सुनीता विल्यम्सः अंतराळवीर /Sunita Williams: Astronaut

सुनीता विल्यम्स नेहमी म्हणतात,” तुम्हाला अंतराळवीर व्हायचं असेल तर साहसी बना, सातत्याने नवीन शिकण्याचा प्रयल करा, आरोग्य जपा. एक दिवस तुम्ही नक्कीच पुढे जाल,” याच सुनीता विल्यम्सची जीवनकथा आपण पाहणार आहोत. सुनीता विल्यम्सचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतील आहायोमधील क्लिव्हलँड या ठिकाणी आला. मी भविष्य किंवा ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत नाही; पण माझ्या मनाला असं सारखं वाटत असते की, 1, 10, 19, 28 या तारखांना जन्माला येणारी माणसं जीवनात काहीतरी सनसनाटी, क्रांतिकारी करत असतात. सुनीता विल्यम्स यांचाही जन्म योगायोगाने 19 तारखेला झाला आहे. असो –

सुनीताचे वडील मूळ भारतीय.
गुजरात राज्यातील मंगरोळ इथले. तर आईचे नाव बोनी पंड्या. पंड्या हे सुनीताच्या वडिलांचे आडनाव होय. सुनीताच्या वडिलांचे नाव दीपक पंड्या असे आहे. आई बोनीने आपल्या मुलांना शालेय जीवनापासूनच शिक्षणाबरोबर संगीत आणि व्यायामाचे घडे दिले.

सुनीता एक वर्षाची असताना सुनीताचे आईवडील सुनीतासह बोस्टनजवळ राहायला आले. आजी-आजोबा, काका- काकू यांना सोडतांना लहान मुलांना वाईट वाटले;पण तिच्या वडिलांचे म्हणजे दीपक पंड्या यांचे पुढील वैद्यकीय शिक्षण आणि करिअर महत्त्वाचे असल्याने बोस्टनला येऊन राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
मुलांना सांभाळत, शाहाकारी, मांसाहारी असे दोन प्रकारचे जेवण करत, रात्र शाळेत विणकाम शिकवायला जात सुनीताच्या आईची अक्षरशः दमछाक व्हायची;पण मुलांच्या शिक्षणात आणि त्यांच्या आवडी-निवडी, छंद जोपासण्यात बोनी पंड्या कधी कमी पडल्या नाहीत. अमेरिकेतील ओहायोतील युक्लीड जनरल हॉस्पिटलमध्ये निवासी प्रशिक्षण पूर्ण करताना तेथेच त्यांना बोनी त्सालोकर भेटल्या. पुढे मैत्रीचे रुपांतर विवाहात झाले. बोनी या अमेरिकन स्लोव्हेनिअम वंशाचा आहेत.

बालपण आणि शिक्षण:

सुनीताला एक भाऊ आणि एक बहीण आहे. भाऊ जय, तर बहीण दीना, सुनीता या तीन भावंडात तिसरी होती. बालवाडी ते सहाव्या ग्रेडचं सुनीताचं शिक्षण हिलसाईड एलिमेंटरी स्कूलमध्ये झाले. त्यानंतर सात ते नवव्या ग्रेडपर्यंतचे शिक्षण न्यूमन जुनिअर हायस्कूलमध्ये झाले. दहा ते बाराव्या ग्रेडपर्यंतचे शिक्षण नीडहॅम हायस्कूलमध्ये झाले.

या सर्व शिक्षणाच्या प्रवाहात तिच्या आवड‌त्या शिक्षिका होत्या श्रीमती अँजेला दिनापोली.त्यांनी सुनीताला पाचव्या ग्रेडमध्ये असताना शिकवले होते.सुनीता अँजेलाला कधीही विसरली नाही. शालेय शिक्षण पूर्ण होत असताना आपला गृहपाठ वेळेत पूर्ण करण्याकडे तिचा कटाक्ष असायचा. गृहपाठ पूर्ण झाला की पोहण्याच्या सरावाला वडिलांबरोबर जाई. लहानपणी पोहणे हा तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. एकदा मित्रांबरोबर सुनीता पोहण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला गेली होती. स्पर्धा संपल्यानंतर सुनीता घरी आल्यावर आईने तिला विचारले —

 

” सुनीता, स्पर्धा कशी झाली ?”

“ओके” एवढेच सुनीताचे उत्तर.

