळ’ होत नाही.

Leave a comment