तुम्ही गोव्याला जाता. खूप मौजमजा करता. समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करता आणि परत येता. फार तर चर्च पाहता आणि परत येता. पण गोव्याच्या भूमीत आग्वाद, अंजदीव हे किल्ले आहेत,हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? मग त्यांतीलच Aguada Fort ची आपण आता माहिती घेणार आहोत.
गडाचे नाव : आग्वाद
समुद्र सपाटीकातून उंची : 30:00 मीटर.
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी
ठिकाण : : अग्वाद
सध्याची अवस्था: चांगली
स्थापना इ.स. 1612
जवळचे विकाण: पणजी
पणजी पासून अंतर : 15 किमी.
अगुआडा / आग्वाद किल्ला पाहायला कसे जाल ? How to go to Aguada Fort?
महाराष्ट्र राज्याच्या शेजारी गोवा राज्य आहे. या गोव्यात पणजीपासून 15 किलोमीटर अंतरावर अगुआडा किल्ला आहे. पणजीतून तुम्ही अगुआडा किल्ल्याजवळ अर्ध्या तासात जाऊ शकता.
गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असल्याने गोव्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर येथून विमानाने गोव्याला जाता येते. तेथे गेल्यावर कॅब बुक करून गोव्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहता येतात. आग्वाद किल्ल्याचा सध्या गोवा सरकारने तुरुंग केला असल्याने संपूर्ण किल्ला पाहता येत नाही; पण जवळ जाऊन जेवढा बघता येईल तेवढा किल्ला आपण पाहू शकतो. बोटीतून समुद्रातून किल्ल्याने दृश्य टिपता येते.
* मालवण अगुआडा किल्ला 109 किल्लोमीटर आहे. मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला पाहून गोव्याला जाता येते.
* फोंडा या गावातून अगुआडा किल्ला 139 किलोमीटर आहे; तर कणकवली पासून 120 किलोमीटर अंतरावर आहे.
* ओरस या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासकीय ठिकाणापासून अगुआडा किल्ला 92 किलोमीटर अंतरावर आहे.
* आंबोली या निसर्गरम्य ठिकाणाहून अगुआडा किल्ला 84 किलोमीटर अंतरावर आहे.
अगुआडा किल्ल्याचा इतिहास : History of Aguada Fort:
अगुआडा किल्ला हा मध्ययुगीन काळात म्हणजे इ.स. 1604 मध्ये या किल्ल्याच्या बांधणीला सुरुवात झाली. दोन वर्षातच म्हणजे 1604 मध्ये किल्ल्याची तटबंदी पूर्ण झाली; पण प्रत्यक्ष संपूर्ण किल्ल्याचे बांधकाम इ. स. 1612 साली पूर्ण झाले.
डचांचा होणारा वारंवार हल्ला परतवून लावण्यासाठी आणि डचांपासून कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोर्तुगीजांनी अगुआडा हा किल्ला बांधला. त्यावेळी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता.
येथे पोर्तुगीज भाषेत एक शिलालेख आहे. या शिलालेखात असा उल्लेख आहे.—-
पोर्तुगालचा राजा फिलीप दुसरा याच्या आज्ञेवरून येथे आश्रयास येणाऱ्या गलबतांना संरक्षण देण्यासाठी तत्कालीन व्हाईसरॉय रूब द ताव्होरा यांनी हा किल्ला 1612 साली बांधून घेतला..
हा किल्ला बांधला त्यावेळी या किल्ल्याचे नाव ‘सांत कातारीन’ असे ठेवले होते; पण पुढे त्यात बदल झाला. या किल्ल्यात गोड्या पाण्याचा झरा आहे. हा किल्ला समुद्राच्या काठाला वसलेला असूनही किल्ल्यात गोड्या पाण्याचा झरा आहे. या झऱ्याचीच जागा खोदून येथे तलाव बांधला. याचा उपयोग पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी केला जात असे. किल्ल्यावर मुबलक पाणी असल्याने आणि पाणी म्हणजे पोर्तुगीजे भाषेत ‘आग्वा त्यावरुन पाण्याचा साठा असणारा तो किल्ला म्हणजे आग्वाद’ असे नाव पडले. या किल्ल्याला अगुआडा, अगुआद असेही म्हणतात.