नंतर आईने तिची बॅग तपासली. त्यावेळी बॅगेत पोहण्यात वेगवेगळ्या प्रकारची प्रथम क्रमांक आलेली पाच पद‌के सुनीताच्या बॅगत सापडली.
एवढी पद‌के मिळवूनही सुनीता नॉर्मल असायची. कदाचित लहानपणापासूनच सुनीताचं ध्येय उच्चपराकोटीचं असावं. त्यावेळी सुनीता केवळ सात वर्षाची होती.

लहानपणी समुद्र‌किनारी गेली की सुनीता आपल्या मित्र मैत्रिणीसोबत किल्ला बनवून सर्वांना रामायण, महाभारतारील गोष्टी सांगत असे.

नीडहॅम हायस्कूल आणि सुनीता:

नीडहॅम हायस्कूलमध्ये असताना सुनीताने पोहण्याच्या स्पर्धेत तर शेकडो पदके जिंकली होती. या हायस्कूलमधील सुनीता विल्यम्स एक famous वि‌द्यार्थिनी झाली होती. या नीड हॅम हायस्कूलमधून सुनीता 1983 मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. गणित आणि शास्त्र विषयात तर तिने विशेष प्रावीण्य मिळवले होतं. या हायस्कूलमध्ये असताना सुनीता विल्यम्सने सेवाभावी संस्थांसाठी निधी जमा केला होता. असे नेहमी काही ना काही करण्यात सुनीता गुंतलेली असायचीच.शाळेत असताना आणि शाळेतून बाहेर पडल्यावर सुद्‌धा सुनीताने पोहण्याचा छंद जोपासला होता. गाडीतून पोहण्याच्या सरावाला जाताना सुद्धा सुनीता गाडीच्या प्रवासात आईला अनेक कोडी घालायची. संगीत क्षेत्राशी संबंधितही अनेक प्रश्न ती आईला विचारत असे.

जलक्रीडा – जीवनरक्षक!

सुनीता रिकामटेकडी अशी कधीच नसायची. अमेरिकेतल्या उन्हाळ्यात पोहण्याचा छंद जोपासत ती वेलस्ली कॉलेजमध्ये जीवनरक्षकाचं काम करायची.या कामात तिचा खूप वेळ जायचा; पण तरी सुद्‌धा हे काम ती मन लावून करायची. पोहण्याचा सराव झाला की ती वेलस्ली कॉलेजमध्ये कॅम्पला आलेल्या दुर्बल मुलांना मदत करायला जायची. अशी कामे तिला कधी सांगावी लागत नसे. ती स्वतःहून समाजसेवा करायची.

नेव्हल ॲकॅडमीः

सुनीताचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. उत्तम गुण मिळाले.आईवडिलांनी प्रतिष्ठित आय व्ही लीग युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला; पण सुनीताने युनायटेड स्टेट्स नेव्हल ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. ही संस्था युनायटेड स्टेट्स नेव्ही आणि मरीन कॉर्पससाठी अधिकाऱ्यांना पद‌वीपूर्व शिक्षण देते. या संस्थेने सर्वाधिक अंतराळवीर निर्माण केले आहेत ,असे इथे (USNA) अभिमानाने सांगितले जाते. लवकरच USNA या ॲकॅडमीत सुनीता आपल्या कर्तृत्वाने लोकप्रिय झाली. सुरुवातीला अभ्यासेतर छंदांमुळे म्हणजे पोहणे, क्रॉस कंट्री, रनिंग इत्यादी छंदांमुळे ती मुख्य विषयात मागे राहिली. अपयशी ठरली; पण तिच्या मनावर या गोष्टींचा किंचीतही परिणाम झाला नाही. पुढे ती एक हजार विध्यार्थ्यांमधल्या पन्नास महिला विध्यार्थिनींमधली एक वि‌द्यार्थिनी म्हणून उत्तीर्ण झाली.

मायकेलशी भेट आणि विवाह:

USNA या अ‍ॅकॅडमीने सुनीताला बरेच काही दिलं. याच ॲकॅडमीत शिक्षण घेत असलेला मायकेल हा सुनीताचा चांगला मित्र होता. पुढे त्यांच्या मैत्रीचे विवाहात रुपांतर झाले. या ॲकॅडमीतून बी-एस. ही फिजिकल सायन्समधली पदवी घेऊन सुनीता बाहेर पडली. तिला USNA कडून 1987 सालच्या मे महिन्यात US च्या नेव्हीमध्ये ‘एनसाइन ‘कमिशन मिळाले.

