अल्फ्रेड नोबेल आणि नोबेल पुरस्कार /Alfred Nobel

अल्फ्रेड नोबेल या महान मानवतावादी आणि लोककल्याणकारी व्यक्तीचा जन्म स्वीडन देशाची राजधानी असलेल्या स्टॉकहोम येथे 1833 मध्ये झाला. त्यांना नोबेल हे आडनाव त्यांच्या मूळ गावावरून मिळाले. त्यांचे पूर्वज नोबिलोव येथे राहत होते. अल्फ्रेड यांच्या आजोबांनी उपसला विश्वविद्यालयात प्रवेश घेताना ‘नोबिलोव’ असे आडनाव लावले. ह्याचेच अपभ्रंश पुढे ‘नोबेल’ असे झाले. Alfred Nobel यांच्या आजोबांनी याच महाविद्यालयातील एका रेक्टरच्या मुलीशी विवाह केला.

अल्फ्रेड यांचे वडील व्यावसायिक होते. त्यांना संशोधनातही विशेष रस होता. परंतु अचानक स्वीडनमध्ये त्यांना दिवाळखोरीत जावे लागले. त्यामुळे त्यांना नाइलाजाने रशियाला जावे लागले. रशियात आल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी उद्योग सुरू केले. त्यांत त्यांचा चांगलाच जम बसला. परिस्थिती सुधारली. अल्फ्रेड हेही वडिलांच्या बरोबरच रशियाला गेले होते. त्यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे खासगी शिक्षकांकडून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. भाषा, रसायनशास्त्र या विषयांचे त्यांनी विशेष अध्ययन केले. त्यांनी स्वीडिश, रशियन, इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन इत्यादी भाषा अवगत केल्या.

अल्फ्रेड नोबेल यांना अनेक प्रकारच्या भाषा अवगत झाल्यामुळे उद्योगानिमित्त त्यांना सारखे जर्मनी, फ्रान्स, इटली, अमेरिका इत्यादी देशांत दौरा करताना भाषेचा चांगलाच फायदा झाला. त्याचबरोबर या भाषा संबंधांतून त्यांच्या मनात वैश्विक भाव निर्माण झाला. ते आपल्या वडिलांसोबत रसायनशास्त्राशी संबंधित कार्य करत राहिले. आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यावर ते पुन्हा आपल्या वडिलांसोबत 1863 साली स्वीडनला गेले. स्वीडनला आल्यानंतर स्टॉकहोम येथे स्फोटक द्रव्य तयार करण्याचे काम प्रयोगशाळेत करू लागले.

विस्फोटक तयार करण्याचे काम अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या वडिलांकडून शिकून घेतले होते. या विस्फोटकाचा उपयोग त्यांनी रशियासाठी केला होता. रशियाने क्रिमियाच्या विरुद्ध लढाई करण्याकामी अगदी यशस्वी उपयोग केला होता. या सर्व घडामोडीमुळे त्यांच्या मनात संशोधनाची प्रेरणा निर्माण झाली. त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी ‘नोबेल इग्नायटर’ नावचे प्रज्वलक निर्माण केले. त्यानंतर अगदी काहीच वर्षांनी त्यांनी डायनामाईटचा शोध लावला. त्याचा उपयोग खजिनांसाठी लागणारे खोदकाम करण्यासाठी, सुरुंग लावण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी होऊ लागला. तोफ, बंदूक यांच्यासाठी सुद्धा त्यांनी नवीन पद्धतीने स्फोटक द्रव्य तयार केले.