आदिलशाहीचा मातब्बर सरदार अब्दल हकीम याने या किल्ल्यावर हल्ला केला होता; पण पोर्तुगीजांनी हा हल्ला लीलया परतवून लावला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. 1666 मध्ये आग्वाद किल्ल्यावर हल्ला केला होता;पण त्यांना यश जरी आले नाही तरी पोर्तुगीजांवर जरब बसवली.स्वराज्यात ढवळाढवळ कराल तर याद राखा. असाच या हल्ल्याचा संदेश होता. त्यामुळे पोर्तुगीज सावध झाले आणि मुघलांशी संधान बांधून राहू लागले.
पोर्तुगीजांनी 7 नोव्हेंबर 1683 रोजी फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी फ्रान्सिस्को दि ताव्होरा हा व्हाइसरॉय होता. ही बातमी छत्रपती संभाजी महाराज यांना समजताच त्यांनी फोंड्यावरचा हल्ला परतवून लावून 3000 सैन्यानिशी महाराज चाल करण्यास निघाले. तेथे संभाजी महाराजांनी जुवे बेटावर हल्ला करून ते बेट ताब्यात घेतले. याठिकाणी व्हाइसरॉयचा सपाटून पराभव झाला. व्हाइसरॉय तेथून निसटून गोव्याकडे पळाला. महाराजांनी पाठलाग चालूच ठेवला. संपूर्ण गोवा ताब्यात येणार अशी चिन्हे दिसू लागली. यावेळी व्हाइसरॉय घाबरून गेला. त्याने सेंट झेविअरची पेटी उघडून राजदंड पेटीत ठेवला आणि गोव्याच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. काहीही झाले तरी गोवा ताब्यात घेऊनच जायचे असा निश्चय संभाजी महाराजांनी केला होता;पण दुर्दैव!!!जंजिऱ्याचे जे झाले तेच इथे पण झाले .औरंगजेब बादशाह स्वराज्यावर चाल करून येत आहे आणि तो स्वराज्यात घुसला आहे, हे समजताच महाराजांनी आपले सैन्य माघारी फिरवले आणि पोर्तुगीज मात्र बचावले. 12 नोव्हेंबर 1683 ते 20 नोव्हेंबर 1683 या काळात ही सर्व घडामोड झाली.
18 जून 1946 रोजी याच किल्ल्याचा आश्रय घेऊन डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तिसंग्रामाचे रणसिंग फुंकले होते. त्यावेळी क्रांतिकारकांना याच आग्वाद किल्ल्याने आश्रय दिला होता. या लढ्याचे प्रतिकात्मक शिल्प 1971 साली लढ्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गडाच्या दारातच उभे केले आहे. हे शिल्प विष्णू कुकळेकर यांनी तयार केले होते.
आग्वाद गडावरील प्रेक्षणीय स्थळे: Spectacular Places of Aguad Fort
दीपगृहः Lighthouse
इ.स 1864 साली गडावर उंच ठिकाणी दीपगृह उभारला गेला आहे. हा दीपगृह आशिया खंडातील पहिला दीपगृह आहे. पुढे 1871 मध्ये दीडशे मण वजनाची प्रचंड मोठी घंटा या दीपगृहावर बसवण्यात आली. इ.स. 1976 साली हे दीपगृह कायमचे बंद करण्यात आले.
खंदक :
तुम्ही देवगिरीचा किल्ला पाहिला असेल तर त्या किल्ल्याला सभोवार खंदक आहे. असेच खंदक या आग्वाद किल्ल्याच्या सभोवती आहे. खंदक खोदून त्याचे दगड तटबंदीसाठी वापरलेले आहेत.
मजबुत तटबंदीः
आग्वाद किल्ल्याचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याची तटबंदी मालवणसारखी आजही मजबूत स्थितीत आहे’
आग्वाद किल्ल्यावर बघण्यासारखे खूप आहे. या किल्ल्याला तुम्ही आवश्य भेट देऊन इतिहासाच्या साक्षीदाराला पाहून या.