व्यावसायिक दृष्ट्या सुनीताला नेव्हल:

कोस्टल सिस्टीम कमांड इथे बेसिक डायव्हिंग ऑफिसर हे पद मिळाले. त्यानंतर ती पायलट प्रशिक्षणासाठी नेव्हल एव्हिएशन ट्रेनिंग कमांडमध्ये रुजू झाली. सुनीताला नेव्ही डायव्हर बनायची इच्छा होती; पण तिला दुसऱ्या पसंतीनुसार हेलिकॉप्टर पायलट व्हावे लागले.

नेव्हल एव्हिएटर:

1989 साली जुलै मध्ये सुनीताची नेव्हल एव्हिएटर ही प्रतिष्ठेची पोस्ट मिळाली. तिच्या कौशल्यामुळे नेव्ही डायव्हर आणि नेव्ही एव्हिएटर ही दोन्ही पदे तिच्याकडे चालून आली. पुढे नासामध्ये अंतराळवीर म्हणून काम करताना नेव्ही डायव्हर या पदाचा खूप उपयोग झाला. नेव्हीमध्ये असताना सुनीताने अनेक पदे भूषविली.

अंतराळ मोहिमेसाठी निवड : नासा प्रवास

अवकाशानं सुनीताला झपाटलं होतं. म्हणूनच तिची 1998 मध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाली. तिने निरनिराळ्या तीस विमानांमध्ये 2300 फ्लाईट अवर्स उड्डाण केले होते. म्हणूनच तिची अंतराळवीर म्हणून निवड झाली.आणि पुढे नासामध्ये जाऊन पोहोचली.

1998 मध्ये सुनीताने नासामध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्याच वर्षी अवकाश स्थानकाच्या प्रकल्पासाठी तिची निवड झाली. अवकाश मोहिमेचे प्रशिक्षण खूप खडतर असतं. अंतराळवीरांना निर्वात पोकळीत जायचं असतं आणि तेथेच काहीकाळ स्थीर राहायचे असतं.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक :

ASS म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 360 किमी वर आहे. अवकाश यानाच्या प्रवासाचा ताशी वेग सुमारे 27,000 किमी असतो. हे स्थानक एका दिवसात पृथ्वीच्या कक्षेत 15.7 फेऱ्या पूर्ण करते
9 डिसेंबर 2006 ला सुनीताचे स्पेसशटल लाँच झाले होते. 11 डिसेंबर 2006 सुनीता ASS वर पोहोचली.अवकाश स्थानकापर्यंत सुनीता जाईपर्यंत स्थानकाने पृथ्वीभोवती 46,000 फेचा पूर्ण केल्या होत्या. सुनीताबरोबर इतर अंतराळवीरही होते.

16 एप्रिल 2007 रोजी सुनीताने अवकाशात ट्रेडमिलवर बोस्टन मॅरॅथॉन स्पर्धा पूर्ण केली. ही शर्यत पूर्ण करताना तिने जगाभोवती 3 फेऱ्या पूर्ण केल्या. या कालावधीत सुनीताने अवकाश अवकाशस्थानकात असताना स्पेस वॉक चा नवा विक्रम प्रस्थापित केला.

अवकाशातून परतीचा प्रवासः

9 डिसेंबर 2006 रोजी अवकाश स्थानकाकडे झेपावलेल्या सुनीता विल्यम्सने 194 दिवस 18 तास 15 मिनिटे अवकाशात वास्तव्य करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. इतका दीर्घ काळ यापूर्वी कोणतीही महिला अंतराळवीर अवकाशात राहिली नव्हती. अटलांटिस या अंतराळयानातून सुनीता 21 जून 2007 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:30 वाजता पोहोचणार होती; पण खराब हवामानामुळे ते 23 जून 2007 रोजी पहाटे 1:19 ला पृथ्वीवर पोहोचले आणि संपूर्ण जगाने सुस्कारा सोडला.

5 जून 2024 ची अंतराळ मोहीम :

5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बॅरी बुच विल्मोर यांनी अवकाशात प्रस्थान केले होते; पण अपोलो-13 या अंतराळयानात बिघाड झाल्याने त्यांचे वास्तव्य वाढले आहे. अंतराळवीरांना सुखरूप पृथ्वीवर आणण्यासाठी नासाचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. निश्चितच हे दोन अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत येतील अशी आशा आहे.

1 thought on “सुनीता विल्यम्सः अंतराळवीर /Sunita Williams: Astronaut”

  1. सुनिता विल्यम्स यांचा जिवन प्रवास सर्वांनाच खूप प्रेरणादायी आहे. खूप सुंदर अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळाला धन्यवाद सर.

    Reply

Leave a comment