खिद्रापूर/नृसिंहवाडी Khidrapur /Nrusinhawadi

महाराष्ट्रातील काही प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक अशी ओळख असणारे मंदिर म्हणजे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर होय. कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना आपण भेट देत असताना खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर विसरून चालणार नाही. महाराष्ट्राच्या हद्‌दीतील दक्षिण पूर्वेकडे कृष्णा नदीकाठी प्राचीन वसा असलेले खिद्रापूर हे गाव आहे. या गावाच्या पलीकडे म्हणजे कृष्णा नदीच्या पलीकडे कर्नाटक राज्याची हद्‌द लागते. म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमारेषेवर वसलेल्या खिद्रापूर गावातील अगदी कृष्णा नदीकाठाला लागूनच असलेल्या या कोपेश्वर मंदिराची आपण माहिती घेणार आहोत——

खिद्रापूरला कसे जाल ? How to go to khidrapur?

कोल्हापूरपासून खिद्रापूर 60 किलोमीटर अंतरावर आहे. हुपरी, बोरगाव मार्गे जाता येते. कुरुंदवाड मार्गे गेल्यास नृसिंह‌वाडीपासून खिद्रापूरला जाता येते.यामार्गे कोल्हापूर ते खिद्रापूर 68 किलोमीटर आहे.

* निपाणी ते खिद्रापूर 50 किलोमीटर अंतर आहे. निपाणीच्या उत्तरेला खिद्रापूर आहे.

* मुरगूडून खिद्रापूरला निपाणीमार्गे जाता येते. मुरगूड ते खिद्रापूर अंतर 70 किलोमीटर आहे.

* सांगलीतून जयसिंगपूर, कुरुंद‌वाड मार्गे खिद्रापूर 38 किलोमीटर अंतरावर आहे.

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर:Kopeshwar Temple, Khidrapur

चालुक्य-शिलाहार राजघराण्याची सत्ता दक्षिण महाराष्ट्रात, दक्षिण भारतात असताना या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बांधकामाची सुरुवात होऊन ते पूर्ण झाले. चालुक्य राजवटीत या मंदिराचे बांधकाम सुरु झाले आणि शिलाहार राजवटीत हे मंदिर पूर्ण झाले.कारण देवगिरीच्या यादवांनी हे मंदिर पूर्ण होण्यास मदत केल्याचा उल्लेख एका शिलालेखात आहे.

खिद्रापूर या गावाने अनेक ऐतिहासिक लढाया पाहिल्या आहेत. चालुक्य राजा अहवमल्ल आणि चोळ राजा राजेंद्र यांचात इ.स. 1058 मध्ये याच खिद्रापूर परिसरात लढाई झाली. यात चोळ राजा राजेंद्रला प्राण गमवावे लागले.येथे रणांगणावरच चोळ घराण्यातील वारसाने राज्याभिषेक केला होता.

औरंगजेब बाद‌शाहा असताना मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी 27 वर्षे महाराष्ट्रात तळ ठोकून होता; पण त्याला मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करता आले नाही.या काळात मिरज येथे औरंगजेबचा तळ असताना या मंदिराचे औरंगजेबच्या लष्कराने मोठे नुकसान केले होते.

मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारावर इ.स. 1213 सालचा एक शिलालेख आहे. या शिलालेखात शिलाहार राजा भोज दुसरा आणि देवगिरीचा याद‌व राजा सिंघन दुसरा यांच्यात मोठी लढाई झाली. या लढाईत शिलाहार राजाचा पूर्ण पराभव झाला होता. याद‌वांनी शिलाहार राजा भोज याला बंदी बनवून पन्हाळगडावर ठेवले होते. इतिहासातील महत्त्वपूर्ण माहिती या मंदिराच्या शिलालेखातून मिळते. या लढाईनंतर शिलाहार राजघराण्याची सत्ता संपुष्टात आली.

खिद्रापुरातच दुसरे एक मंदिर आहे. हे जैन मंदिर होय. या मंदिरातील एका शिल्पावर एक सुंदर स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. तिचा प्रसन्न चेहरा अगदी जिवंत वाटतो. तिच्या खांद्यावर मुंगूस बसलेले या चित्रात दाखवले आहे.

कोपेश्वर मंदिर एक संरक्षित स्मारक: Kopeshwar! National Protected Monument.

भारत सरकारच्या परातत्त्व विभागाने या मंदिराला 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्र‌ातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या मंदिराला कोणीही नुकसान करू शकत नाही.