अल्फ्रेड नोबेल यांनी स्फोटक द्रव्ये तयार करण्यासाठी जर्मनी, फ्रान्स, इटली, स्कॉटलंड इत्यादी ठिकाणी प्रयोगशाळा बनवल्या. याशिवाय त्या प्रयोगशाळांत रबर, चमडे, संप्रेषण इत्यादींचीही निर्मिती होऊ लागली. त्यांनी अशा प्रकारे निरनिराळ्या 355 वस्तू बनवल्या. या वस्तूंचा व्यावसायिक उपयोग करण्यासाठी सुमारे वीस देशात नव्वद कारखाने स्थापन केले. अशा प्रकारे जगातील पहिली सर्वांत मोठी बहुराष्ट्रीय कंपनी स्थापन करण्याचा बहुमान अल्फ्रेड नोबेल यांना मिळाला. त्यांनी एवढ्या मोठ्या व्यापक प्रमाणात उद्योग चालवल्यामुळे त्यांच्याजवळ खूप संपत्ती जमा होऊ लागली.

अल्फ्रेड नोबेल यांना दोन भाऊ होते. ते रशियामध्ये खोदकामाचे कार्य करत असत. हे सर्व नोबेल बांधव उदारमतवादी आणि धनवान होते. त्यांनी कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी कधीच संप केला नाही.

अल्फ्रेड नोबेल यांनी लग्न केले नाही. सतत कार्यमग्न राहण्यात त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. युरोपमधील सर्वांत मोठा धनिक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसल्यामुळे कधी-कधी त्यांचा स्वभाव मूडी बनायचा. आपल्या कामाविषयी ते नेहमी म्हणत, “मी जेथे काम करतो तेथे माझे घर आहे. मी सर्वत्र काम करतो.” त्यांची सहा देशांत घरे होती.

अल्फ्रेड नोबेल यांनी लग्न केले नसले, तरी त्यांच्या जीवनात तीन स्त्रिया आल्या होत्या. ऑस्ट्रिया देशाची बॅरोनेस बर्था फॉन सटनर या शांती आंदोलनात भाग घेणाऱ्या स्त्री बरोबर ते विवाह करण्यास इच्छुक होते. परंतु त्या स्त्रीचे दुसऱ्याच व्यक्तीचे प्रेम होते. तिला 1905 साली शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर व्हिएतनामची सोफी हेस हिच्याबरोबर त्यांचे प्रेमसंबंध होते. ती त्यांच्यापेक्षा 23 वर्षांनी लहान होती. त्यांचे प्रेमसंबंध अठरा वर्षे चालूनही त्याचे लग्नात रूपांतर झाले नाही.

अल्फ्रेड नोबेल जीवनाच्या शेवटपर्यंत क्रियाशील राहिले. 10 डिसेंबर 1896 साली इटलीतील सान रेमोनगर येथे त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी ते एकटेच होते.

अल्फ्रेड नोबेल यांचे मृत्युपत्र आणि नोबेल पुरस्कार :

अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू 1896 साली झाला. 1897 साली त्यांचे मृत्युपत्र सर्वांसमोर खुले झाले. त्या वेळी अनेक समस्या निर्माण झाल्या. अनेक लोकांनी त्यांच्या मृत्युपत्राला विरोध केला. देशा- देशांमध्ये सुद्धा तंटे निर्माण झाले. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती अनेक देशांत पसरली होती. त्यांचे वास्तव्य कोणत्याही एका देशात नसल्यामुळे राष्ट्रीयत्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी मृत्युपत्र लिहिताना वकिलाचे सहकार्य घेतले नव्हते. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या त्यात अनेक त्रुटी राहिल्या.

अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार नॉर्वे सरकारने कमिटी तयार करून ‘नोबेल शांती पुरस्कार’ची व्यक्ती ठरवावी असे होते; पण ह्या गोष्टी स्वीडनच्या सम्राटाला मान्य नव्हत्या. नॉर्वे आणि स्वीडनमध्ये तणावपूर्ण वातावरण होते.