कोपेश्वर मंदिरातील रचना आणि सौंदर्य:

कोपेश्वर मंदिराची अप्रतिम सौंदर्य आणि कलात्मक रचना पाहून थक्क होऊन जायला होते. मंदिराच्या समोर जो मंडप आहे, त्या मंडपाला स्वर्गमंडप हे नाव असून हा मंडप कोरीव 48 खांबांवर उभा आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मंदिर आणि मंडप सुद्धा संपूर्ण दगडात उभारलेले आहेत. मंडपात प्रवेश करताच छताला एक गोलाकार छिद्र दिसते. या छिद्रातून आकाशाचे अप्रतिम सौंदर्य पाहाता येते. येथून आपण जणू काही स्वर्गच पाहत असल्याचा भास होतो. म्हणूनच या मंडपाला स्वर्ग मंडप असे नाव दिले आहे. मंडपाच्या परिघात गणपती, कार्तिक नाथ, कुबेर, यमराज यांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मंडपाच्या मध्यभागी उभे राहून आपण कोपेश्वर शिवलिंग पाहू शकतो. कोपेश्वर हे शिवाचे प्रतिकात्मक रूप असून या मंदिराला कोपेश्वर महादेव मंदिर असेही म्हणतात.

या मंदिर परिसरात एक संस्कृत शिलालेख आहे. या शिलालेखात देवगिरीच्या यादव राजघराण्यातील राजा सिंहदेव याने इ.स. 1136 मध्ये जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे.

मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यावर शिखर आहे. या शिखरावर आणि मंदिराच्या बाह्य भिंतीवर कोरलेली अप्रतिम नक्षी पाहून डोळ्यांचे पारणे फिटतात. गाभारा आणि स्वर्गमंडप यांना जोड‌णारा सभामंडपही नक्षीदार आहे. संपूर्ण मंदिरच जाळीदार नक्षीने आणि कोरीव कामाने नटलेले आहे. कर्नाटकातील काही पौराणिक मंदिरे आणि खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर यांचे निरीक्षण केले असता या मंदिरांच्या रचनेत, कलाकुसरीत बरेच साम्य असल्याचे जाणवते.

महापूराच्या काळात मंदिरात पाणी येते. अगदी मंदिराच्या छतापर्यंत पाणी आल्याच्या खुणा मंदिरावर दिसतात. फक्त मंदिराचे शिखर कधी महापुरात बुडलेले नसेल.

खरे तर भारताच्या पुरातत्त्व विभागाने मंदिराची डागडुजी करणे, फिनिशिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिराचे आयुष्य नक्कीच वाढेल.

2. नृसिंहवाडी: Nrusinhawadi

माहूर, प्रयाग चिखली, रावेर इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रात प्रसिद्ध ‌ दत्त मंदिरे आहेत. नृसिंहवाडी येथे सु‌द्धा प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. दत्तात्रेय हे कुणाचेही अवतार नसून अनुसूया आणि अत्रि ऋषी यांना झालेले योगी पुत्र आहेत. अनसूया ही बळीराजाची चुलत बहीण आहे. तिचे वडील कपिल मुनी असून कपिलमुनी हे बळीराजाचे चुलते होते.

नृसिंहवाडी हे ठिकाण कोल्हापूरपासून 43 किलोमीटर अंतरावर आहे.सांगलीहून जयसिंगपूर मार्गे नृसिंहवाडीला जाता येते.

श्री दत्तात्रेय यांचे शिष्य नृसिंह सरस्वती यांचे या ठिकाणी बारा वर्षे वास्तव्य होते. त्यांच्या नावावरून या गावाला नृसिंहवाडी असे नाव पडले. श्री नृसिंहसरस्वती हे स्वतःला द‌त्तात्रेयाचे अवतार मानत. नृसिंह सरस्वती यांनीच दत्तात्रेयांच्या पादुकांची स्थापना या कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर केली. याच ठिकाणी विजापूरुच्या आदिलशाहीने श्री दत्तात्रेयाचे मंदिर बांधले आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडीला दर गुरुवारी, दत्तजयंती, पौर्णिमा यावेळी मोठ्या संख्येने भाविक येतात. नृसिंहवाडीतील कवठाची बर्फी प्रसिद्ध आहे.

कृष्णा-पंचगंगेचा संगम:

कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमाच्या ठिकाणीच हे दत्त मंदिर असले तरी दत्त मंदिराच्या उजवीकडे घाटावरून चालत गेल्यास 500 मीटर अंतरावर कृष्णा पंचगंगेचा संगम पाहायला मिळतो. नृसिंहवाडीला गेलाच आहात तर हा कृष्णा-पंचगंगेचा संगम अगदी जवळून बघा.

Leave a comment