रॅग्नर सोमर नावाचा अल्फ्रेड नोबेल यांचा तरुण सहाय्यक होता. अल्फ्रेड यांनी सोमरला काही अधिकार दिले होते. कार्यवाहक म्हणून तेच काम करत होते. त्यांनी स्वीडनच्या सम्राटाबरोबर अनेक वेळा चर्चा घडवून अल्फ्रेड नोबेल यांना स्वीडनचे राष्ट्रीयत्व देण्यास प्रवृत्त केले. अल्फ्रेड नोबेल यांना स्वीडनच्या सम्राटाने राष्ट्रीयत्व देऊन त्यांचे मृत्युपत्र स्वीकारले. त्यानंतर नोबेल फौंडेशन तयार करण्यात आले. 29 जून 1900 रोजी नोबेल फाऊंडेशन तर्फे ‘नोबेल पारितोषिका’साठी नियमावली प्रसिद्ध झाली.

नोबेल फाउंडेशन :

29 जून 1900 रोजी नोबेल फाउंडेशन नावाचे स्वायत्त ट्रस्ट (विश्वस्त) निर्माण झाले. या ट्रस्टला नोबेल यांच्या संपत्तीचा पूर्ण उपयोग करण्याचे अधिकार प्राप्त झाले. या ट्रस्टमध्ये सहा सदस्य असतात. ट्रस्टचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार स्वीडन सरकारला देण्यात आला. यामध्ये वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळे पुरस्कार देण्याचे अधिकार देण्यात आले.

रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेला पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र विषयाचे पुरस्कार देण्याचे अधिकार देण्यात आले. कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट ऑफ नोबेल असेंब्ली या संस्थेला चिकित्सा व शरीर विज्ञान क्षेत्रातला पुरस्कार निवडण्याचा अधिकार दिला गेला. अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार नॉर्वे सरकारने पाच सदस्यीय कमिटी नेमून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नोबेल शांती पुरस्कार निवडण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. स्वीडिश ॲकॅडमी ‘नोबेल साहित्य पुरस्कार’ देण्याचे कार्य करते. 1969 पासून अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार (विशिष्ट समिती नेमून) देण्याची प्रथा निर्माण झाली.

नोबेल पुरस्कारासाठी जगभरातून प्रस्ताव मागितले जातात. दरवर्षी १ फेब्रुवारीपासून समिती प्राप्त प्रस्तावांची छाननी करते. गुप्त पद्धतीने त्या व्यक्तींच्या कार्याची, संशोधनाची माहिती घेते आणि त्यानंतर पुरस्कार जाहीर करते. दरवर्षी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी निमित्त 10 डिसेंबरला नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते. स्वीडनचे सम्राट नोबेल पुरस्कार प्रदत्त करण्याचे काम करतात.

सध्या नोबेल पुरस्काराची रक्कम 10 ते 15 कोटींच्या घरात आहे.

अल्फ्रेड नोबेल यांचे मृत्युपत्र :

मी डॉ. अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल 27 नोव्हेंबर 1895 पर्यंत अस्तित्वात असलेल्या माझ्या सर्व चल-अचल संपत्तीचे असे मृत्युपत्र करतो की, त्याचे धनात रूपांतर करण्यात यावे. तयार झालेल्या धन-संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी अशा व्यक्तींना पुरस्कार दिला जावा की, ज्या व्यक्तीने मानवी कल्याणासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे. व्याजाची रक्कम पाच समान भागामध्ये (1969 पासून सहा समान भागामध्ये) वाटली जावी. त्याचे वितरण खालीलप्रमाणे केले जावे.

व्याजाच्या रकमेचा एक भाग ज्याने भौतिक शास्त्रात (पदार्थ विज्ञान) उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याला दिला जावा. दुसरा भाग रसायन शास्त्रामध्ये उल्लेखनीय संशोधनात्मक कार्य केले आहे अशा व्यक्तीला दिला जावा. तिसरा भाग शरीर विज्ञान-चिकित्सा शास्त्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जावा. व्याजाचा चौथा भाग साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जावा आणि पाचवा भाग जगात बंधुभाव निर्माण करणाऱ्या, शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटणाऱ्या, युद्ध थांबवणाऱ्या व्यक्तीला दिला जावा.

1969 पासून व्याजाचे सहा समान भाग केले जाऊ लागले आणि सहावा भाग अर्थशास्त्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जाऊ लागला.

Leave a comment